प्रियांकाच्या ‘रोड शो’मुळे काँग्रेस - कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :11-Feb-2019
लखनौ,
काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्यानंतर प्रियांका वढेरा यांनी आज सोमवारी आपले लहान बंधू आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह उत्तरप्रदेशात आपला पहिलाच ‘रोड शो’ घेतला. त्यांच्या या राजकीय कार्यक्रमामुळे राज्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे.
 
 
 
 
 
 
प्रियांका राजकारणात सक्रीय होत असल्याने कॉंग्रेसने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. उत्तरप्रदेशात मरगळीच्या अवस्थेत असलेल्या काँग्रेसला संजीवनी देण्यासाठी प्रियांका यांचा रोड शो आज आयोजित करण्यात आला होता. उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी प्रियांकावर सोपविण्यात आली आहे. फुलांनी सजविलेल्या बसलाच रथासारखे सजवून त्यांनी हा रोड शो केला. यावेळी त्यांच्यासोबत सरचिटणीस ज्योतिरादित्य शिंदे, प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांच्यासह अन्य नेतेही उपस्थित होते.
 
 
‘बदलाव की आंधी, प्रियांका गांधी,’ अशा घोषणा रोड शोदरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या. लखनौमध्ये प्रियांका आणि राहुल यांचे पोस्टर्स लावण्यात आले. या रोड शोदरम्यान राहुल यांनी पुन्हा एकदा राफेल विमान कराराचा मुद्दा उपस्थित करून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत असभ्य भाषेचा वापर केला. रोड शो करीत असताना त्यांच्या हातात राफेल विमानाचे कटआऊट दिसत होते. यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभ्या असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना राहुल गांधी यांनी ‘चौकीदार चोर है’ अशा घोषणा देण्यास सांगितले.
 
 
आपण नव्या भविष्याची उभारणी करू, नव्या प्रकारचे राजकारण करू, असा संदेश प्रियांका यांनी रोड शो सुरू होण्यापूर्वी कार्यकर्त्यांना दिला. विमानतळापासून लखनौ येथील पक्षाच्या कार्यालयापर्यंत 15 किलोमीटर अंतराचा हा रोड शो होता. प्रियांका गांधी यांची एक झलक पाहण्यासाठी काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते आज सकाळपासूनच रोड शोच्या मार्गात गर्दी करून उभे होते. या मार्गावर काही ठिकाणी प्रियांका यांना िंसहावर बसलेल्या देवी दुर्गेच्या अवतारात दाखविणारे पोस्टर्सही लावण्यात आले होते. प्रियांका या दुर्गा देवीच्याच रूप आहेत, असे पोस्टर्सवर लिहिण्यात आले होते.