फुगा फुटला की होऽ!
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :10-Feb-2019
दोन आठवड्यांपूर्वी अचानक कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी, आपली भगिनी प्रियांका वाड्रा हिला पक्षाची महासचिव म्हणून नेमले आणि माध्यमातील व राजकीय विश्लेषणात लुडबुडणार्‍या अनेकांना डोहाळे लागले होते-आता उत्तरप्रदेश, प्रियांका एकहाती राहुलना िंजकून देणार असल्याची दिवास्वप्ने अनेकांना त्या माध्यान्हीला पडलेली होती. गमतीची गोष्ट म्हणजे तेव्हा खुद्द प्रियांका भारतात नव्हती व पतीसह परदेशी होती. दरम्यान, प्रियांकाचा पती रॉबर्ड वाड्रा याने न्यायालयात धाव घेतलेली होती. आपल्याला सक्तवसुली संचालनालयाचे समन्स येण्याच्या भयाने त्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर राहुलने त्याच्या पत्नीची पक्षात नेमणूक केलेली होती. हे सत्य दडपण्यासाठी मग प्रियांका पक्षात आली, याचा डंका पिटण्याचा उद्योग सुरू झाला. त्यामागे प्रियांकाच्या कौतुकापेक्षाही वाड्राची घबराट झाकणे, हा मुख्य हेतू होता. तो साधण्यासाठी मग उत्तरप्रदेश प्रियांकाच्या करिष्म्याने िंजकण्याचे वेगवेगळे युक्तिवादही सादर झाले. पण, जितका आत्मविश्वास अशा भुरट्या पत्रकार विश्लेषकांना होता, तितका खुद्द प्रियांका वा राहुलना तरी होता काय? आहे काय? असता तर त्याचे प्रतििंबब त्यांच्याच बैठकीत पडायला हवे होते. पण, तिथेच तर विश्लेषकांनी फुगवलेला फुगा फुटलेला आहे. कारण विश्लेषक पत्रकारांना लागलेल्या डोहाळ्याचे बाळंतपण उरकण्यापूर्वीच राहुलने त्यांचा गर्भपात करून टाकलेला आहे. उत्तरप्रदेशात पुढल्या दोन महिन्यांत प्रियांका काही चमत्कार घडवील, अशी आपली अजीबात अपेक्षा नाही, असे राहुल यांनी पक्षाच्या बैठकीत सांगून टाकलेले आहे. ज्याला दोन आठवडे करिष्मा म्हणून गाजवले, तो फुसका बारच ठरला ना मग? चमत्कार घडवू शकत नाही, त्याला विश्लेषक पत्रकार करिष्मा कधीपासून म्हणू लागले? कोणी त्याचा खुलासा करणार आहे काय?
 
 
 
 
मागील दोन आठवड्यांत यावर खूप चर्वितचर्वण झालेले आहे. प्रियांकाचा चेहरा कसा आजी इंदिराजींसारखा आहे आणि त्यांचा जनमानसावर अजून कसा प्रभाव कायम आहे, अशा कहाण्यांना ऊत आलेला होता. िंकबहुना उत्तरप्रदेशात आता प्रियांका, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात वाराणशीत ठाण मांडून बसेल आणि भाजपाचा हुकमी प्रचारक कसा आपल्याच मतदारसंघात अडकून पडणार, याच्या मनोवेधक कहाण्याही रंगवल्या गेल्या होत्या. एका वाहिनीने तर पूर्व उत्तरप्रदेशात भाजपाचे कोण कोण प्रभावी नेते आहेत आणि प्रियांकाच्या आगमनाने त्यांची कशी अडचण येत्या लोकसभा निवडणुकीत होणार, त्याचीही जंत्री सादर केलेली होती. पण, त्यांनी आपली हीच विद्वत्ता व अभ्यास राहुलपर्यंत पोहोचेल अशी कुठली काळजी घेतली नाही. अन्यथा राहुलने अपेक्षा कशाला सोडल्या असत्या? प्रियांकाच्या नेमणुकीची घोषणा झाल्यावर