संगीतातील दीपस्तंभ!
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :14-Feb-2019
मानवी जीवनात संगीताला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झाले आहे. त्याला कारण सुद्धा तसेच आहे. कुठलाही व्यक्ती कितीही दु:खात, संकटात असला, तरी त्याचे दु:ख विसरण्याचे सामर्थ्य संगीतात आहे. एखादी व्यक्ती आनंदी असेल, तरी सुद्धा तो आनंद व्दिगुणीत करायला संगीताचीच जोड हवी असते. आज समारंभ कोणताही असो, संगीताशिवाय त्याला पूर्णत्व प्राप्त होत नाही. सुखाची अनुभूती होण्यासाठी स्वर्गातील देवतांनी मनुष्य प्राण्याला दिलेले देणगी म्हणजे संगीत होय. परंतु संगीताची रचनाकार, गायक कलाकार जे आपल्यापर्यंत संगीत पोहोचवतात, यांचे जीवन सुद्धा संगीता ऐवढेच सुखद राहत असेल का? तर नक्कीच नाही. असाध्य ते साध्य करण्यासाठी जे परिश्रम सामान्य माणसाला करावे लागतात, तेच कष्ट एखाद्या संगीतकार आणि गायकाला करावे लागतात. त्यांचे जीवन सुद्धा सामान्य माणसांप्रमाणेच अडी-अडचणींनी, पराभवांनी भरलेले असते. याचाच प्रत्यय घेण्यासाठी आज आपण एका संगीतकार, गायक यांचे आयुष्य उलघडून बघणार आहोत.

 
 
‘अरिजीत िंसग!’ यांचा जन्म 25 एप्रिल 1987 रोजी पश्चिम बंगालमधील जियागंज, मुर्शिदाबाद येथे झाला. त्यांचे वडील पंजाबी आणि आई बंगाली होती. त्यांच्या आईचं घराणं संगीताशी जुळलेलं होतं. त्यांची नानी शास्त्रीय संगीत विशारद होती. त्यामुळे नकळत त्यांच्यात संगीताचं बीज रुजलं. त्यांना लहानपणापासूनच गाण्याची आवड होती. त्यामुळे त्यांच्या घरच्यांनी त्याला संगीत क्षेत्रातच पुढे नेण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचे संगिताचे प्रशिक्षण सुरू झाले. हजारी बंधूंकडे त्यांना संगीत साधनेसाठी पाठविण्यात आले. तिथे ते शास्त्रीय संगीत, पॉप संगीत आणि तबला वादन शिकले. गाण्यातील प्रावीण्यामुळे त्यांना लहान वयातच संगीताची स्कॉलरशिप मिळाली. वयाच्या 18 व्या वर्षी त्यांची ‘फेम गुरुकुल’ या रियालिटी कार्यक्रमात निवड झाली. परंतु 6 व्या क्रमांकावर त्यांना कार्यक्रमातून बाहेर पडावे लागले. परंतु त्या कार्यक्रमामुळे त्यांना संजय लीला भंसाली यांच्या ‘सावरीया’ या चित्रपटात ‘यू शबनमी...’ हे गाणं गाण्याची संधी मिळाली. परंतु स्क्रिप्टमध्ये बदल केल्यामुळे त्यांचे ते गाणे प्रदर्शित होऊ शकले नाही. पण आता त्यांचा आवाज लोकांच्या ध्यानात आला होता. ज्यामुळे ‘टिप्स्‌ म्युझिक’ चे कुमार तुराणी यांनी त्यांना एका म्युझिक अल्बमची ऑफर दिली. पण दुर्दैवाने हा अल्बम सुद्धा प्रदर्शित होऊ शकला नाही. जणू काही यश त्यांना हुलकावणी देत होतं. हातात आलेली संधी निसटून जात होती. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा पुन्हा रिअॅटिली कार्यक्रमांकडे वळविला ज्यामध्ये त्यांना यश गवसले. ‘दस के दसले गए दिल’ या कार्यक्रमाचे ते विजेता ठरले.
 
त्यातून मिळालेल्या पैशांनी त्यांनी एक ‘संगीत स्टुडिओ’ सुरू केला. जिथे ते छोट्या-मोठ्या जाहिरातींना संगीत द्यायचे.
आता त्यांची चित्रपट संगीतसृष्टीत पदार्पण करण्याची वेळ आली होती. त्यांना तेलुगू चित्रपटात गाणे गाण्याची संधी मिळाली. त्यानंतर 2011 मध्ये मर्डर-2 मधील ‘फिर मोहोब्बत’ हे गाणेसुद्धा त्यांनी गायले. या गाण्यामुळे अनेकजण त्यांच्या गाण्याचे चाहते झाले आणि त्यांची घोडदौड सुरू झाली. त्यानंतर ‘एजंट विनोद’ 2013 मध्ये आशिकी-2 अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी गाणे गायिले. त्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केल्या गेले. ‘तुम ही हो’ या एका गाण्यासाठी त्यांना 9 पुरस्कार प्राप्त झाले. 2014 मध्ये त्यांनी त्यांच्या बालपणीची मैत्रीण कोएल रॉय हिच्याशी लग्न केले. ते एक चांगले गायक असण्यासोबतच एक चांगले व्यक्तीसुद्धा आहेत. ते त्यांची ‘एनजीओ लेट देअर बी लाईट’ या संस्थेव्दारे अनेक समाजसेवी कार्य सुद्धा करतात.
 
आजच्या काळात जवळ-जवळ प्रत्येक चित्रपटात त्यांचे गाणे असतेच. परंतु हा प्रवास साधा-सुधा नव्हता. तेव्हा क्षेत्र कुठलेही असो, संघर्ष आणि मेहनत ही करावीच लागते, त्याला पर्याय नाही.
-घनश्याम आवारी