अवमान प्रकरणी नागेश्वर राव दोषी; कामकाज संपेपर्यंत कोपर्‍यात उभे राहण्याची शिक्षा
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :12-Feb-2019
नवी दिल्ली, 
 
 
 
 
 
 
 
 
बिहारच्या मुझफ्फरपूर येथील शेल्टर होम लैंगिक अत्याचाराचा तपास करणार्‍या अधिकार्‍याची बदली करून सीबीआयचे तत्कालिन हंगामी संचालक एम. नागेश्वर यांनी न्यायालयाचा अवमान केला आहे, असा स्पष्ट ठपका ठेवताना सर्वोच्च न्यायालयाने आज मंगळवारी राव यांना दोषी ठरवितानाच, त्यांना न्यायालयाचे कामकाज संपेपर्यंत एका कोपर्‍यात उभे राहण्याची शिक्षा आणि एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला.
 
 
मुझफ्फरपूर प्रकरणाचा तपास करणार्‍या कोणत्याही अधिकार्‍याची बदली करता येणार नाही, असा स्पष्ट आम्ही दिला असतानाही, सीबीआयचे संयुक्त संचालक ए. के. शर्मा यांची बदली करण्यात आली. त्यांना सीआरपीएफचे अतिरिक्त संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले. यामुळे आमच्या आदेशाचा अनादर झाला आहे. राव आणि अन्य एक अधिकारी भासुराम यांना आम्ही या प्रकरणात अवमाननेसाठी दोषी ठरवित आहोत, असा निकाल सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. एल. एन. राव आणि न्या. संजीव खन्ना यांच्या तीन सदस्यीय न्यायासनाने दिला.
 
तुमच्या हातून न्यायालयाचा अपमान झाला आहे आणि यात तुम्ही दोघेही दोषी ठरले आहात. यासाठी तुम्ही विनशर्त माफी मागितली आहे, पण आम्ही ती स्वीकारू शकत नाही. तुम्ही दोघेही एका कोपर्‍यात जा आणि कामकाज संपेपर्यंत उभे राहा, अशी शिक्षा न्यायालयाने त्यांना ठोठावली.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
30 दिवसांच्या कारावासाचाही पर्याय
 
ही शिक्षा ठोठावण्यापूर्वी न्यायालयाने राव आणि भासुराम यांना, तुम्हाला आणखी काही सांगायचे आहे काय, कारण या गुन्ह्यात तुम्हाला 30 दिवसांचा कारावासही ठोठावला जाऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला शिक्षेचा अन्य कुठला पर्याय निवडायचा असेल, तर तसे आम्हाला सांगा, अशी विचारणा केली. यावेळी सीबीआयच्या वतीने उपस्थित झालेले महान्यायवादी के. के. वेणुगोपाल म्हणाले की, न्यायालयाने कायद्याच्या चौकटीतील अन्य शिक्षेचा पर्याय निवडावा आणि दया दाखवावी. चुका करणे हा मनुष्य स्वभाव आहे आणि माफ करणे दैवी स्वभाव आहे. यावर न्यायालयाने असे स्पष्ट केले की, राव यांना न्यायालयाच्या आदेशाची परिपूर्ण कल्पना होती. आमच्या परवानगीशिवाय मुझफ्फरपूर घटनेशी संबंधित अधिकार्‍यांची बदली केली जाऊ नये, असा स्पष्ट आदेश आम्ही दिला होता, पण त्याचे पालन झाले नाही. हा न्यायालयाचा घोर अपमानच आहे.