आस्थेवर आघात कशासाठी?
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :13-Feb-2019
उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथे सध्या जो महाकुंभ सुरू आहे, तो म्हणजे एक महाआनंदपर्व आहे. हा कुंभमेळा म्हणजे जगातले सगळ्यात मोठे आश्चर्य मानले पाहिजे, एवढा तो भव्य आणि दिव्यही आहे. हा कुंभमेळा तर आहेच, आनंदमेळाही आहे. प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर ज्यांनी कुंभस्नान केले, त्यांना मिळालेला आनंद अपार आहे, त्यांना मिळालेले समाधान अपार आहे. देशाच्या कानाकोपर्‍यातून भाविक पवित्र संगमावर दाखल होत आहेत आणि गंगास्नानाचा आनंद लुटत आहेत. एवढेच काय, विदेशातील लोकही या महाकुंभात सहभागी झालेले आहेत. कुठलाही संकोच न करता त्यांनीही शाही स्नानाची अनुभूती घेतली आहे. असे असताना आपल्याकडील काही महाभाग कुंभमेळ्याला राजकीय रंग देण्यात धन्यता मानत आहेत. आपण कुंभमेळ्याच्या आयोजनावर टीका करून देशाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवतो आहोत, याची जराही खंत या महाभागांना वाटत नाही, ही देशासाठी दुर्दैवाची बाब म्हटली पाहिजे.
 
 
 
 

 
 
 
 
 
ज्या ठिकाणी बारमाही प्रवाह असलेल्या नद्या आहेत, जिथे सदैव आनंदच आहे, जिथे सदैव जिव्हाळ्याचे वातावरण आहे, जिथे अमृतरसाने भरलेला कुंभ घट दिसतो आहे, तिथे (प्रयागराज) देशविदेशातून लोकांचे दाखल होणे स्वाभाविक आहे. जिथे इहलौकिक आणि पारलौैकिक इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते, त्या आनंदनगरीत आम्हाला घेऊन चला देवा, अशी प्रार्थना करीत जर लाखोंच्या संख्येतील भाविक अगदी स्वेच्छेने दाखल होत असतील, त्रिवेणी संगमात डुबकी लावण्याचा आनंद उपभोगत असतील, तर त्या आयोजनावर टीका करण्याचे प्रयोजन काय? उत्तरप्रदेशात सध्या भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे. योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री या नात्याने ते स्वत: संपूर्ण कुंभमेळ्यावर लक्ष ठेवून आहेत, येणार्‍या भाविकांचे स्वागत करीत आहेत. नेमकी हीच बाब विरोधकांना खुपत आहे. त्यांना आदित्यनाथ यांच्या या कृतीतही राजकारण दिसत आहे. महाकुंभाचे आयोजन दर बारा वर्षांनी होते. त्यामुळे हा अभूतपूर्व असा योग मानला जातो. योगी आदित्यनाथ यांना आध्यात्मिक अधिष्ठान प्राप्त आहे. त्यामुळे ते राजकारणात असले आणि मुख्यमंत्री असले तरी ते फक्त राजकीय नेते नाहीत, तर ते आध्यात्मिक नेतेही आहेत आणि या भूमिकेतून जर ते कुंभस्थानी येणार्‍या भाविकांचे स्वागत करत असतील, संपूर्ण व्यवस्थेवर लक्ष ठेवणार असतील, तर त्यात राजकारण येतेच कुठे? पण, ज्यांना फक्त मतांची लालसा आहे, कुंभासारखी भारतीय संस्कृती जपली गेली पाहिजे, तिचा जगात प्रचार-प्रसार झाला पाहिजे, याच्याशी काही देणेघेणे नाही, त्यांच्याकडून वेगळी अपेक्षा तरी काय करणार?
 
 
 
