अखेरच्या टी-२० मध्ये भारतीय महिला संघ पराभूत; स्मृतीची अर्धशतकीय खेळी व्यर्थ
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :10-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
भारतीय महिला संघाला न्यूझीलंडमध्ये अखेरच्या टी-20 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवामुळे भारतीय महिलांनी 3 टी-20 सामन्यांची मालिका 3-0 ने गमावली आहे. अंतिम सामन्यात न्यूझीलंडने विजयासाठी दिलेले 162 धावांचे आव्हान भारतीय महिला पूर्ण करु शकल्या नाहीत. स्मृती मंधानाने भारताकडून धडाकेबाज अर्धशतकी खेळी करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणून सोडले , पण आपली जबाबदारी पूर्ण करणे तिला शक्य झाले नाही. अखेरच्या सामन्यात संधी मिळालेल्या मिताली राजला एका चेंडूत 4 धावा काढून संघाला विजय मिळवून देण्याचे  आव्हान होते , मात्र ती देखील यामध्ये अयशस्वी ठरली. तिने 20 चेंडूंत नाबाद 23 धावा केल्या. 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
सोफी डेव्हिनच्या ( 72) फटकेबाजीच्या जोरावर न्यूझीलंड महिला संघाने तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात भारतीय महिलांसमोर 162 धावांचे आव्हान उभे केले . डेव्हियनने 52 चेंडूंत 8 चौकार व 2 षटकार खेचून 72 धावा केल्या. तिला कर्णधार अॅमी सॅटर्थवेट ( 31) आणि सुजी बेट्स ( 24) यांनी चांगली साथ दिली. भारताच्या दिप्ती शर्माने दोन विकेट घेतल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीवीर प्रिया पुनिया (1) पुन्हा अपयशी ठरली. त्यानंतर स्मृती मानधना व जेमिमा रॉड्रीग्ज यांनी भारताचा डाव सावरला. स्मृती आक्रमक खेळ करत होती, तर जेमिमा तिला तोलामोलाची साथ देत होती. या दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी 47 धावांची भागीदारी करताना संघाच्या धावांचा वेग वाढवला. स्मृतीने 33 चेंडूंत अर्धशतक पूर्ण  केले.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
स्मृती आणि जेमिमा यांची भागीदारी 9 व्या षटकात संपुष्टात आली. 17 चेंडूंत 3 चौकारांसह 21 धावा करणाऱ्या जेमिमाला किवी गोलंदाज डेव्हिनने बाद केले. स्मृती व जेमिमा यांनी तीन सामन्यांच्या या मालिकेत दुसऱ्या विकेटसाठी अनुक्रमे 98, 63 आणि 47 धावांच्या भागीदारी केल्या आहेत. त्यानंतर आलेली कर्णधार हरमनप्रीत कौरही ( 2) लगेच तंबूत परतली. त्यानंतर स्मृती व मिताली राज यांनी संयमी खेळ केला, परंतु 16 व्या षटकात ही जोडी फुटली. जबरदस्त फॉर्मात असलेली स्मृती 86 धावांवर माघारी परतली. स्मृतीने 62 चेंडूंत 12 चौकार व 1 षटकार खेचून 86 धावा चोपल्या. ट्वेंटी-20 क्रिकेटमधील तिची ही सर्वोत्तम खेळी ठरली.
 
 
 
त्यानंतर मिताली आणि दिप्ती शर्मा यांनी संघाला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. अखेरच्या षटकात विजयासाठी 16 धावांची गरज असताना मितालीने पहिल्याच चेंडूवर चौकार खेचला, तर दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली. त्यानंतर दिप्तीने खणखणीत चौकार खेचून धावा व चेंडू यातील अंतर कमी केले. पुढच्याच चेंडूवर दोन धावा घेत भारतीय खेळाडूंनी किवींच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण केले. हा सामना 1 चेंडू 4 धावांची गरज असताना मितालीला एकच धाव घेता आली. भारताला 2 धावांनी सामना गमवावा लागला.