कमरेचे सोडून थयथया नाचू लागलेल्यांना ती महिला परदेशातून मायदेशी येण्यापर्यंत कळ काढता आली नाही. प्रियांका खुद्द आपल्या कामाची सूत्रे हाती घेण्यासाठी लखनौला जाईपर्यंत संयम राखता आला नाही. त्यांनी घाईगर्दीने उत्तरप्रदेशचे निकालही लावून टाकलेले होते. फार कशाला, मागील चार महिने आपणच उत्तरप्रदेशात अखिलेश आणि मायावती यांच्या महागठबंधनाला बहुतांश लोकसभेच्या जागा वाटून दिलेल्या आहेत आणि प्रियांकाने िंजकण्यासाठी तिथे अधिकच्या जागा आपणच आपल्या विश्लेषणात शिल्लक ठेवलेल्या नाहीत, याचेही भान असल्या अभ्यासकांना उरलेले नव्हते. कालपर्यंत अखिलेश-मायावतींनी ऐंशीतल्या 76 जागा वाटून घेतल्या असतानाही, त्या दोघांचे महागठबंधनही स्मरणात राहिले नाही. या अशा शहाण्यांचा अभ्यास मान्य करायचा, तर उत्तरप्रदेशात दीड-दोनशे जागाच असायला हव्यात. पण, आता आपल्याच अशा बडव्यांची राहुलनीच बेअब्रू करून टाकली आहे. प्रियांका कुठलाही चमत्कार घडवू शकत नसल्याची ग्वाही राहुल देत आहेत.
ही वस्तुस्थिती आहे. राहुलनाही खात्री आहे, की त्यांची भगिनी उत्तरप्रदेशच काय, उरलेल्या देशातही काहीही चमत्कार घडवू शकत नाही. ते शक्य असते, तर विधानसभा वा पूर्वीच्या लोकसभेतही प्रियांका तिथेच होती आणि काही करू शकली असती. उलट, प्रियांका नसताना वा काही खास राजकारण करीत नसतानाही तिने कॉंग्रेसच्या असलेल्या जागा गमावण्यापलीकडे काहीच केलेले नाही. करिष्मा असेल तर तो रॉबर्ट वाड्रापाशी आहे. या जावयाने कुठलाही कामधंदा न करता कोट्यवधी रुपयांची माया व संपत्ती मात्र गोळा करून दाखवलेली आहे. िंकबहुना तीच माया चव्हाट्यावर येऊ लागल्याने प्रियांका आपल्या पतीच्या बचावाला राजकीय आखाड्यात उतरलेली आहे. तिनेही ते साफ सांगून टाकलेले आहे. आपण पतीच्या पाठीशी ठाम उभे असल्याचे सांगून प्रियांका थांबलेली नाही. पतीवर अफरातफरीचे गंभीर आरोप असताना आणि त्याला चौकशीला सामोरे जावे लागत असताना, प्रियांका पक्ष कार्यालयाच्या आधी वाड्राला सोडायला ईडीच्या कार्यालयाकडे गेलेली होती. तिथून मग कॉंग्रेस कार्यालयात आलेली होती. आपण कॉंग्रेसचे उत्तरप्रदेशात पुनरुज्जीवन करण्यासाठी पक्षात आले नसून, घोटाळ्यात अडकलेल्या पतीला पक्षाची राजकीय कवचकुंडले मिळावी म्हणून कॉंग्रेस सचिव झाल्याचे, या पतिव्रतेने कृतीतून दाखवून दिलेले आहे. आपल्यालाही कॉंग्रेसच्या पुनरुज्जीवनासाठी बहिणीची मदत नको असून, जिजाजीला वाचवण्यासाठी कॉंग्रेस पक्षाची अब्रू पणाला लावायची आहे, हे राहुलनाही सांगायचे आहे. पण, हयात बडवेगिरी करण्यात गेलेल्यांना पांडुरंग काय म्हणतो, त्याच्याशी कुठे कर्तव्य असते ना? ही आजच्या राजकीय अभ्यासक व पत्रकार संपादकांची दुर्दशा आहे. आपली सामान्य बुद्धीही वापरण्याची त्यांना भीती वाटू लागलेली असून ते नुसत्या आरत्या ओवाळण्यातच धन्यता मानू लागले आहेत. अन्यथा त्यांनी प्रियांकाचा फुगा इतका मोठा कशाला फुगवला असता?
