भारताला मिळाले ‘चिनुक’ हेलिकॉप्टर्स; लवकरच हवाई दलात समावेश होणार
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :10-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
 
गांधीनगर, 
 
 
अमेरिकेसोबत झालेल्या करारानुसार, या देशातून ‘चिनुक’ हेलिकॉप्टर्सची पहिली खेप भारतात दाखल झाली आहे. गुजरातच्या मुंद्रा विमानतळावर हे हेलिकॉप्टर्स पोहोचले आहेत. यामुळे भारताची क्षमता कितीतरी पटीने वाढणार आहे.
 
 
हे ‘चिनुक’ हेलिकॉप्टर्स भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. सियाचीन आणि लडाख अशा कठीण हवामानाच्या ठिकाणी हे हेलिकॉप्टर्स हवाई दलासाठी उपयुक्त ठरणार आहे. ऑगस्ट 2017 मध्ये भारत सरकारने अमेरिकेकडून अपाचे हेलिकॉप्टर्स व चिनुक हेलिकॉप्टर्स खरेदी करण्याचा करार केला होता. याच वर्षी सर्व हेलिकॉप्टर्स भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात दाखल होतील, अशी अपेक्षा हवाई दलाने व्यक्त केली आहे.
 
 
‘बोईंग सीएच-47 चिनुक’ हे अमेरिकी सैन्यदलाच्या ताफ्यातील अवजड मालवाहू हेलिकॉप्टर आहे. मागे आणि पुढे अशा दोन्ही बाजूंना असलेले आणि एकमेकांच्या विरुद्ध दिशेने फिरणारे दोन मोठे रोटर (पंखे) हे त्याचे वैशिष्ट्य आहे. अमेरिकी सैन्यदलांना 1956 मध्ये जुन्या सिकोस्की सीएच-37 या मालवाहू हेलिकॉप्टर्सची जागा घेणारे नवे हेलिकॉप्टर हवे होते. चिनुकने ही उणिव दूर केली. ऑगस्ट 1962 मध्ये हे हेलिकॉप्टर अमेरिकन सैन्य दलात दाखल झाले, तेव्हापासून ते सुमारे 17 देशांच्या हवाई दलांत प्रभावीपणे कार्यरत आहे.