पाचगणीत परदेशी पॅराग्लायडरचा मृत्यू; जमिनीवर उतरताना झाडावर आदळून दुर्घटना
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :13-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
सातारा, 
 
 
 
सातार्‍यातील पाचगणीत टेबललॅण्डवरून पॅराग्लायिंडग करणार्‍या परदेशी पर्यटकाचा मृत्यू झाला. पॅराग्लायिंडग करून उतरताना झाडावर आदळल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. फांगा फेक ओ असे नाव असलेल्या या पर्यटकाला अपघातात प्राण गमवावे लागले.
 
 
कोरियाहून आलेला पॅराग्लायडर्सचा समूह गेल्या काही दिवसापासून वाई-महाबळेश्वर भागात मुक्कामी आहे. वाईतील स्थानिक मंडळी त्यांना मदत करीत आहेत.
 
टेबललॅण्डवरून उड्डाण केल्यानंतर ते हळूहळू हवेच्या दिशेने आकाशात तरंगतात. प्रमाणापेक्षा जास्त हवा असतानाही काल सायंकाळी काही जणांनी पॅराग्लायिंडगला सुरुवात केली. मात्र, या चमूमधील फांग फेक ओ वगळता उर्वरित सर्व जण पुन्हा खाली उतरले. अंधार पडत चालल्यामुळे सर्व चमू आणि स्थानिकांनी फांग फेक ओचा शोध घेण्यास सुरुवात केली.
 
 
पाचगणीच्या दरीजवळ असलेल्या अभेपुरी गावातील एका झाडावर फांग मृतावस्थेत लटकताना आढळला. ट्रेकर्स आणि स्थानिकांच्या मदतीने त्याचा मृतदेह खाली उतरवून वाईच्या मिशन रुग्णालयात नेण्यात आला. अंदाज चुकल्यामुळे तो झाडावर आपटला असावा आणि जास्त मार लागल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला.
पॅराग्लायिंडगसार‘या साहसी खेळांवर काही वर्षांपूर्वी सातार्‍याच्या जिल्हाधिकार्‍यांनी बंदी आणली होती. यातून वादही झाले होते, मात्र तरीही परवानगी नाकारण्यात आली होती. आता कोरियाच्या समूहाला कशी आणि कोणी परवानगी दिली, याबाबत वाई पोलिस तपास करीत आहेत.