14 हजारांवर रक्त पिशव्या संकलनाचा विक्रम - शिवसेना प्रथम, साईसार्थ फाऊंडेशन द्वितीय
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :11-Feb-2019
यवतमाळ,
वसंतराव नाईक जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात असलेल्या शासकीय रक्तपेढीने 2018 या गेल्या वर्षभराच्या कालावधीत तब्बल 14 हजार 4 रक्तपिशव्यांचे संकलन करून विक्रम प्रस्थापित केला आहे. गेल्या पाच वर्षांपासून दरवर्षी 10 हजारपेक्षा अधिक रक्त संकलन करण्याचा विक्रम या रक्तपेढीकडून सुरू आहे. राज्यात अव्वल रक्तदान झालेली रक्तपेढी म्हणून यवतमाळचा उल्लेख होतो. हे केवळ रक्तदात्यांमुळेच शक्य झाले असे महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मनीष श्रीगिरीवार यांनी सांगितले.
 
 

 
 
 
यवतमाळ शासकीय रक्तपेढीने 14,004 बाटल्या रक्त जमा करून महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तसेच एका दिवसात पाच रक्तदान शिबिरांसह, दोन मोठी रक्तदान शिबिरेही जिल्ह्यात घेण्यात आली. यवतमाळ शिवसेनेच्या वतीने आयोजित एका रक्तदान शिबिरात विक्रमी 800 बाटल्या रक्त गोळा केल्याबद्दल प्रथम क्रमांक, तर तालुकास्तरावर प्रथम क्रमांक साईसार्थ फाऊंडेशनद्वारा अध्यक्ष रवी िंशदे आयोजित दारव्हा येथील रक्तदान शिबिरात 367 बाटल्या रक्त गोळा केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. शिवसेनेच्या वतीने विकास क्षीरसागर यांनी, तर साईसार्थ फाऊंडेशनच्या वतीने भैरव भेंडे व नितीन कोल्हे यांनी सत्कार स्वीकारला. विविध सामाजिक संघटना व ऐच्छिक रक्तदाते, महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थ्यांचाही सत्कार डॉ. मनीष श्रीगिरीवार यांच्या हस्ते केला. प्रास्ताविक रक्त विभागप्रमुख डॉ. किरण भारती यांनी केले.
अधिक पारदर्शकता येणार
 
 
 
 
रक्त देण्यात पारदर्शकता निर्माण व्हावी म्हणून शासकीय रक्तपेढीसमोर डिजिटल बोर्ड लावण्यात येईल. यात उपलब्ध रक्त कोणत्या गटाचे किती बाटल्या आहे याची माहिती राहणार आहे. रक्तदान शिबिर आयोजित करणार्‍या सामाजिक संघटनांना, शासकीय रक्तपेढीत संपर्क साधून रक्तदान शिबिर आयोजनाची तारीख घ्यावी लागत होती. आता मात्र ऑनलाईन शिबिराची नोंदणी वैद्यकीय महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर करता येणार आहे. त्यावर नियोजित शिबिराची तारीख मिळणार आहे.