जानेवारीनंतर बीटी कपाशीचे नियोजन
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :13-Feb-2019
 
गुलाबी बोंडअळी बीटी कपाशीवरील एक प्रमुख कीड आहे. गुजरात राज्यात २०१३ पासून तर महाराष्ट्रात २०१७ पासून बीजी २ वर याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
 
ओळख :
 • गुलाबी बोंडअळीचा पतंग लहान गर्द बदामी रंगाचा असतो आणि समोरील पंखांवर बारीक काळे ठिपके असतात, तर मागील पंख चंदेरी राखाडी रंगाचे असतात.
 • अंड्यातून बाहेर आलेली अळी प्रथम व द्वितीय अवस्थेत पांढुरकी असते. डोकं गर्द कथिया रंगाचे राहते. मोठी अळी गुलाबी रंगाची होते. यालाच शेंदरी बोंड अळीसुद्धा म्हणतात.
 • केवळ कापूस, भेंडी व अंबाडी याच गुलाबी बोंडअळीच्या खाद्य वनस्पती आहेत.
 
गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव : 
 • गुलाबी बोंडअळीचा मादी पतंग कपाशीच्या बोंडावर किंवा बोंडाजवळ फुले धरण्याच्या काळात आपली अंडी घालतो. अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या फुलात शिरतात. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झालेली फुले अर्धवट उमललेल्या गुलाबाच्या कळीसारखी दिसतात. यालाच ‘डोमकळी’ म्हणतात. या बोंडअळीचा प्रादुर्भाव हिरव्या बोंडामध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो.
 • अळी बोंडामध्ये शिरली की बोंडावरील छिद्र बंद होत असल्याने बोंडाचे वरून निरीक्षण केल्यास या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत नाही. परंतु, हिरवी बोंडे फोडून पाहिल्यानंतर प्रादुर्भाव दिसून येतो.
 • वाढ अवस्थेतील हिरव्या बोंडावर कोषावस्थेत जाण्याकरिता अळी बाहेर पडल्याचे छोटे छिद्र. उमललेल्या बोंडामध्ये प्रादुर्भावाजवळ रंगीत कापूस आढळणे. अर्धवट उमललेली किडकी सरकी असलेली प्रादुर्भावग्रस्त बोंडे.
 • प्रादुर्भावग्रस्त बोंडे परिपक्व न होताच उमलतात. त्यामुळे कपाशीची प्रत बिघडते. बोंडातील अळ्या रुईमधून छिद्र करून सरकी खातात. त्यामुळे रुईची प्रत खालावते. सरकीतील तेलाचे प्रमाण खालावते आणि बियाण्याची उगवणशक्ती कमी होते.
 • शेंदरी बोंडअळी ही फुलामध्ये किंवा बोंडामध्ये असल्यामुळे प्रादुर्भाव लक्षात येत नाही. बोंडाच्या आत अळी असल्यामुळे व्यवस्थापनास अवघड आहे. पण, नियमित सर्वेक्षण व एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब केल्यास या अळीचे प्रभावी रीत्या व्यवस्थापन करता येईल.

 
 
आर्थिक नुकसानीची पातळी :
 
