लोकसभा निवडणुकीच्या तारखा ठरल्यानंतर आयपीएलचे वेळापत्रक होणार जाहीर
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :13-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
मुंबई 
 
देशात लोकसभा निवडणूक आणि इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) एकाचवेळी होणार आहे.  एकाचवेळी हे दोन सोहळे झाले तर सुरक्षायंत्रणेवर अतिरीक्त ताण येऊ शकतो. त्यामुळे सर्वांचा नजरा आयपीएलच्या वेळापत्रकावर लागलेल्या आहेत. 4 फेब्रुवारीला आयपीएलच्या वेळापत्रकाची घोषणा होणे अपेक्षित होते, परंतु आता नव्या माहितीनुसार लोकसभा निडवणुकीच्या तारखा ठरल्यानंतरच आयपीएलचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.
मे-जून मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेमुळे आयपीएल यंदा मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून सुरू होणार आहे. 23 मार्च पासून आयपीएल स्पर्धा सुरू होणार असल्याची घोषणा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) केली होती. आयपीएलच्यावेळी भारतामध्ये निवडणूका होणार आहेत. त्यामुळे आयपीएलचे सामना भारतात होणार की नाही याबाबत साशंकता होती. पण बीसीसीआयचे हंगामी सचिव अमिताभ चौधरी यांनी आयपीएलचे सर्व सामने भारतातच होतील, असे मत व्यक्त केले होते. 
 
सध्याच्या सरकारचा कार्यकाळ मे महिन्यात संपणार आहे आणि त्यानंतर निवडणूक होतील. 30 मे ते 14 जून या कालावधीत वर्ल्ड कप स्पर्धाही होणार आहेत. त्यामुळे आयपीएलच्या वेळापत्रकाचे नियोजन करण्याची तारेवरची कसरत बीसीसीआयला करावी लागणार आहे. 2009 मध्ये निवडणुकांमुळे संपूर्ण स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत खेळविण्यात  आली होती, तर 2014 मध्ये स्पर्धेचा काही टप्पा संयुक्त अरब अमिराती येथे खेळविण्यात आले होते. 
पण, यंदा आयपीएल, लोकसभा निवडणूक व वर्ल्ड कप हे एकाच वर्षी आल्या आहेत. हिंदुस्थान टाईम्स या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यानंतर आयपीएलचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल. '' आयपीएलचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी आम्हाला थोडा वेळ लागेल. निवडणूक आयोगाने लोकसभेच्या तारखा जाहीर केल्यानंतर आम्ही वेळापत्रक जाहीर करू. त्यानंतरच नियोजन करण्यात येईल,'' असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले.