डीटोनेटरच्या स्फोटात वेकोलि कर्मचारी जखमी
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :10-Feb-2019
चंद्रपूर, 
येथील भटाळी खुल्या खदानीमध्ये डीटोनेटरचा स्फोट झाल्याने वेकोलि कर्मचारी जखमी झाल्याची घटना आज दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. रमेश बालाजी इटनकर असे जखमी कामगाराचे नाव आहे.
 
 
 
चंद्रपूर महानगरात असलेल्या भटाळी खुल्या खदानीमध्ये स्फोटासाठी डिटोनेटरचा वापर केला जातो. रमेश इटनकर हा कामगार डीटोनेटर असलेला बॉक्स घेऊन जात असताना अचानक मोठा स्फोट झाला. या स्फोटामध्ये इटनकर गंभीररीत्या जख्मी झाले. जखमी कामगाराला वेकोलि कर्मचार्‍यांनी वेकोलिच्या रूग्णालयात दाखल केले. प्रकृती चिंताजनक असल्याने जखमी कामगाराला नागपुरला हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरवणीवर आला असून, वेकोलिचे दुर्लक्ष होत असल्याने कामगारांत संताप व्यक्त केला जात आहे.