पाकिस्तानला सौदीच्या गुंतवणुकीचा आधार
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :11-Feb-2019
दुबई,
आर्थिक गर्तेत सापडलेल्या पाकिस्तानला गुंतवणुकीद्वारे आधार देण्यासाठी सौदी अरेबियाने पाकिस्तानातील तेलशुद्धीकरण कंपनीमध्ये 10 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचे निश्चित केले आहे. संरक्षणदृष्ट्या महत्त्वाच्या ग्वादर बंदरातील या रिफायनरीमध्ये ही गुंतवणूक केली जाणार आहे. पाकिस्तानसाठी महत्त्वाच्या असलेल्या चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडोरचे एक टोक या बंदरापर्यंत पोहोचणार आहे. भारताच्या सहकार्याने इराणमध्ये उभारण्यात येत असलेल्या चाबहार बंदरापासून ग्वादर बंदर जवळ आहे, हे विशेष.
 
 
 
 
 
या गुंतवणुकीच्या अनुषंगाने सौदीचे युवराज मोहम्मद बिन सलमान लवकरच इस्लामाबादला भेट देणार आहे. मात्र, त्यांच्या दौर्‍याची तारीख अद्याप ठरलेली नाही. याशिवाय सौदीच्या माध्यमातून आणखी काही मोठ्या प्रकल्पांतील गुंतवणुकीची घोषणाही युवराजांच्या या आगामी भेटीदरम्यान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सौदी अरब आणि संयुक्त अरब अमिराती हे मध्य-पूर्वेतील प्रमुख व्यापारी भागीदार आहेत. त्या दोन्ही देशांनी पाकिस्तानला 30 अब्ज डॉलर्स गुंतवणूक करण्याची हमी दिली आहे. दरम्यान, संयुक्त अरब अमिरातीने 3 अब्ज डॉलर्सची मदत पाकिस्तानच्या सुपूर्दही केली आहे.