कार्यकर्त्यांच्या योगदानातूनच भाजपाचा कारभार चालावा - पोते भरून देणग्या मान्य नाहीत : अमित शाह
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :11-Feb-2019
नवी दिल्ली,
निवडणूक निधीमध्ये पारदर्शकता आणि शुद्धता असावी. भाजपाचा कारभार केवळ पक्षाने दिलेल्या योगदानातूनच चालायल हवा, बिल्डर्स, ठेकेदार आणि काळा पैसा असलेल्यांकडून पोते भरून आलेल्या देणग्यांच्या बळावर नाही, असे स्पष्ट प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज सोमवारी येथे केले.
 
 

  
 
 
एकात्म मानववादाचे प्रणेते आणि जनसंघाचे संस्थापक पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या 51 व्या पुण्यतिथीनिमित्त भाजपातर्फे आयोजित कार्यक्रमात अमित शाह मार्गदर्शन करीत होते. सभ्यता आणि प्रामाणिकपणाच्या मार्गावर अन्य राजकीय पक्षांनीही वाटचाल करावी, यासाठी भाजपाने मार्गदर्शक म्हणून काम करायला हवे, असे सांगताना, देशातील प्रत्येक बूथवरील पक्षाच्या दोन कार्यकर्त्यांनी किमान पाच रुपये व कमाल एक हजार रुपये गोळा करून, नमो अॅपच्या माध्यमातून ही रक्कम पक्षाला द्यावी, असे आवाहन अमित शाह यांनी केले.
 
 
 
 
भाजपाचा कारभार उद्योगपतींच्या देणग्यांनी नव्हे, तर आमच्या घामाच्या पैशातून चालतो, असे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अभिमानाने सांगायला हवे, असे ते म्हणाले. तथापि, पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने, संपूर्ण संघटनात्मक आणि निवडणुकांवर होणारा खर्च कार्यकर्त्यांच्याच पैशातून भागू शकतो काय, असे मी ठामपणे सांगू शकत नाही. आजच्या काळात फक्त कार्यकर्त्यांच्या बळावर इतका खर्च करणे शक्य नाही, असे माझे मत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आपला हेतू जर शुद्ध नसेल, तर आपण शुद्ध मार्गाने अपेक्षित उद्दिष्ट कधीच साध्य करू शकणार नाही. पक्षाचा कारभार जर काळा पैसा साठविणार्‍या लोकांकडून चालायला लागला, तर आपल्या पक्षाची प्रतिमा जनमानसात डागाळली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
 
 
 
 
 
निवडणुकांवर होणारा खर्च कसा कमी केला जाईल आणि निवडणूक निधीमध्ये कशी पारदर्शकता आणली जावी, यावर राष्ट्रीय पातळीवर चर्चा होणे आवश्यक आहे, असे सांगताना ते म्हणाले की, निवडणुकांमध्ये काळ्या पैशाचा प्रभाव कमी करण्यासाठी मोदी सरकारने काही ठोस पावले उचलली आहेत. कोणताही राजकीय पक्ष दोन हजारांपेक्षा जास्त निधी देणगीच्या स्वरूपात स्वीकारू शकणार नाही, हा त्यातलाच एक निर्णय आहे.