विदर्भविरुद्ध हनुमा विहारीचे शतक
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :12-Feb-2019
  •  इराणी करंडक क्रिकेट 
  •  शेष भारत सर्वबाद 330
नागपूर, 
सलामी फलंदाज मयंक अग्रवालच्या आक्रमक ९५ धावा व हनुमा विहारीच्या दमदार ११४ धावांच्या शतकी खेळीनंतरही शेष भारताचा विदर्भाविरुद्धच्या इराणी करंडक क्रिकेट सामन्यात पहिल्या दिवसअखेरीस पहिला डाव ८९.४ षटकात सर्वबाद ३३० धावात संपुष्टात आला.
 
 
 
व्हीसीए जामठा स्टेडियमवर आज मंगळवारी शेष भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. १ बाद १७१ अशा सुस्थितीनंतर शेष भारताने अवघ्या १५९ धावात उर्वरित नऊ फलंदाज गमावले. विदर्भाच्या फिरकी गोलंदाजांनी केलेल्या दर्जेदार गोलंदाजीमुळे शेष भारताचा डाव कोसळत गेला. डावखुरा फिरकीपटू आदित्य सरवटेने अजिंक्य रहाणे, हनुमा विहारीसह तीन फलंदाजांना बाद केले, तर अक्षय वखरेने ६२ धावात ३ बळी मिळविले. रजनीश गुरबानीने २, तर यश ठाकूर व अक्षय कर्णेवारने प्रत्येकी १ बळी टिपला.
 
मयंक अग्रवालने हनुमा विहारीच्या साथीने उपाहारापूर्वी विदर्भाच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजविले, परंतु विदर्भाने दुसर्‍या सत्रात जोरदार मुसंडी मारत धोकादायक ठरलेल्या मयंकसह शेष भारताच्या चार फलंदाजांना कोंडीत पकडले. उपाहारानंतर मयंक ९५ धावांवर बाद झाला. यानंतर अवघ्या ९२ धावांच्या मोबदल्यात ४ बळी मिळविल्याने विदर्भाच्या तंबूत चैतन्य निर्माण झाले. परंतु त्यानंतर सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेत हनुमा विहारीने संघाच्या धावसंख्येला आकार दिला. त्याने ७९ धावांची नाबाद खेळी करत शेष भारताला चहापानापर्यंत ५ बाद २३४ धावसंख्या गाठून दिली. यादरम्यान हनुमा विहारीने सरवटेच्या गोलंदाजीत दोन चौकार व एक षटकार हाणत आपले २८ वे प्रथम श्रेणी अर्धशतक साजरे केले.