रंगावे प्रेमरंगी !
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :14-Feb-2019
प्रेम ही संकल्पना माणसाच्या आयुष्यात आनंद घेऊन येते. तिच्यासोबत असावं, तिच्यासोबत जगावं आणि तिच्यासोबत मरावं, अशी मनात इच्छा असते. जगात िंकवा नात्यात जोपर्यंत प्रेम आहे, तोपर्यंत ते सुंदर आहे.
हृदयापासून घातलेली साद पोहोचलीच पाहिजे, ही प्रेमाची अट म्हणता येईल. आणि मग जाणिवेतून नित्यच व्यक्त होणारे प्रेम हे शब्दांतून व्यक्त करणे तितकेसे आवश्यक वाटणार नाही आणि वाटले तर ते शब्दही अमृताहून गोड असतील.
समोरील व्यक्तीच्या हृदयाचा ठाव न घेता व्यक्त केलेल्या प्रेमात देण्याऐवजी मिळवण्याची इच्छा अधिक असते. त्याही पलीकडे जाऊन जर, त्या नात्यास काहीही भविष्य नसेल, तर अव्यक्त प्रेमच उत्तम असते. कारण जबाबदारीशिवाय घेतला जाणारा आनंद ही विकृती आहे.

 
 
प्रेमात असताना कायम वेगळ्या विश्वात असल्यासारखे वाटते. तिच्या सोबत निवांत क्षणी असताना वाटतं की- ती वेळ कधी संपूच नये. कारण भावनांना शब्द होऊन ओठांवर येण्यास मनाई असली, तरी मनातलं ओळखण्याची ताकद नक्कीच आहे.
प्रेमाबद्दल असं सांगता येणार नाहीच ते अनुभवावरून सांगता येईल. कारण प्रेम त्या दोघांना आनंद देत असते आणि त्या आनंदात त्यांचा एकमेकांवरचा विश्वास आणि जबाबदारीची जाणीव जपत अधिक दृढ होण्यास मदत होत असते. हीच जाणीव जपत प्रेम ही संकल्पना अधिक उन्नत करूया आणि प्रेमाच्या रंगण्यात रंगून आणि प्रत्येकाशी प्रेमाने वागण्याचा निश्चय करूया. कारण
एक क्षण लागतो कुणाला तरी हसवण्यासाठी,
एक क्षण लागतो कुणाला तरी रडवण्यासाठी..
पण फक्त एक हृदय लागते कुणावर तरी प्रेम करण्यासाठी....
आणि आयुष्य लागते त्याला विसरण्यासाठी!
शेवटी शब्दांत व्यक्त होवो न होवो प्रेम ही अखंड प्रत्ययास येणारी ‘अनुभूती’ आहे!
-सर्वेश फडणवीस