 
आस्तिक असतील, नास्तिक असतील, श्रद्धाळू असतील, अश्रद्धाळू असतील, विविध भाषा बोलणारे असतील, विविध प्रांतातील असतील, विविध समुदायाचे असतील, देशातले असतील िंकवा विदेशातले असतील, स्त्रिया असतील, पुरुष असतील, भिन्नभिन्न उपासना पद्धतीचे लोक असतील, अभ्यासक असतील, जिज्ञासू असतील, साधू-संत असतील... असे सर्व प्रकारचे लोक कुंभात सहभागी झाले आहेत. जगातल्या शंभरपेक्षा जास्त देशांमधून लोक प्रयागराजमध्ये आले आहेत. प्रत्येक जण आपापल्या परीने आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यांच्या आनंदात भाजपाच्या राजकीय विरोधकांनी विघ्न आणण्याचे कारण न ओळखण्याइतपत आता देशातली जनताही खुळी राहिलेली नाही, हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे. कोट्यवधी लोक प्रयागराज येथे येत आहेत आणि कोट्यवधी स्नान करून परत गेले आहेत, जात आहेत. उत्तरप्रदेशचे केवळ मुख्यमंत्रीच नव्हे, तर संपूर्ण सरकार यंदा स्वागतकर्त्याच्या भूमिकेत आहे. त्यामागे राजकारण अजीबात नाही. पण, भाजपाच्या विरोधकांना यातही राजकारणच दिसते आहे, हे भाजपाचे नव्हे, या देशाचेच दुर्दैव आहे. आपल्या देशातील जी सांस्कृतिक प्रतीकं आहेत, आपली जी श्रद्धास्थानं आहेत, त्यावर प्रहार करण्यात धन्यता मानणारी नतद्रष्टांची फौज कधी सुधरणार, हे येणारा काळच सांगेल. प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्म अयोध्येतच झाला कशावरून, असा प्रश्न करत कोट्यवधी हिंदूंच्या भावना दुखावणारे महाभाग ज्या देशात असतील त्या देशात कुंभमेळ्याच्या आयोजनावर टीका करणारे ताठ मानेने फिरतात, यात आश्चर्य काहीच नाही. उत्तरप्रदेशात अयोध्या आहे आणि नुकतेच सरकारने फैजाबादचे नामकरण अयोध्या असे केले. त्यातही विरोधकांना राजकीय वास आला आणि त्यांनी एका विशिष्ट समुदायाचे लांगूलचालन करण्यासाठी योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर आरोप केलेच की! अनेक वर्षांपूर्वी चित्रकूट येथे डॉ. राम मनोहर लोहिया यांनी रामायण मेळा आयोजित केला होता. पण, त्या वेळी कुणीही त्यांच्यावर राजकारण करीत असल्याचा आरोप केला नव्हता. मग, आताच कुंभमेळ्याच्या आयोजनावरून विरोधकांना राजकारण सुचण्याचे कारण काय? कारण आहे 2019 ची लोकसभा निवडणूक! एप्रिल-मेमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीत विरोधकांना आपला पराभव स्पष्ट दिसतो आहे. त्यामुळे ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्या वैफल्यातूनच ते भाजपाच्या सरकारवर आरोप करत आहेत. पण, असे करताना आपण आपल्याच देशाला आरोपीच्या िंपजर्‍यात उभे करतो आहोत, आपल्या देशाची प्रतिष्ठा घालवतो आहोत, याची जराही लाज त्यांना वाटत नाही. ज्यांना राजकारण करायचे आहे, त्यांनी ते जरूर करावे. भाजपा काही अमरपट्‌टा घेऊन आलेली नाही. भाजपावर आरोप करूच नये असेही नाही. पण, या देशातील कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धांवर आघात करून जर भाजपावर सूड उगवण्याचा कुणी प्रयत्न करणार असेल, तर जनता त्यांना कधीच माफ करणार नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे.
 
 
 
 
देशाच्या कानाकोपर्‍यातून कोट्यवधी भाविक कुंभस्नानासाठी प्रयागराज येथे येतील, शंभरपेक्षा जास्त देशांमधूनही कोट्यवधी भाविक त्रिवेणी संगमावर दाखल होतील आणि राज्याचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री व त्यांचे सरकार स्वागतकर्त्याच्या भूमिकेत राहणार नाही, असे तर व्हायलाच नको. एखादे संवेदनाहीन आणि संस्कृतिविहीन सरकारच अशा भव्य आयोजनापासून दूर राहू शकते हे लक्षात घेतले, तर या मुद्यावर राजकारण करणारे किती मुर्दाड आहेत, हे आपल्या लक्षात येईल. भारतीय संस्कृती ही विश्वकल्याणकारी आहे. संपूर्ण विश्वाचे भले झाले पाहिजे यासाठी कामना करणारी आहे. ‘हे विश्वचि माझे घर,’ असे मानणारी भारतीय संस्कृती आम्हा सगळ्यांना अभिमान वाटावी अशीच आहे. त्यामुळे कुंभमेळ्यात उत्तरप्रदेशच्या भाजपा सरकारमधील सगळ्या मंत्र्यांनी त्रिवेणी संगमावर डुबकी लावली, तर त्यात राजकारण दिसण्याचे कारणच नाही. विरोधी पक्षांमधील अनेक नेत्यांनीही शाही स्नान केले. मग, त्यामागेही राजकारणच होते, असे म्हणायचे काय? अजीबात नाही. ज्यांची श्रद्धा आहे, ते सगळे संगमावर स्नान करणार आणि एक अनमोल असा आनंद मिळविणारच. त्यात गैर काय? काहीच नाही. मग, राजकारण कशासाठी? केवळ अल्पसंख्यकांच्या एकगठ्‌ठा मतांसाठीच! दहा-पंधरा लाख लोकवस्ती असलेल्या नगराचे व्यवस्थापन करणेही अनेकदा कठीण जाते. तिथे कोट्यवधी लोक दाखल झालेल्या प्रयागराज कुंभमेळ्याचे प्रबंधन सोपे नव्हते. पण, योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वातील उत्तरप्रदेश सरकारने संपूर्ण यशस्वी आयोजन केले अन्‌ देशविदेशातल्या कोट्यवधी भाविकांना परमानंद मिळवून दिला. यातही जे राजकारणच पाहतात, ते निव्वळ करंटे आहेत, नतद्रष्ट आहेत, एवढेच म्हणता येईल!