क्रिप्टोकरन्सीचा ‘पासवर्ड’ धडा!
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :10-Feb-2019
कॅनडामधील क्वाड्रिगा-सीएक्स या क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापक गेराल्ड कॉटन यांच्या निधनाने जे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, त्या प्रश्नांतून बिटकॉईन या गुंतवणुकीबद्दल जगाला तसेच भारतीयांना धडा मिळेल, अशी आशा आहे. कॉटन नावाचा हा 30 वर्षांचा तरुण सुमारे 25 कोटी डॉलर म्हणजे 1800 कोटी रुपयांचे व्यवस्थापन करत होता! त्याच्याकडे एक विमान आहे आणि ब्रिटनमध्ये मोठी मालमत्ता आहे. बिटकॉइन हे डिजिटल चलन असून त्याचा गेले काही वर्षे जगात बोलबाला आहे. कॉटन जयपूरजवळील अनाथालयाच्या कार्यक्रमासाठी भारतात आला होता, तेव्हा म्हणजे 9 डिसेंबर रोजी त्याचे निधन झाले. एवढ्या प्रचंड रकमेचे व्यवस्थापन करणार्‍या माणसाच्या निधनाविषयी आता साहजिकच उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
 
आधुनिक जगातील एका आर्थिक शोषण साखळीचा म्होरक्या अनाथालयाच्या कार्यक्रमासाठी हजारो किलोमीटर दूर का आला होता, हे एक कोडेच आहे. जगातील अशाच आर्थिक साखळीमुळे जगातील दारिद्र्य वाढते आहे, असे असताना त्यात काम करणार्‍या माणसांना समाजसेवा करायची आहे! अनैतिक मार्गाने कमावलेल्या पैशामुळे जी अस्वस्थता येते, त्यावर उतारा म्हणून अशी सेवा केली जाते. अशा समाजसुधारकांचे आपल्या देशातही पीक आले आहे. आश्चर्य म्हणजे क्वाड्रिगा-सीएक्स या क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंजसाठी जो पासवर्ड आणि इतर गोष्टी लागतात, त्या सर्व या एकाच माणसाच्या ताब्यात होत्या, अगदी त्याची बायको जेनिफर रॉबर्टसन हिलाही त्याची काहीच माहिती नसल्याने 25 कोटी डॉलर एवढी प्रचंड रक्कम आता लाखांपेक्षाही अधिक गुंतवणूकदारांना परत मिळू शकणार नाही, हे यांचे आधुनिक व्यवस्थापन! अमेरिका, कॅनडासारख्या देशात अशा वेळी दिवाळखोरी जाहीर करणे सोपे असते. तशी दिवाळखोरी जेनिफरने जाहीर केली आहे. आर्थिक क्षेत्रातील या एका वेगळ्या घटनेने अनेक प्रश्न निर्माण झाले असून भारतीय गुंतवणूकदारांना पुढच्याच ठेच मागचा शहाणा यान्यायाने अनेक बोध घेण्यासारखे आहेत.

 
 
गेल्या तीन-चार वर्षांत आणि विशेषतः नोटबंदीनंतर कर चुकविण्यासाठी नवे नवे मार्ग काही भारतीय श्रीमंत वापरत आहेत. त्यात बिटकॉइनच्या खरेदीचा मार्ग आघाडीवर आहे. खरे म्हणजे बिटकॉइनची खरेदीसुद्धा बँक खात्यातूनच करावी लागते, पण तो मार्ग टाळून नव्या क्लुत्प्या लढविल्या
जात आहेत. या डिजिटल चलनाच्या खरेदीविक्रीतून काहीना इतका प्रचंड परतावा मिळाला आहे की गुंतवणूकदारांचे लक्ष त्याकडे वेधले गेले. या व्यवहारांची उघडपणे फारशी चर्चा होत नसली तरी अनेकांना त्याचा नाद लागला आहे. पण त्याची पुरेशी माहिती न घेता केवळ अतिलोभापोटी जे यात पडले, त्यांनी स्वत:चे प्रचंड नुकसानही करून घेतले आहे. सोने दुप्पट करून देतो, असे सांगून फसवणूक करणार्‍यांवर विश्वास ठेवणारी मंडळी आपल्या समाजात आहे. ठेवीवर 15 टक्के िंकवा त्यापेक्षा जास्त व्याज मिळू शकते, यावरही काही जण विश्वास ठेवतात आणि एक दिवस असा येतो की व्याज तर सोडाच, पण मुद्दलही परत मिळणार नाही, अशी स्थिती निर्माण होते. देशातील कोट्यवधी नागरिक अशा फसवणूक करणार्‍या कंपन्यांकडून आपले मुद्दलतरी मिळावे, यासाठी लढत आहेत. अशा अनेक कंपन्यांचे मालक सध्या तुरुंगात असून त्यांच्याकडून ती रक्कम मिळण्याची शक्यता कमी कमी होते आहे. जे यातून वाचले, त्यांनी त्यातून एकच धडा घ्यायचा आहे, तो म्हणजे जे आपल्याला कळत नाही, त्यागोष्टीत गुंतवणूक करण्याच्या फंदात पडण्याचे काही कारण नाही.
 
