कडाक्याच्या थंडीतही दीड कोटी भाविकांचे शाही स्नान; वसंत पंचमीनिमित्त सर्व घाटांवर प्रचंड गर्दी
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :10-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
प्रयागराज, 
 
 
 
 
प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यात वसंत पंचमीनिमित्त आयोजित आज रविवारच्या तिसर्‍या व शेवटच्या शाही स्नानासाठी भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती. कडाक्याच्या थंडीला न जमानता आज दिवसभरात सुमारे दीड कोटी भाविकांनी गंगा, यमुना आणि सरस्वती नदीच्या पवित्र संगमात डुबकी घेतली.
 
 
गेल्या आठवड्यात थंडीचा जोर ओसरला होता, पण तीन-चार दिवसांपासून थंडी पुन्हा परतली. तथापि, या थंडीला भाविका दाद दिली नाही. आज सूर्योदय होण्यापूर्वीच सुमारे 50 लाख भाविकांनी शाही स्नान केले होते. त्यानंतर दिवस जसजसा वर येत होता, तसतशी भाविकांची सं‘याही वाढत गेली. भाविकांच्या सुरक्षेसाठी कुंभनगरीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.
सायंकाळी पाच वाजेपर्यंत दीड कोटी भाविकांनी संगमात डुबकी घेतली. सात वाजेपर्यंत स्नानाची परवानगी असल्याने भाविकांचा हा आकडा दोन कोटींच्या घरात जाऊ शकतो, अशी माहिती कुंभ मेळ्याचे प्रशासकीय अधिकारी विजय किरण आनंद यांनी दिली.
सर्व आखाड्यांनी पहाटेलाच शाही स्नानाची औपचारिकता पूर्ण केली होती. त्यानंतर भाविकांना स्नानाची परवानगी देण्यात आली. हरहर गंगे आणि जय गंगामय्या असा जयघोष करीत भाविक संगमातील विविध घाटांवर डुबकी घेत होते. कुंभ मेळा प्रशासनाच्या मते, 9 फेबु‘वारीपर्यंत पवित्र संगमात 14.94 कोटी भाविकांनी डुबकी घेतली आहे. राज्य सरकारच्या सूत्रांनी मात्र हा आकडा त्यापेक्षाही कितीतरी जास्त असल्याचा दावा केला आहे.
 
 
महिलांचे आंघोळीचे फोटो प्रकाशित करण्यावर बंदी
 
दरम्यान, कुंभमेळ्यात पवित्र संगमात आंघोळ करणार्‍या महिलांचे छायाचित्र प्रसिद्ध करू नये, असा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने सर्वच प्रसारमाध्यमांना दिले आहे. या आदेशामुळे वृत्तपत्र, साप्ताहिक व अन्य नियतकालिकांना महिलांच्या आंघोळींचे फोटो प्रकाशित करता येणार नाही, तसेच टीव्ही वाहिन्यांनाही अशा प्रकारचे दृश्य व फोटो दाखवता येणार नाही.
न्या. पी. के. एस. बघेल आणि न्या. पंकज भाटिया यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले आहेत. आदेशाचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा न्यायालयाने दिला आहे. असीम कुमार असे नाव असलेल्या व्यक्तीने या संदर्भात याचिका दाखल केली आहे. यावर पुढील सुनावणी 5 एप्रिल रोजी होणार आहे.