तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताचा पराभव; मालिकाही गमावली
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :10-Feb-2019
 - रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा व्दिपक्षीय मालिका गमावली    
 

  
हॅमिल्टन,
 न्यूझीलंडमध्ये टी-२० सामन्यांची मालिका जिंकण्याचे भारतीय संघाचे स्वप्न आजही अपूर्ण राहिले असून न्यूझीलंडने तिसरा सामना ४ धावांनी जिंकून मालिका २-१ अशी खिशात घातली. न्यूझीलंडने दिलेल्या २१२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला ६ बाद २०८ धावांपर्यंत मजल मारता आली. या पराभवाबरोबर भारताची सलग १० टी-२० मालिकेत अपराजित राहण्याची मालिका खंडित झाली. यासोबतच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने प्रथमच टी-२० मालिका गमावली. भारताने यापूर्वी १० मालिकांमध्ये ९ विजय मिळवले, तर एक मालिका बरोबरीत राहिली होती. न्यूझीलंडने घरच्या मैदानावर भारताला टी-२० मालिकेत एकदाही विजय मिळवू दिलेला नाही. 
 
  
 
 
 
 
 
 
कॉलीन मुन्रो (७२) आणि टीम सेइफर्ट (४३) यांनी केलेल्या ८० धावांच्या सलामी भागीदारीमुळे अन्य फलंदाजांचे काम सोपे झाले. यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने २७ धावा केल्या, तर कॉलीन डी ग्रँडहोमने अखेरच्या षटकांत फटकेबाजी करत त्याने १६ चेंडूंत ३० धावा केल्या. आक्रमक फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने २० षटकात ४ बाद २१२ धावा केल्या. मिळालेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात निराशाजकनक झाली. सलामीवीर शिखर धवन लवकरच  बाद झाला. पहिल्याच षटकात मिचेल सँटनरने त्याला (५) धावांवर बाद केले. मात्र, कर्णधार रोहित शर्मा व विजय शंकर यांनी संघावर दडपण येऊ दिले नाही. या दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी ७५ धावांची भागीदारी केली. विजय २८ चेंडूंत ५ चौकार व २ षटकार खेचून ४३ धावांवर माघारी परतला.
 
 
त्यानंतर आलेल्या रिषभ पंतने जोरदार फटकेबाजी करताना धावा आणि चेंडू यांचे अंतर कमी केले. पंतने १२ चेंडूंत ३ षटकार व १ चौकार खेचताना २८ धावा केल्या. १३ व्या षटकात पंतला ब्लेर टिकनरने बाद केले. यानंतर हार्दिक पांड्याने फटकेबाजी केली, परंतु दुसऱ्या बाजूने रोहित संयमी खेळी करत होता. पण, रोहित, हार्दिक आणि महेंद्रसिंग धोनी हे झटपट माघारी परतल्यामुळे भारतीय संघाच्या अडचणी वाढल्या. कार्तिक खेळपट्टीवर असल्यामुळे भारताच्या विजयाच्या आशा पल्लवीत होत्या. कृणालनेही त्याला तोडीसतोड साथ दिली. पण त्यांना विजय मिळवण्यात अपयश आले.