भारत झाडे लावण्यात आघाडीवर
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :12-Feb-2019
वॉशिंग्टन:
अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासाने जाहीर केलेल्या ताज्या संशोधन अहवालातील निष्कषानुसार, भारत आणि चीन झाडे लावण्याच्या बाबतीत जगात सर्वात पुढे आहेत. सोमवारी जारी केलेल्या अहवालात असे म्हटले आहे, की जग २० वर्षं मागे जसे होते त्या तुलनेत अधिक हिरवंगार झाले आहे. हा अहवाल नासाच्या उपग्रहाकडून मिळालेली आकडेवारी आणि विश्लेषणावर आधारित आहे.
 

 
 
या अभ्यास अहवालाचे लेखक ची चेन म्हणाले, एक तृतीयांश वृक्षवल्ली चीन आणि भारतात आहे, पण पृथ्वीवरील जंगलांच्या एकूण जमिनीपैकी केवळ ९ टक्के जमीन या दोन देशांमध्ये आहे. चेन पुढे म्हणाले की जास्त लोकसंख्या असणाऱ्या या देशांमध्ये अधिक वापरामुळे जमीनीची धूप होणं साधारण बाब असताना पुढे आलेला हा अभ्यास अचंबित करणारा आहे.
 
 
 
 
नेचर सस्टेनेबिलिटी जर्नलमध्ये ११ फेब्रुवारी रोजी हा अभ्यास अहवाल प्रसिद्ध झाला. यानुसार, २००० ते २०१७ च्या ताज्या उपग्रह आकडेवारीनुसार, चीन आणि भारतात अधिक हिरवळ आहे. चीनमध्ये वृक्षवल्लीचे प्रमाण जगाच्या तुलनेत २५ टक्के तर वनीकरण क्षेत्र केवळ ६.६ टक्के आहे.
 
 
 
 
या अभ्यास अहवालात असे म्हटले आहे की चीनमध्ये वनक्षेत्र ४२ टक्के तर कृषीक्षेत्र ३२ टक्के असल्याने हिरवाई आहे, भारतात कृषीक्षेत्र ८२ टक्के असल्याने हिरवाई आहे. भारतात वनीकरण क्षेत्र केवळ ४.४ टक्के आहे. भारत आणि चीनमध्ये २००० नंतर खाद्य उत्पादनात ३५ टक्के वाढ झाली आहे.
 
 
 
 
नासाच्या टेरा तसेच अॅक्वा या उपग्रहांवरील रिझोल्युशन इमेजिंग स्पेक्ट्रोरेडिओमीटरच्या माध्यमातून घेतलेल्या २० वर्षांच्या माहिती संकलनाच्या अभ्यासानंतर ही निरीक्षणे नोंदवण्यात आली आहेत.