जन धन योजना 90 हजार कोटींच्या घरात;गरिबांचे विमा कवच दोन लाख
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :10-Feb-2019
 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
नवी दिल्ली, 
 
 
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी जन धन योजनेंतर्गत उघडण्यात आलेल्या बँक खात्यांमध्ये जमा झालेली रक्कम 90 हजार कोटी रुपयांच्या घरात गेली आहे. या योजनेंतर्गत देशभरातील गरिबांना उपलब्ध असलेले एक लाख रुपयांचे विमा कवच आता दोन लाख रुपये करतानाच, त्यात आणखी काही नव्या सुविधा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. 
 
जन धन योजनेतील खात्यांमध्ये जमा रकमेची आकडेवारी केंद्रीय अर्थमंत्रालयाने नुकतीच जाहीर केली. मार्च 2017 पासून या खात्यांमधील रकमेत सातत्याने आणि झपाट्याने वाढ होत असल्याचे यात दिसून आले आहे. 30 जानेवारी रोजी या खात्यांमधील रक्कम 89,257.57 कोटी रुपये इतकी हाती आणि त्यात आताही वाढ होत आहे, असे यात नमूद आहे. 23 जानेवारी रोजी हीच रक्कम 88,566.92 कोटी रुपये होती.
 
प्रधानमंत्री जन धन योजनेचा शुभारंभ 28 ऑगस्ट 2014 रोजी स्वत: पंतप्रधान मोदी यांच्याहस्ते करण्यात आला होता. देशभरातील सर्व गरिबांचे राष्ट्रीय बँकेत खाते असावे आणि त्यांना बँिंकग सुविधा उपलब्ध व्हाव्या, या उदात्त हेतूने ही योजना सुरू करण्यात आली आहे. सध्या या योजनेंतर्गत 34.14 कोटी खाती उघडण्यात आली आहेत. 28 ऑगस्ट 2018 नंतर या योजनेंतर्गत खाते उघडणार्‍या नागरिकांना दोन लाख रुपयांचे विमा कवच देण्यात येणार आहे. याशिवाय, ओव्हरड्रॉफ्टची मर्यादाही 10 हजार रुपये करण्यात आली आहे. ही योजना सुरू झाल्यानंतरही अद्याप ज्यांनी आपले खाते उघडले नाही, त्यांना त्यासाठी प्रोत्साहित करण्याकरिता सरकारने काही नव्या सुविधा देण्याचाही निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 
25 मार्च 2015 पर्यंत या खात्यांमध्ये प्रती व्यक्ती सरासरी 1065 रुपये जमा होते, ही रक्कम आता प्रती व्यक्ती 2,615 रुपये इतकी झाली आहे. याचाच अर्थ लोक आपल्या या खात्यांमध्ये सातत्याने पैसा जमा करीत आहेत. यातील 53 टक्के खातेधारक महिला आणि 59 टक्के खातेधारक पुरुष आहेत. 27.26 कोटी खातेधारकांना रुपे डेबिट कार्डचे वाटप करण्यात आले आहे.