पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी पांढरकवड्यात - महिला बचतगट संमेलनाला मार्गदर्शन करणार
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :11-Feb-2019
यवतमाळ,
यवतमाळ जिल्ह्यातील महिला बचतगट संमेलनाला मार्गदर्शन आणि उल्लेखनीय कामगिरी बजावणार्‍या गटांचा सन्मान करण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवार, 16 फेब्रुवारी रोजी पांढरकवडा येथे येत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय जलसंधारण व रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यावेळी उपस्थित राहतील, अशी माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर दिली.
 
 
 
 
 
येथील विश्राम भवनात रविवार, 10 फेब्रुवारी रोजी रात्री उशीरा झालेल्या या पत्रपरिषदेत जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार, आमदार राजू तोडसाम, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, वणी नगर परिषद अध्यक्ष तारेंद्र बोर्डे, प्रा. प्रवीण प्रजापती, नितीन गिरी, राजू पडगिलवार उपस्थित होते.
 
 
 
यवतमाळ जिल्हा महिला बचतगट संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रात आघाडीवर असलेला जिल्हा आहे. सध्या या जिल्ह्यात 17 हजार 018 महिला बचतगट असून सुमारे 2 लाख महिला त्याच्या सदस्य आहेत. विशेष म्हणजे, हे सर्वच बचतगट नियमित आणि सक्रिय असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. पंतप्रधानांनी त्यांच्या अतिशय लोकप्रिय अशा ‘मन की बात’ या कार्यक्रमात यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील एका महिला बचतगटाचा आवर्जून उल्लेख केला होता, हे विशेष.
 
 
 
 
महिला बचत गटांकडून निर्मिती होणार्‍या विविध उत्पादनांसाठी स्थायी स्वरूपाची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या मुख्य उद्देशाने यवतमाळातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर कृषी विभागाच्या जागेत 5 कोटी रुपये खर्च करून एका संकुलाची उभारणी केल्या जात असल्याची माहिती यावेळी पालकमंत्री मदन येरावार यांनी दिली.
 
 
 
2014 मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी आजचे पंतप्रधान व तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी याच चंद्रपूर-वणी लोकसभा मतदारसंघातील आर्णी तालुक्यात दाभडी येथे ‘चाय पे चर्चा’ हा कार्यक्रम घेतला होता. यावेळी लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी विदर्भातील, तसेच यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे घेत आहेत, हे उल्लेखनीय.