डिजिटल सातबारासाठी 15 रुपये शुल्क
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :11-Feb-2019
भंडारा,
डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा उतारा ऑनलाईन काढण्यासाठी आता 15 रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. मात्र ऑनलाईन सातबारा उतारा पाहण्यासाठी कोणतेही शुल्क लागणार नाही.
 
 
 
 
 
 
राज्य सरकारकडून ई-फेरफारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत डिजिटल सातबारा उतारा उपलब्ध करून देण्याचे काम भूमिअभिलेख विभागाकडून सुरू आहे. राज्यात सुमारे अडीच कोटी सातबारा उतारे आहेत. आतापर्यंत सुमारे 50 लाखांहून जास्त सातबारा उतार्‍यांचे डिजिटलायझेशन पूर्ण झाले आहे. डिजिटलायझेशन पूर्ण झालेले आणि त्या उतार्‍यावर स्वाक्षरी असलेले उतारे राज्य सरकारकडून ऑनलाईन माध्यमातून आतापर्यंत नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात आले. मात्र आता त्यासाठी पंधरा रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. लवकरच अंमलबजावणी होणार आहे. त्यासाठी भूमिअभिलेख विभागाची बँकांबरोबर चर्चा सुरू असून लवकरच करार करण्यात येणार असल्याचे समजते. या बँकांच्या माध्यमातून डिजिटल सातबारा उतार्‍यासाठी शुल्क भरण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध करून दिले जातील.
 
 
 
 
 
 
पूर्वीप्रमाणे तलाठ्याकडून डिजिटल सातबारा उतार्‍यासाठी शुल्क भरण्याचे विविध पर्याय उपलब्ध करून दिले जातील. पूर्वी तलाठ्याकडून डिजिटल स्वाक्षरी असलेला उतारा काढल्यानंतर 15 रुपये भरावे लागत होते. ऑनलाईन डिजिटल सातबारा उतारा काढल्यास नि:शुल्क मिळत होता. आता तलाठ्यांकडून सातबारा काढल्यानंतर 15 रुपयांपैकी दहा रुपये तलाठी आणि पाच रुपये राज्य सरकारला मिळतील. राज्यात दररोज 8 ते 10 हजार डिजिटल सातबारा, 8 अ, फेरफारच्या नकला काढल्या जातात. या माध्यमातून शासनाचा राजस्व वाढण्यास मदत होणार आहे.