उळे गावाजवळ पोलिस आणि दरोडेखोरांमध्ये चकमक; एक दरोडेखोर ठार
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :10-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
 
सोलापूर-तुळजापूर महामार्गावरील उळे गावाजवळ रविवारी पहाटेच्या सुमारास पकडलेल्या दरोडेखोराला सोडविण्यासाठी  बाकीच्या सहकाऱ्यांनी पोलिसांवर तलवारीने आणि दगडांनी हल्ला केला. तसेच स्वरक्षणासाठी पोलीस अधिकाऱ्याने केलेल्या गोळीबारात एक दरोडेखोर ठार झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास उळे गावाजवळ गस्त घालताना तालुका पोलिस स्टेशनच्या पोलिसांना पाच ते सहा दरोडेखोर दिसले. पोलिसांनी त्यांना हटकले. एकाला पकडून गाडीत घालत असताना तो दरोडेखोर पोलिसांना 'साहेब.. चुकले चुकले,' म्हणत होता. तेव्हाच त्याच्यासह इतर सहकाऱ्यांनी हातातील तलवारीने पोलीस निरीक्षक विजय पाटील यांच्या हातावर आणि मांडीवर तलवारीने हल्ला केला. यानंतर पोलिसांवर दगडफेक करण्यात आली.  
या हल्ल्यात विजय पाटील गंभीर जखमी झाले असून पाटील यांनी स्वरक्षणासाठी दरोडेखोरांवर गोळीबार केला. यात एक दरोडेखोर जखमी झाला आहे. त्याला जखमी अवस्थेत सिव्हिलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत्यू घोषित केले. दरम्यान, या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत.
 
 
 
 
 
 
 
दुसरीकडे, घटनास्थळी सकाळी दोन कार आढळल्या असून यातील एका गाडीचा क्रमांक एमएच-१३ एझेड / १७९८ असा आहे. एका गाडीच्या काचा फुटलेले आहे.