रॉबर्ट वढेरा उद्या ईडीपुढे हजर होणार- बिकानेरमधील भूखंड घोटाळा
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :11-Feb-2019
नवी दिल्ली,
राजस्थानच्या बिकानेर येथील भूखंड घोटाळ्याप्रकरणी सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा आणि त्यांची आई मौरीन उद्या मंगळवारी जयपूर येथे अंमलबजावणी संचालनालयापुढे हजर होणार आहे.
 
 

 
 
 
जयपूरच्या भवानीिंसह राठोड मार्गावरील ईडीच्या क्षेत्रीय कार्यालयात हजर होण्यासाठी या दोघांनाही ईडीने समन्स जारी केला आहे. त्यानुसार त्यांना उद्या सकाळी दहा वाजता हजर राहावे लागणार आहे, अशी माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली.
दरम्यान, वढेरा आणि त्यांची आई मौरीन दोघेही आज दुपारी जयपूर विमानतळावर दाखल झाले आहेत. ईडीपुढे चौकशीसाठी हजर होण्याची वढेरांची ही चौथी वेळ राहणार आहे. यापूर्वी तीनवेळा ते, विदेशात संपत्ती खरेदी करण्याच्या प्रकरणात दिल्लीतील ईडीच्या मुख्यालयात सलग तीन दिवस हजर झाले होते.
 
 
 
राजस्थान उच्च न्यायालयाने अलीकडेच वढेरा आणि त्यांच्या आईला, ईडीच्या चौकशीत सहकार्य करण्याचे आदेश दिले होते. आमच्याविरोधात कुठलीही कारवाई केली जाऊ नये, ही वढेरा व त्यांच्या आईची विनंतीही न्यायालयाने मान्य केली आहे.
भारत आणि पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या भागात रॉबर्ट वढेरांनी जमीन खरेदी केली. हा परिसर अतिशय संवेदनशील असल्याने, बिकानेरच्या तहसिलदारांनी या व्यवहारावर आक्षेप घेत पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी वढेरा यांच्याविरोधात अनेक एफआयआर दाखल केले. त्याच आधारावर ईडीनेही त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला होता.