जॉन्टी र्‍होड्सच्या संघात 'हा' भारतीय खेळाडू
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :13-Feb-2019
नवी दिल्ली,
 
जगातला सर्वात चपळ क्षेत्ररक्षक म्हणून लौकीक असलेला दक्षिण आफ्रिकेचा माजी क्षेत्ररक्षक जॉन्टी र्‍होड्स याने आयसीसीच्या एका कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपले आवडते सर्वोत्तम 5 क्षेत्ररक्षकांची नावे जाहीर केलीत. त्यात भारताच्या खेळाडूचाही समावेश आहे.

 
 
१९९२ च्या विश्वचषकात इंझमाम उल हकला जॉन्टीने हवेत झेप घेऊन केलेले धावबाद अजूनही क्रिकेटप्रेमींच्या स्मरणात आहे. त्यानंतर त्याने अनेक अविश्वसनीय झेल टिपले आणि अनेक रन आऊटही केले. जॉन्टीने निवडलेल्या पाच सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांमध्ये भारताच्या केवल सुरेश रैनाला स्थान मिळाले आहे. रैनाच्या क्षेत्ररक्षण कौशल्यावर जॉन्टी चांगला प्रभावित झालेला आहे.भारतातील कमी गवत असलेल्या खेळपट्टीवर क्षेत्ररक्षण करणे नेहमी आव्हानात्मक होते, परंतु रैना अगदी सहजतेने ते करून जायचा. स्लीपमध्येही त्याच्या क्षेत्ररक्षणाला तोड नाही, असे जाँटी म्हणाला.
 
 
 
ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू अँड्य्रु सायमण्ड्स सर्वोत्तम क्षेत्ररक्षक असल्याचे मत त्याने व्यक्त केले आहे. सायमण्ड्स सीमारेषेवर व ३० यार्ड सर्कलच्या आत कुठेही व्यवस्थित चेंडू अडवू शकतो, असे तो म्हणाला.
 
आपले दक्षिण आफ्रिकेतील संघमित्र हर्षेल गिब्ज व एबी डीव्हिलियर्स तसेच इंग्लंडचा माजी कर्णधार पॉल कॉलिंगवूडसुद्धा सर्वोत्तम क्षेत्ररक्षक असल्याचे त्याने म्हटले आहे.
 
 रैनाने मानले आभार 
 
 दक्षिण आफ्रिकेचा प्रसिद्ध क्रिकेटपटू जॉन्टी र्‍होड्स याने आपल्या संघात स्थान दिल्यामुळे भारताचा क्रिकेटपटू सुरेश रैनाने ट्विट करून त्याचे आभार मानले आहे. तुम्ही मला नेहमीच उच्च गुणवत्तेचे क्षेत्र देऊन प्रेरणा दिली आहे, असे त्याने ट्विटमध्ये लिहिले आहे.