संसदेच्या केंद्रीय दालनात अटलजींचे पूर्णाकृती तैलचित्र; राष्ट्रपती कोविंद यांनी केले अनावरण
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :12-Feb-2019
नवी दिल्ली, 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 
 
 
 
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज मंगळवारी संसदेच्या केंद्रीय दालनात उभारण्यात आलेल्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या पूर्णाकृती तैलचित्राचे अनावरण केले. अटलजींनी अतिशय कठीण परिस्थितीतून देशाला बाहेर काढले आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपतींनी यावेळी केले.
 
 
 
 
ज्यावेळी वाजपेयी यांनी देशाच्या पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली, तो काळ खरोखरच कठीण होता. अतिशय संयमाने या कठीण प्रसंगावर मात करून, वाजपेयी यांनी आगळाच आदर्श समाजापुढे प्रस्थापित केला, असे राष्ट्रपती म्हणाले. यावेळी आयोजित कार्यक‘मात उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद आणि अन्य राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते.
 
 
 
 
वाजपेयी म्हणजे सार्वजनिक जीवनाची जिवंत शाळाच होते. महामार्गांचा विकास आणि माहिती तंत्रज्ञान व दूरसंचार क्षेत्राला प्रगतीपथावर नेऊन, त्यांनी देशाच्या विकासाची गतीही प्रचंड वाढवली होती, असे त्यांनी सांगितले. राष्ट्रपती कोविंद यांनी यावेळी वाजपेयी यांचे पूर्णाकृती तैलचित्र तयार करणारे चित्रकार कृष्ण कन्हैय्या यांचाही सत्कार केला. या तैलचित्रात वाजपेयी धोतर, कुर्ता आणि काळ्या जॅकेटमध्ये दाखविण्यात आले आहे.
 
 
 
पंतप्रधान मोदी म्हणाले की, अटलजींसाठी राजकारणात कुणीही शत्रू नव्हते. लोकशाहीत फक्त विरोधक असतात, शत्रू नसतात. आपण आणि नव्या पिढीलाही ही बाब शिकण्याची गरज आहे. तर, उपराष्ट्रपती नायडू म्हणाले की, वाजपेयी अजातशत्रू होते. राजकारणात विरोधक असावेत, पण शत्रू नाही, हा त्यांचा सिद्धांत आजही प्रेरणा देणारा आहे. आजही जेव्हा राजकीय स्तर घसरतो, तेव्हा वाजपेयींचा हा सिद्धांतचा आपल्याला योग्य मार्ग दाखवू शकतो. गुलाम नबी आझाद यांनी वाजपेयी यांच्या, ‘भारत जर धर्मनिरपेक्ष होऊ शकत नसेल, तर तो भारत असूच शकत नाही,’ या भूमिकेची आठवण करून दिली. त्यांनी आपल्या राजकीय विरोधकांबाबत कधीच कठोर शब्दांचा वापर केला नाही, असे त्यांनी सांगितले.
 
 
 
संसदेच्या या केंद्रीय दालनात महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, रवींद्रनाथ टागोर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दादाभाई नौरोजी, इंदिरा गांधी आणि डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचेही पूर्णाकृती तैलचित्र लावण्यात आले आहेत.