...म्हणून कोहली सर्वांना आवडतो- शेन वॉर्न
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :11-Feb-2019
मुंबई, 
भारतीय कर्णधार विराट कोहलीची फलंदाजी मला खूप आवडते. मी त्याचा चाहता आहे. त्याला ज्यात विश्वास आहे, त्याकरिता तो खंबीरपणे उभा राहतो. कोहलीचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्याला जे वाटते, तो तेच बोलतो व ते वास्तविक आहे. तो भावुक आहे. अनेकदा मैदानावरसुद्धा तो थोडा भावुक होतो. त्याच्या बोलण्यात प्रामाणिकपणा आणि ताजेपणा असतो, त्यामुळे त्याने बोलत राहावे व आपण ऐकतच राहावेसे वाटते, त्यामुळेच क्रिकेट जगतात त्याचे फार प्रशंसक आहे, अशा शब्दात ऑस्ट्रेलियाचा माजी जादुई फिरकीपटू शेन वॉर्न याने कोहलीची प्रशंसा केली.
 

 
 
शेन वॉर्नने आपल्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्सला इंडियन प्रीमियर लीगचे पहिले विजेतेपद जिंकून दिले होते. आता शेन वॉर्नला आगामी इंडियन प्रीमियर लीगसाठी राजस्थान रॉयल्सने ब्रँड अँबेसेडर म्हणून घोषित केले आहे. यावेळी राजस्थान रॉयल्सच्या ड्रेसचा रंग बदलण्यात आला असून खेळाडूंचा पोषाख गुलाबी रंगाचा राहणार आहे.
 
सचिन तेंडुलकर व विराट कोहलीपैकी एकाला निवडण्यास सांगितले तर तु कोणाला निवडशील असा सवाल केला असता शेन वॉर्न म्हणाला की, कुणा एकाला निवडणे बरेच अवघड आहे. कारण दोघांचा काळ वेगळा आहे. नव्वादच्या दशकातील गोलंदाज आणि आताच्याही गोलंदाजांमध्ये फरक आहे. परंतु कोहली विद्यमान काळात संघाचा सर्वोत्तम लीडर आहे.
 
भारत व इंग्लंड हे आगामी विश्वचषकाचे प्रबळ दावेदार आहेत. ऑस्ट्रेलियाची संधी योग्य संघनिवडीवर अवलंबून आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाला सध्या आपली प्रतिष्ठा परत मिळविण्याची गरज आहे, असे तो म्हणाला.