मद्यधुंद ट्रॅव्हल्स चालकाने केला सात दुचाकींचा चुराडा
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :12-Feb-2019
वर्धा,
मद्यधुंद ट्रॅव्हल्स चालकाने निष्काळजीपणाने वाहन चालवून उभ्या कारला धडक दिली. ट्रॅव्हल्सचालक इतक्यावर थांबला नाही तर त्याने वाहनाची गती वाढवीत याच भागात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या सात दुचाकी आणि चार सायकलींचाही चुराडा केला. ही घटना आज दुपारी १ वाजताच्या सुमारास स्थानिक रेल्वे स्थानक मार्गावरील महावीर भोजनालयासमोर घडली. सदर अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रॅव्हल्सच्या काचा फोडून आपला रोष व्यक्त केला. शहर पोलिसांनी घटनास्थळ गाठून परिस्थितीवर नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला.
 

 
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक शास्त्री चौक येथून बजाज चौकाच्या दिशेने एम.एच. ३१ सी. क्यू. ५२०५ क्रमांकाची ट्रॅव्हल्स जात होती. याच भरधाव ट्रॅव्हल्सने सुरूवातीला एम.एच.३२ सी. ४१३१ क्रमांकाच्या कारला धडक दिली. त्यानंतर ट्रॅव्हल्सचालकाने सदर वाहनासह घटनास्थळावरून यशस्वी पळ काढण्याचा प्रयत्न केला. याच प्रसंगी सदर आरोपी ट्रॅव्हल्स चालकाने वाहनाची गती वाढवित रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकींसह चार सायकलींचा चुराडा करून महावीर भोजनालयाच्या पुढे असलेल्या विद्युत खांबाला धडक दिली.
 
या विचित्र अपघातात कुणी जखमी झाले नसले तरी अपघातग्रस्त ट्रॅव्हल्ससह कार, दुचाकी व सायकलींचे नुकसान झाले आहे. अपघात होताच संतप्त नागरिकांनी ट्रॅव्हल्सच्या काचा फोडून आरोपी ट्रॅव्हल्स चालकाला चांगलाच चोप दिला. अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि मार्शल पथकाने घटनास्थळ गाठून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.