‘अस्सा नवरा नको गं बाई’!
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :13-Feb-2019
- नाट्यसंमेलनात झळकणार झाडीपट्टीचे नाटक
 
 
चंद्रपूर,
 
९९ वे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन यंदा नागपुरात होत आहे. या नाट्यसंमेलनात झाडीपट्टीत गाजत असलेल्या श्री व्यंकटेश नाट्यमंडळाच्या ‘अस्सा नवरा नको नको गं बाई’ या विनोदी नाटकाचे सादरीकरण होणार आहे. ही झाडीपट्टीतील नाट्यचळवळी अभिनामानाची बाब आहे. गेल्या काही वर्षात झाडीपट्टीच्या नाटकांची दखल नाट्यक्षेत्राच्या मुख्य प्रवाहानेही घेतली आहे. किंबहुना, मुंबईच्या सिनेसृष्टी आणि नाट्यमंचाचे सुप्रसिध्द कलावंतही एव्हाना झाडीपट्टीत येऊन येथील नाटकांत काम करू लागले आहेत.
 
२२ फेब्रुवारीपासून सुरू होणार्‍या नाट्यसंमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी हे राहतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वागताध्यक्ष असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्यासह सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांचीही उपस्थिती राहणार आहे.
 
 
 
तीन दिवस चोवीस तास चालणार्‍या या नाट्यमहोत्सवात भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी असून, महाराष्ट्रातल्या मोजक्या नाटकांची निवड करण्यात आली आहे. रेशीमबाग मैदानावरील राम गणेश गडकरी नाट्यनगरीत होणार्‍या या नाट्यसंमेलनात शनिवार २३ फेब्रुवारीला मध्यरात्री ‘अस्सा नवरा नको गं बाई’... या नाटकाचे सादरीकरण होणार आहे. या नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक सदानंद बोरकर हे असून, विजय मुळे, मंजुषा जोशी, चंद्रसेन लेंझे, विश्वनाथ पर्वते, देवयानी जोशी, कमलाकर कामडी, अंगराज बोरकर, शिल्पा माडले हे कलावंत या नाटकातून भूमिका साकारणार आहेत. नाटकाची निर्मिती स्व. बालाजी पाटील बोरकर स्मृती प्रतिष्ठान, नवरगावची आहे. झाडीपट्टीचे वैशिष्टय, झाडीबोलीचा गोडवा आणि स्त्री शिक्षणासारखा सामाजिक विषय या नाटकातून मांडण्यात येणार असून, नाट्य संमेलनात नाटकाची निवड होणे ही या भागासाठी अभिमानाची आणि गौरवाची बाब असल्याचे मत सदानंद बोरकर यांनी तभाकडे व्यक्त केले आहे.