भंडारा जिल्ह्यात दोघांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :13-Feb-2019
 
भंडारा,
 
राज्य शासनाने घोषित केलेल्या शिवछत्रपती क्रीडा राज्य पुरस्कार प्राप्त खेळाडू व क्रीडा संघटकामध्ये भंडारा जिल्ह्यातील दोघांची वर्णी लागली आहे. सायकलींग या क्रीडा प्रकारासाठी जिल्ह्यातील तुमसर येथील वैष्णवी संजय गभणे हिची तर उत्कृष्ट क्रीडा संघटक म्हणून सेवानिवृत्त शिक्षक राजेंद्र भांडारकर यांची निवड करण्यात आली आहे. भांडारकर यांनी हँडबॉल, बास्केटबॉल, हॉकी, स्केटिंग यासारख्या खेळायला मोठे करण्याचे काम केले. उत्कृष्ट संघटक म्हणून त्यांचा २०१७ मध्ये जिल्हा स्तरावर गौरवही करण्यात आला होता.
 
 
 
 
सायकलिंग क्रीडा प्रकारात वैष्णवी गभणे हिने पुरस्कार पटकाविला. भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील असलेल्या वैष्णवीचे दहावीपर्यंतचे शिक्षण प्रबोधनी पुणे येथे झाले. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर केलेल्या स्पर्धांमध्ये २० हून अधिक सुवर्णपदक तिने पटकाविले आहेत. एशियाकप, एशीयन चॅम्पियनशिप यामध्ये सहभागी होऊन तिने पदके पटकावली. युथ कॉमनवेल्थ गेम मधेही ती सहभागी झाली होती. या वर्षीचा जिल्हा क्रीडा पुरस्कार देऊन गौरवही करण्यात आला होता.