१ जिवंत अळी प्रती १० हिरवी बोंडे किंवा
८-१० पतंग प्रती सापळा सलग ३ दिवस
  
 • कीड रोग सर्वेक्षण आणि सल्ला प्रणाली (क्रॉपसॅप) प्रकल्पा अंतर्गत सर्वेक्षणामध्ये जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात काही ठिकाणी ओलिताखालील कपाशीमध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीवर आढळून आला. तसेच कामगंध सापळ्यामध्ये येणार्‍या नर पतंगांची संख्या आर्थिक नुकसानीच्या पातळीवर आढळून आली. हे लक्षात घेता गुलाबी बोंडअळीच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी पुढीलप्रमाणे नियोजन करावे लागेल.
 • हंगामाच्या सुरुवातीपासून नियमित सर्वेक्षण व एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब केल्यामुळे यंदा गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव सीमित स्वरूपात होता. पण, डिसेंबरमध्ये प्रादुर्भावतीव्रता वाढल्याचे दिसून आले.
 • कोरडवाहू क्षेत्रांमध्ये कापसाचे वेचे पूर्ण झालेले असले, तरी पिकाचे अवशेष शेतामध्ये तसेच दिसून येतात. त्यामुळे हंगाम संपल्यानंतर लगेच शेतात शेळ्या, मेंढ्या किंवा जनावरे चरण्यासाठी सोडवेत, जेणेकरून पिकाच्या अवशेषावरील किडींच्या अवस्था नष्ट होतील.
 • गरज नसल्यास पिकाचे अवशेष साठवून न ठेवता जाळून टाकावे. त्याहीपेक्षा उत्तम पर्याय म्हणजे कंपोस्टिंगद्वारे पिकाचे अवशेष अधिक प्रभावी रीत्या वापरता येतात.
 • सिंचनाची सोय असलेल्या शेतकर्‍यांना फरदडीपासून भरपूर उत्पन्न होत असले, तरी किडींना सलग खाद्य पुरवठा उपलब्ध होत असल्यामुळे पीक १५-३० जानेवारीनंतर लांबवणे नुकसानकारक ठरेल.
 • अंबाडी, भेंडी अशा पिकांसोबत कपाशीची फेरपालट करू नये.
 • जिनिंग मिलमध्ये खूप दिवस कच्चा कापूस पडून राहणेसुद्धा किडींच्या संख्यावाढीला चालना देतो. लवकरात लवकर कापसाची प्रक्रिया झाल्यास हा प्रादुर्भाव कमी व्हायला मदत होईल.
 • जिनिंग मिलमध्ये फेरोमोन सापळे किंवा प्रकाश सापळ्यांचा वापर फायदेशीर ठरतो.
 • जे शेतकरी कापूस घरी साठवून ठेवत असतील त्यांनी साठवलेल्या कापसात किडींच्या अवस्थांकडे लक्ष ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. असा कापूस झाकून ठेवल्यास निघणार्‍या पतंगांवर आळा बसेल.
 • पुढील हंगामाआधी उन्हाळ्यात जमिनीची नांगरणी केल्यास किडींच्या कोषावस्था कमी होण्यास मदत होईल.
 • शेतकरीबंधू सर्वसाधारणपणे २-३ विविध कालावधीच्या विशेषत: दीर्घ कालावधीच्या वाणांची निवड करतात. पण, मागील दोन-तीन हंगामाचा अनुभव लक्षात घेता, गावपातळीवर सर्वसहमतीने एकाच वाणाची निवड केल्यास फायदा होईल. वाणाची निवड करताना मध्यम कालावधीचे म्हणजेच १६० दिवसांचे असल्यास जास्त चांगला पर्याय आहे.
 • सिंचनाच्या उपलब्धतेनुसार सिंचित क्षेत्रातील व मान्सूनचा पुरेसा पाऊस झाल्यावर कोरडवाहू कपाशीची लागवडीची वेळ एकाच टप्प्यात साधल्यास किडींचा प्रादुर्भाव कमी राहण्यास मदत होईल.
 • दीर्घ कालावधीच्या वाणांची लागवड टाळल्यास या किडीला प्रदीर्घ कालावधीसाठी अन्नपुरवठा उपलब्ध होणार नाही आणि ही कीड विशेषत्वाने कपाशीवरच उपजीविका करत असल्यामुळे या कीडीच्या नियोजनात मदत होईल.
