युपीत काँग्रेसचे सरकार स्थापन करण्याचे लक्ष्य- राहुल गांधी
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :11-Feb-2019
 
 
 
 
लखनौ,
  आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी उत्तर प्रदेशकडे सर्वाधिक लक्ष केंद्रीत केले आहे. लोकसभेच्या ८० जागा असलेला उत्तर प्रदेश सत्ता स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावतो. राहुल यांनी या राज्याची जबाबदारी बहिण प्रियांका आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे सोपवली आहे. यानंतर आज काँग्रेसने लखनौमध्ये मोठा रोड शो केला. यामध्ये राहुल गांधींसह प्रियांका गांधी आणि ज्योतिरादित्य सिंधिया उपस्थित होते. दिल्ली काबीज करण्यासाठी आधी उत्तर प्रदेश काबीज करा, असा स्पष्ट संदेश प्रियांका आणि ज्योतिरादित्य यांना राहुल यांनी दिला. याशिवाय येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी कामाला लागण्याच्या सूचनादेखील दिल्या.
  
काँग्रेस पक्षाची सुरुवात उत्तर प्रदेशातून झाली. त्यामुळे या राज्यात पक्ष कमकुवत राहू शकत नाही, असे राहुल गांधी म्हणाले. त्यांनी लखनौमधील रोड शोनंतर पक्ष कार्यालयाजवळ कार्यकर्त्यांशी संवाद साधला. 'उत्तर प्रदेशात काँग्रेस मजबूत करण्याचे काम प्रियांका आणि ज्योतिरादित्य यांना देण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे सरकार स्थापन करणे आमचे लक्ष्य आहे. प्रियांका, सिंधिया यांच्यासह काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी एक ध्येय समोर ठेवावे,' असे राहुल म्हणाले. 
आम्ही सर्व आव्हानांना निर्भिडपणे सामोरे जाऊ. कारण ही लढाई विचारधारेची आहे. एका बाजूला काँग्रेस आहे. प्रेम, बंधूभाव ही आमची विचारधारा आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजपा आणि नरेंद्र मोदींची विचारसरणी आहे. देश तोडायचा, द्वेष निर्माण करायचा, देशाला कमकुवत करायचं हाच त्यांचा प्रयत्न आहे, अशी टीका राहुल यांनी केली. मोदींनी पाच वर्षात काय केले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. दरवर्षी २ कोटी तरुणांना रोजगार देऊ, असे मोदी म्हणाले होते. मात्र शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले नाही, असे राहुल म्हणाले.