प्रियांका वढेरांच्या रॅलीत चोरांची चांदी - कॉंग्रेस नेत्यांचे धरणे आंदोलन
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :12-Feb-2019
लखनौ,
कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका वढेरा यांच्या सोमवारी लखनौ येथे आयोजित रोड शोवेळी झालेल्या गर्दीचा चोरांना फायदा झाला आहे. रोड शोमध्ये सहभागी झालेल्या कॉंग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांचे महागडे स्मार्टफोन चोरीला गेले आहेत. मोबाईल आणि इतर वस्तू चोरीस गेल्याचे लक्षात येताच कार्यकर्त्यांनी पोलिसांवर बेजबाबदारपणाचा ठपका ठेवत धरणे आंदोलन केले.
 
 
 
 
कन्नौज आणि बाराबंकी येथून अनेक कार्यकर्ते प्रियांका आणि राहुल गांधींच्या रोड शोमध्ये सहभागी होण्यासाठी आले होते. कॉंग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते जेव्हा कानपूर रोड येथे पोहोचले तेव्हा चोरांनी त्यांचे स्मार्टफोन आणि अन्य महत्त्वाचे सामान चोरले. चोरांनी सव्वा लाखाचा स्मार्टफोन चोरी केल्याचा दावा शान अल्वी यांनी दावा केला आहे. चोरांनी अनेक नेत्यांच्या खिशातील हजारो रुपये, परवाने आणि एटीएम कार्डसहित अनेक महत्त्वाच्या कागदपत्रांची चोरी केली. चोरी झाल्याची माहिती मिळताच संतप्त कॉंग्रेस नेत्यांनी एका तरुणाला मारहाण करीत पोलिस ठाण्यात नेले आणि धरणे आंदोलनाला सुरुवात केली. मात्र, पोलिस कारवाई करत नसल्याचा आरोप कॉंग्रेस नेत्यांनी केला आहे.