ममता, केजरीवालांसह नायडूंची १३ फेब्रुवारीला दिल्लीत रॅली
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :11-Feb-2019
 
नवी दिल्ली,
  ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल आणि एन. चंद्राबाबू नायडू १३ फेब्रुवारीला दिल्लीतील जंतर मंतर येथे रॅली आयोजित करणार आहेत. पश्चिम बंगाल, दिल्ली, आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी एकत्र येऊन 'हुकूमशाही हटवा, लोकशाही वाचवा' असे नाव रॅलीला देण्यात आले आहे. भाजपाविरोधी पक्षांतील काही इतर नेतेही रॅलीत सहभागी होणार असल्याचे आम आदमी पक्षातर्फे सांगण्यात आले आहे.
 

 
'भारतात राजकीय दृष्टीने सध्या निर्णायक स्थिती आहे. मोदी-शाह जोडगोळीने संविधान आणि लोकशाही संपवण्याचा घाट घातला आहे. 'संविधान आणि लोकशाही'साठी देशातील हजारो स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणार्पण केले आहे. ते वाचवण्यासाठी उभे राहणे हे आज प्रत्येक देशप्रेमी भारतीयाचे कर्तव्य आहे. यासाठी केजरीवाल, ममता, नायडू एकत्र आले आहेत,' असे आप नेते गोपाल राय यांनी म्हटले आहे.
'१३ फेब्रुवारीला 'हुकूमशाही हटवा, लोकशाही वाचवा' रॅलीला तीनही राज्यांचे मुख्यमंत्री संबोधित करणार आहेत. भाजपाव्यतिरिक्त इतर पक्षांची सरकारे असलेल्या राज्यांना नरेंद्र मोदी व अमित शाह भेटी देत आहेत. तसेच तेथील जनतेला भाजपाकडे आकृष्ट करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. इतर भाजपा नेतेही तेच करत आहेत. मोदी सरकारने केंद्रीय संस्थांचा धूर्तपणे गैरवापर करून राजकीय विरोधकांची गळचेपी केली आहे. नियम आणि कायद्यांचा अनादर करण्याच्या सर्व मर्यादा या सरकारने पार केल्या आहेत,' असे राय यांनी म्हटले आहे.