पंकज अडवाणीला ३२ व्यांदा राष्ट्रीय स्नूकर जेतेपद
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :11-Feb-2019
नवी दिल्ली,
भारताचा आघाडीचा स्नूकरपटू पंकज अडवाणी याने युवा खेळाडू लक्ष्मण रावत याचा एकतर्फी लढतीत धुव्वा उडवत आणखी एका राष्ट्रीय विजेतेपदाची कमाई केली. राष्ट्रीय स्नूकर स्पर्धेचे विजेतेपद पटकावताना अडवाणीने ३२ व्यांदा राष्ट्रीय सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
 
 
 
अडवाणीच्या खात्यात आता ११ कनिष्ठ स्पर्धेची विजेतेपद, नऊ वेळा बिलियर्ड्सचा राष्ट्रीय विजेता, तीन वेळा सिक्स-रेड स्नूकर स्पर्धेचे विजेतेपद व नऊ वेळा स्नूकरचे विजेतेपद अशी ३२ राष्ट्रीय विजेतेपदे जमा आहेत. त्याचबरोबर अडवाणीने २१ वेळा जागतिक स्पर्धेची विजेतेपद पटकावली आहेत. अंतिम फेरीत अडवाणीने पूर्णपणे वर्चस्व गाजवित रावतवर ६-० अशी मात केली.
महिलांच्या अंतिम फेरीत बंगळुरूच्या वर्षा संजीवने महाराष्ट्राच्या अरांसा सांचीझ हिला ४-२ अशी धूळ चारत राष्ट्रीय विजेतेपदाला गवसणी घातली. वर्षाने उपांत्यपूर्व सामन्यात अमी कमानीला, तर उपांत्य सामन्यात विद्या पिल्ले हिचा पराभव करत या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.