मित्र बदलण्यात चंद्राबाबू जास्त अनुभवी; केंद्रीय निधीचा वापर करण्यातही आले अपयश; पंतप्रधान मोदी यांचा हल्ला
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :10-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
 
गुंटूर, 
 
 
 
चंद्राबाबू नायडू हे मला राजकारणात फार जास्त अनुभवी आहेत, पण त्यांचा अनुभव एकामागोमाग निवडणुका हरण्यात, सातत्याने मित्रपक्ष बदलणे आणि त्यांचे सासरे एन. टी. रामाराव यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा आहे. आंध‘प्रदेशच्या विकासासाठी केंद्र सरकारने भरपूर निधी दिला आहे, मात्र त्याचा वापर करण्यातही नायडू यांना अपयश आले आहे, असा जोरदार हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी येथे केला.
 
 
आंध‘प्रदेशचा विकास करण्याचे वचन त्यांनी राज्यातील जनतेला दिले होते, मात्र त्यांनी केंद्राच्याच योजनांना आपल्या नावाचे लेबल लावण्यास सुरुवात केली. प्रत्यक्षात त्यांनी स्वत: राज्याच्या विकासासाठी एकही योजना राबवली नाही. चंद्राबाबू आंध‘करिता विशेष राज्याचा दर्जा मागत आहेत, पण केंद्राने या राज्याला विशेष राज्याचा दर्जा असणार्‍या राज्यांपेक्षाही कितीतरी अधिक दिले आहे. आंध‘चा विकास करण्यासाठी हा निधी पुरेसा होता, तथापि यातही त्यांना अपयश आले, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी विशाल जाहीर सभेत बोलताना केली.
 
 
एन. टी. रामाराव यांनी आंध‘ला कॉंगे‘समुक्त करण्यासाठी तेलुगू देसम पार्टीची स्थापना केली आणि जावई नायडू यांनी आपल्याच सासर्‍याच्या विश्वासाला तडा देत, कॉंगे‘ससोबत आघाडी केली. आपण किती अनुभवी आहोत, याचे स्मरण चंद्राबाबू मला नेहमीच देत आले, मी देखील ही सत्यता मान्य केली, त्यांचा कधीच अपमान केला नाही. भविष्याला अंधारात कसे न्यायचे, यात तर त्यांचा हातखंडा आहे, असा आरोपही मोदी यांनी केला.
 
 
आपल्या सासर्‍यांचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी नायडू यांनी पार पाडायला हवी. कॉंगे‘सला गाडण्यासाठीच टीडीपीचा जन्म झाला असताना, नायडू यांनी मात्र त्याच पक्षाच्या नेतृत्वापुढे लोटांगण घातले, असेही पंतप्रधान म्हणाले.
नायडू यांनी राज्यातील गरिबांसाठी आजवर एकही नवीन योजना सुरू केलेली नाही, केवळ केंद्र सरकारने राबविलेल्या योजनांवर आपल्या नावाचे लेबल लावून, त्या पुढे रेटल्या आहेत, असा आरोपही त्यांनी केला.