संत्र्यावरील काळी माशी अर्थात कोळशीचे व्यवस्थापन
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :13-Feb-2019
संत्रा बगिचात नवती येण्यास सुरुवात झाल्यावर काळ्या माशीचे प्रौढ कोषातून बाहेर पडून नवतीवर अंडी घालण्यास सुरुवात करतात. अंडी पानाच्या खालच्या बाजूस गोलकार पद्धतीने टाकलेली असतात. दिसायला चवळीच्या दाण्यासारखी, त्याच रंगाची पण अतिशय सूक्ष्म असतात.
 
त्यामुळे बारकाईने पाहिल्याशिवाय सहजासहजी लक्षात येत नाहीत. अंड्यातून निघालेली प्रथम अवस्थेतील पिले अत्यंत नाजूक, सूक्ष्म आकाराची व फिक्कट रंगाची असतात. त्यामुळे ही अवस्थासुद्धा सहजपणे लक्षात येत नाही. हीच अवस्था या किडींच्या नियंत्रणासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणून संत्रा झाडांच्या पानांचे नियमित काळजीपूर्वक निरीक्षण करणे आवश्यक आहे.
 
अंड्यातून निघालेली पिले काही वेळ पानावर फिरतात व नंतर पानावरच स्थिर होतात. या पिलांची त्वचा नाजूक असते. पण, या नंतरच्या सर्व पिलावस्था व कोष यांची त्वचा हळूहळू काळसर होऊन त्यांचे शरीराभोवती टणक कवच तयार होते. म्हणून प्रथम व द्वितीय अवस्थेनंतरची पिले व कोषावस्थेतील कीड यावर कीटकनाशकांच्या फवारणीचा फारसा प्रभाव जाणवत नाही. म्हणून व्यवस्थापनाच्या दृष्टीने पिलांची पहिली व त्या खालोखाल दुसरी अवस्था यांचा उपयोग करून घेणे महत्त्वाचे आहे.
 
त्यासाठी, शेतकरी बंधूंनी आपल्या संत्रा बगिचाचे नियमितपणे निरीक्षण करावे व व्यवस्थापनाकरिता योग्य उपयांचा योग्य वेळेस अवलंब करावा. त्यासाठी :

 
 
  1.  कीडग्रस्त कलमा, रोपे इतर भागात लागवडीसाठी वापरू नये. 
  2.  काळी माशी अंडी घालण्याच्या अपेक्षित वेळेपूर्वी साल काढण्याचे टाळावे.
  3.  काळी माशी, पाने खाणारी अळी, पिठे ढेकू, किडीचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी फळे येत असलेल्या बागेत आंतरपिके घेण्याचे टाळावे.
  4. शिफारशीत अंतरावरच संत्र्याची लागवड करावी.
  5. अतिरिक्त नत्र खताचा वापर व पाणी संचय टाळावा.
  6. हस्त बहाराचे वेळी ओलीत उशिरा सुरू करावे (मोसंबी/लिंबू).
  7. काळ्या माशीचे प्रौढ कोषातून बाहेर पडत असताना म्हणजे नवतीच्या कालावधीच्या दरम्यान बागेमध्ये पिवळ्या रंगाचे सापळे लावावेत. अशा पिवळ्या रंगाच्या पत्र्याच्या पृष्ठभागावर दररोज एरंडीचे तेल लावावे. म्हणजे आकर्षित झालेल्या माश्या सापळ्यांवर चिकटतील व मरतील. त्यामुळे किडींच्या प्रजोत्पादनावर व प्रसारावर काही अंशी आवर घालता येणे शक्य होईल.
  8. अंड्यातून पिले बाहेर निघाल्यानंतर या किडींच्या पिलांच्या पहिल्या किंवा दुसर्‍या अवस्थेची खात्री करून व्यवस्थापनाचे उपाय योजावेत. त्यासाठी मॅलाडा बोनीनेन्सीस या परभक्षक कीटकांचे प्रतिझाड १०० अंडी असलेले कार्ड बसवावेत. तसेच क्रायसोपा व लेडीबर्ड बिटल या मित्रकीटकांचे संवर्धन करावे. हे मित्रकीटक बगिचात पुरेशा प्रमाणात असतील, तर अशा वेळेस रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळावा.
  9. अंड्यातून काळ्या माशीची ५० पिले बाहेर पडल्यावर निंबोळीच्या तेलाची फवारणी करावी. त्यासाठी १ किलो निंबोळी तेल, २०० ग्रॅम डिटर्जंट पावडर, १० लि. पाणी घेऊन द्रावण तयार करावे. यासाठी प्रथम डिटर्जंट पावडरचे थोड्या पाण्यामधे एकजीव द्रावण तयार करावे व नंतर या द्रावणात १ किलो निंबोळी तेल टाकावे व चांगले ढवळावे. यानंतर या द्रावणात पाणी टाकून एकूण मात्रा १०० लिटर करावी व परत हे मिश्रण चांगले ढवळावे व फवारणीसाठी वापरावे. फवारणी सकाळ किंवा सायंकाळच्या वेळी पायडल पंपाने करावी.
- विभाग प्रमुख,
कीटकशास्त्र विभाग,
डॉ. पं. दे. कृ. वि., अकोला