क्वाड्रिगा-सीएक्स ही कॅनडाची कंपनी आहे आणि त्यातील साडे तीन लाखावर खातेदार हे तेथीलच आहेत. कॉटनचे भारतात निधन झाल्यामुळे ही घटना आपल्याला कळली, नसता तिची माहितीही आपल्याला झाली नसती. जेथे आर्थिक साक्षरता खूप आहे, असे आपण म्हणतो, अशा त्या विकसित देशात आर्थिक लोभासाठी नागरिक वेडे झाले असून कोणतेही काम न करता मिळणारा पैसा त्यांना हवा आहे. जगात अशा 237 कंपन्या आहेत, ज्यांना ‘क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंज’ म्हणून मान्यता आहे, यावरून क्रिप्टोकरन्सीचा वापर किती वेगाने वाढला आहे, याची कल्पना यावी. गंमत म्हणजे मुळात अशी करन्सी कोणी व्यवहारात आणली, याविषयी प्रचंड संभ्रम असताना आणि जगातील बहुतांश सरकारांनी ती नाकारली असताना तिचा गुंतवणूक म्हणून सर्रासवापर सुरू आहे. याचा एक अर्थ असा की सरकारांच्या चलनावर नागरिकांचा विश्वास कमी झाला आहे. दुसरा अर्थ असा की काम न करता पैसा अधिक हवा, हीहाव जगभर वाढत चालली आहे. आणि तिसरा अर्थ असा की जगात एकच चलन असावे, अशी एक सुप्त गरजही यातून व्यक्त होते आहे.
 
क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंजचे काम ब्लॉकचेन या तंत्रज्ञानावर आधारित आहे. ते तंत्रज्ञान असे आहे, ज्यात मानवी हस्तक्षेप अजिबात नाही. या करन्सीचे व्यवहार करणार्‍यांनी फक्त आपला पासवर्ड सांभाळायचा आणि आपले व्यवहार करत राहायचे, असे अपेक्षित आहे. पण पासवर्ड जर हरवला तर तुमचे सर्व पैसे पाण्यात गेले, असे समजायचे आणि ती हानी अक्कलखाती जमा करायची. भारतासाठी डिजिटल व्यवहारच अजून नवीन आहेत आणि त्याचे पासवर्ड सांभाळताना भारतीय नागरिकांची त्रेधा उडते आहे. त्यामुळे भारतात ज्यांनी डिजिटल व्यवहार चांगले समजून घेतले आणि ज्यांच्याकडे पैसे पडून आहेत, असे हजारो नागरिक क्रिप्टोकरन्सीच्या खरेदी विक्रीचे व्यवहार करत आहेत.त्यातील काहींनी चांगली कमाईही केली आहे. त्यांची संख्या नेहेमीच कमी असते.पैसे कमावण्याचे नवे नवे फंडे येतात आणि लाखो नागरिकांची लूट करून निघून जातात. डिजिटल व्यवहार ज्यांना अजून पुरेसे कळत नाहीत, असे भारतीय नागरिक त्यात पडले तर मात्र त्यांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.
 
क्वाड्रिगा-सीएक्स या क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंजचे जे झाले, ते अशा सर्व एक्स्चेंजचे होईल, असा याचा अर्थ अजिबात नाही. कारण या तंत्रज्ञानात अजिबात खोट नाही. म्हणूनच ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा भारतीय बँका आणि सरकार मोठ्या प्रमाणावर वापर करू लागले आहे. जमिनीचे रेकोर्ड या तंत्रामुळे बिनचूक होणार आहे आणि असे अनेक फायदे विविध क्षेत्रात होणार आहेत. इंटरनेटने जसे जग बदलून टाकले, तसेच ब्लॉकचेन तंत्रज्ञानात जग बदलून टाकण्याची ताकद निश्चितच आहे. मात्र तंत्रज्ञानाला चांगल्या हेतूची जोड नसेल िंकवा ती वापरणारी मंडळी चांगली नसतील, तर काय होऊ शकते, याची चुणूक या घटनेत जगाला पाहायला मिळाली आहे. क्रिप्टोकरन्सीच्या विश्वासार्हता आणि सुरक्षिततेवर एक प्रश्नचिन्ह लावण्याचे काम तर या घटनेने केलेच आहे. आता ते प्रश्नचिन्ह आहे, तोपर्यंत तरी आपण त्याचा मोह टाळला पाहिजे. जेथे बँकेतील एफडी, म्युच्युअल फंड, शेअर बाजारात गुंतवणूक करण्याच्या प्रचंड संधी आहेत, अशा भारतात तरी हा मोह टाळलेलाच बरा!
-यमाजी मालकर