अकोल्यात थकीत मालमत्ता करावरील दंड माफ
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :13-Feb-2019

  •  ३१ मार्च पर्यंत अभय योजना
अकोला,
 
अकोला महापालिकेचे सुमारे ३२ कोटी रुपयांची मालमत्ता कर वसुली थकीत आहे. या थकबाकीदारांवर दरमाह २ टक्के दंड लावण्यात येतो. महापौर विजय अग्रवाल यांच्या आग्रहाखातर आयुक्त संजय कापडणीस यांनी हा दंड माफ करण्यास कार्योत्तर मंजुरी दिली आहे. महापालिका प्रशासनाने यापुर्वी अभय योजना राबविली होती. तरी देखील अनेक मालमत्ताधारकांनी त्याकडे दूर्लक्ष केले होते.
 

 
नागरीक नियमित कर भरण्यास तयार असतात. पण, त्यांना त्यावरचा दंड भरण्याची त्यांची मानसिकता नसते. अशा वेळी महापालिकेला प्राप्त होणारा मुळ कर देखील मिळत नाही. ही परिस्थिती पाहता नागरीकांकडून कर वसुली होत नाही व त्यामुळे विकास कामांसाठी लागणारा मॅचिंग फंड टाकण्यात मोठी अडचण येते व शासन निधी देण्यास तयार असते. तेव्हा मॅचिंग फंड नसल्याने तो मिळत नाही. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी थकीत असलेला मालमत्ता कर जास्तीत जास्त संख्येत वसुल करण्यासाठी मालमत्ता करावरील दंड माफ करण्यात आला आहे. जे नागरीक ३१ मार्च पर्यंत त्यांचा मालमत्ता कर अदा करतील त्यांचाच दंड माफ होणार आहे. त्याच बरोबर थकीत मालमत्तेबरोबर चालू वर्षाचा देखील मालमत्ताधारकांना द्यावा लागणार आहे.
 
महापालिकेला ३२ कोटी रुपयाचा थकीत मालमत्ता कर वसूल करावा लागणार आहे. या थकीत करावर महापालिका अधिनियमान्वये दरमहा दोन टक्के या नुसार व्याज आकारण्याचा अधिकार आहे. ज्या नागरिकांकडे मालमत्ता कर थकीत आहे, त्यांना १२ ते २४ महिन्याचे व्याज द्यावे लागणार होते. त्यामुळे काही नागरिकांना २४ टक्के तर काही नागरिकांना ४८ टक्के व्याजाचा भरणा करावा लागणार नाही मुळ मालमत्ताकरच महापालिकेला अदा करावे लागेल. यामुळे महापालिकेचे करवर लावण्यात आलेल्या शास्तींचे काही कोटींचे नुकसान होण्याचा संभव आहे. पण, कर वसुली आवश्यक असल्याने होणारे नुकसान महत्वाचे ठरत नाही. महापालिकेने २० जानेवारी पर्यंत अभय योजना राबवली होती.