 
 
 
 
ज्या दिवशी प्रियांकाची महासचिव म्हणून नेमणूक झाली, त्यानंतर तिचा खरा करिष्मा पक्षापेक्षाही माध्यमात आणि बुद्धिवादी वर्गात दिसला होता. कॉंग्रेस मरगळली आहे आणि तिच्यापाशी संघटनात्माक बळ उरलेले नाही, याचे भानही यापैकी एकाही अभ्यासकाला उरलेले नव्हते. म्हणून मग राजकीय वास्तविकता बघण्यापेक्षा प्रियांकामध्ये इंदिराजी शोधण्याचे खुळ सुरू झाले. अमेठी-रायबरेलीत प्रियांकाच प्रचार करीत असताना 2007, 2012 आणि 2017 च्या विधानसभा निवडणुकांत तिचे अपयश ढळढळीत समोर आहे. पण, करिष्मा म्हणून थापा मारण्यात सगळे दंग झालेले होते. क्वचित त्यांच्याच आहारी जाऊन राहुलनी आरंभी, आपण उत्तरप्रदेश 2022 सालात कॉंग्रेसला एकहाती िंजकून देण्यासाठीच प्रियांकाला आणल्याचे बोलून टाकलेले होते. िंकबहुना महागठबंधनात अखिलेश-मायावतींनी सोबत घेतले नाही, तरी स्वबळावर लढण्यासाठी प्रियांकाला मदतीला घेतल्याचा दावा राहुलनी केला. पण, त्यामुळे वस्तुस्थिती बदलत नाही. हे लक्षात आल्यावर पप्पूनेही हात आवरता घेतला आणि प्रियांका चमत्कार घडवू शकत नसल्याचे बोलून टाकलेले आहे. पण, तिकडे लक्ष कोणाचे आहे? अभ्यासकांना तर देशव्यापी करिष्मा दिसलेला आहे. अर्थात, कर्तृत्व संपलेले असले म्हणजेच करिष्मा वा चमत्काराच्या आशेवर जगावे लागत असते ना? कष्टाला सज्ज असलेल्यांनाही चमत्कार हवा असतो. पण, ते त्याच्यावर विसंबून राहात नाहीत. मेहनतसुद्धा करीत असतात. राहुलसह पुरोगामी मंडळी आजकाल कमालीची श्रद्धाळू झालेली आहेत. त्यांचा मानवी कर्तृत्वावरचा विश्वास साफ उडालेला आहे. त्यामुळेच प्रियांका वा अन्य कुठल्या वाड्रापुत्राच्या करिष्म्याने कॉंग्रेसचे पुनरुज्जीवन होईल, असले नवससायास करण्याखेरीज त्यांच्याहीपाशी कुठला पर्याय उरलेला नाही. आणखी दहा वर्षांनी त्यापैकी अनेक जण वाड्रापुत्र रेहानच्या करिष्म्याविषयी बोलताना-लिहिताना दिसले, तरी नवल वाटायचे कारण नाही. सध्यातरी त्यांच्या भविष्य-भाकितावर राहुल गांधींचादेखील विश्वास उरलेला नाही, हे सत्य आहे. कारण, त्यांनी तसे पक्षपदाधिकार्‍यांच्या बैठकीतच बोलून दाखवल्याचे वृत्त आलेले आहे.