 • बाजारात उपलब्ध विविध कालावधीचे वाण तसेच सिंचन उपलब्धतेनुसार लागवडीची वेळ वेगवेगळी असल्यामुळे कळ्या, फुले व बोंडाची अवस्था सतत उपलब्ध असते, ज्यामुळे किडीचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून आले आहे.
 • आर.आय.बी. म्हणजेच आश्रय बीज ज्या पाकिटात मिसळलेले आहे तिथे अडचण नाही, पण नॉन बीटीचे बियाणे वेगळे असल्यास बीटी पिकाच्या सभोवताल आश्रय बीजाची लागवड करणे अत्यंत आवश्यक आहे.
कापूस जिनिंग मालकांनी करावयाची कार्यवाही सीड इंडस्ट्रीज असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (सियाम) आणि माहिको मोन्सॅटो बायोटेक (एम.एम.बी.) यांच्या मदतीने महाराष्ट्र कॉटन जीनर्स असोसिएशनने शेंदरी बोंडअळी पतंगाचे नियंत्रण करण्यासाठी कार्यक्रम आखला आहे. दिनांक ३०/११/२०१८ च्या परिपत्रकानुसार महाराष्ट्र कॉटन जीनर्स असेसिएशनचे अध्यक्ष भूपेंद्रिंसह राजपाल यांनी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिनिंग मालकांना त्यांच्या परिसरात १५ ते २० कामगंध सापळे लावून एका माहितगार व्यक्तीची नियुक्ती करून वेळोवेळी पतंग नष्ट करण्यास सांगितले आहे. प्रत्येक जीन मालकांनी त्यांच्या जिनिंग परिसरात कापसाची आवक झाल्यापासून संपूर्ण जिनिंगचे काम संपेपर्यंत शेंदरी बोंडअळीचे खालीलप्रमाणे नियोजन करावे : 
 1. जानेवारीपासून जिनिंग परिसरात किमान एक प्रकाशसापळा व १५ ते २० कामगंध सापळे ३० ते ४० मीटर अंतरावर लावावेत.
 2. कामगंध सापळ्यामध्ये दर्जेदार ल्युर (गॉसिपल्युर) बसविल्यास जास्त पतंग आकर्षित होतात.
 3. दर तीन आठवड्याने नियमितपणे कामगंध सापळ्यातील ल्युर बदलणे आवश्यक आहे.
 4. दररोज किंवा आठवड्यातून दोनदा कामगंध सापळ्यामध्ये अडकलेले पतंग माहितगार व्यक्तीद्वारे दुसर्‍या एका प्लॅस्टिक पिशवीमध्ये जमा करून त्यांचा नाश करावा.
 5. सापळ्यामध्ये अडकलेले पतंग सापळ्यामध्ये न मारता कीटकनाशक द्रावणात मारावेत.
 6. मे-जूनच्या दरम्यान जिनिंग परिसरात अस्ताव्यस्त पडलेली किडलेली सरकी, रुई किंवा खराब कापसाचे ढीग शक्य असल्यास जििंनग परिसरातच फाटलेल्या बोंद्र्यासह जाळून नष्ट करावीत किंवा जमिनीमध्ये गाडून नष्ट करावीत म्हणजे त्यातील बोंडअळीची सुप्त अवस्था (अळी, कोषअवस्था) नाश होईल व पुढील हंगामात आजूबाजूच्या परिसरात पतंग निघणार नाहीत आणि त्यांचे जीवनचक्र पूर्णपणे खंडित होण्यास मदत होईल.
 7. जून-जुलै महिन्यामध्ये, मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेता, जिनिंग परिसरात निघालेली कपाशीची झाडे त्वरित मजुरांद्वारे काढून टाकावीत किंवा तणनाशकाचा फवारा मारून कपाशीची नवीन निर्मूलन करावे.
 8. तालुका कृषी अधिकारी किंवा त्यांचे प्रतिनिधीद्वारे दर आठवड्याला जििंनग परिसरात नियमितपणे कामगंध सापळे अंमलबजावणीचे दृष्टीने देखरेख करणे गरजेचे आहे.
वरील उल्लेखित बाबींचा अवलंब केल्यास बीटी तंत्रज्ञान येणार्‍या काळातही विना अडचण वापरता येईल.
 डॉ. राहुल वडस्कर
  प्रा. राम गावंडे
  डॉ. विजया बाजड
कृषी महाविद्यालय, नागपूर