राज्यात तापमानाचा पारा घसरला; नाशिकमध्ये गारपिटीची शक्यता
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :10-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
 
मागील काही दिवसांमध्ये तापमानात कमालीची घट झाली आहे. दिल्लीमध्ये झालेली गारपीट आणि उत्तरेकडून येणाऱ्या बोचऱ्या वाऱ्यामुळे राज्यातील तापमानाचा पारा घसरला आहे. राज्यासह मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात घट झाली आहे. तसेच मध्य महाराष्ट्र, विदर्भासह मराठवाडाही गारठले आहे.
 
 
नाशिक जिल्ह्यात गोदाकाठचे तापमान शनिवारी पहाटे शून्य अंश सेल्सिअस झाले होते.  मुंबईचे किमान तापमान ११ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले. मुंबईचे हे सर्वाधिक कमी किमान तापमान आहे. मागील चार दिवसात मुंबईचे कमाल तापमान ३४ अंशावरून थेट २४ अंशावर घसरले. राज्यातील नीचांकी तापमान ४ अंश सेल्सिअस नाशिकमध्ये नोंदविण्यात आले, तर पुण्यात या हंगामातील नीचांकी ५.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नाशिकमध्ये दोन वृध्दांचे थंडीने गारठून मृत्यू झाले. 
 
 
दिवसासह रात्री वाहणारे थंड वारे कमाल आणि किमान तापमान घसरण्यास कारणीभूत आहेत. रविवारी नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात शीतलहर तर मंगळवारी नाशिक जिल्ह्यात गारपीट होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. १० फेब्रुवारी रोजी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, गोवा, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहील. ११ ते १२ फेब्रुवारीदरम्यान कोकण, गोवा, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शनिवारसह रविवारी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश मुख्यत: निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे २५, १३ अंशाच्या आसपास राहील. रविवारीही मुंबईचे किमान तापमान १३ अंशाच्या आसपास राहील, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.