आमदाराच्या कृषी विकास परिषदेत अश्लिल नृत्य ! - वरूडातल्या कार्यक्रमाचा व्हीडीओ व्हायरल
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :14-Feb-2019
अमरावती,
अमरावती जिल्ह्यातल्या मोर्शी - वरूड मतदारसंघाचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी 8 ते 11 फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रीय कृषी विकास परिषद वरूड येथे आयोजित केली होती. परिषदेत 9 फेब्रुवारीला सांयकाळी लोककला म्हणून ओळखल्या जाणार्‍या दंडार कार्यक्रमातून अश्लिल नृत्य झाल्याचे गुरूवारी व्हायरल झालेल्या व्हीडीओतून समोर आले आहे.
 
 
 

 
 
 
दरवर्षी आयोजीत होणार्‍या कृषी विकास परिषदेचे यंदा कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी उदघाटन केले होते. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सुद्धा परिषदेला हजेरी लावली होती. पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे व स्मिता कोल्हे यांचा सत्कारही येथे झाला होता. कृषी संबधीत विविध कार्यक्रमांसह मनोरंजनाचे कार्यक्रमही येथे शेतकर्‍यांसाठी आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रामा अंतर्गत 9 फेब्रुवारीला दंडार कार्यक्रम घेण्यात आला. दंडारमध्ये पुरुष महिलांची वेशभूषा करून विविध लोकगितावर नृत्य करतात. त्या प्रमाणे या कार्यक्रमातही दंडार सादर करणार्‍या कलाकारांनी नृत्य सादर केले. गुरूवारी याच कार्यक्रामातील एका नृत्याचा व्हीडीओ व्हायरल झाला. त्या व्हीडीओत महिलेच्या वेशभुषेत नृत्य करणार्‍या कलाकारासोबत एक व्यक्ती नृत्य करताना दिसत असून दाद म्हणून पैसेही देत असल्याचे दिसते. हा व्यक्ती माजी नायब तहसिलदार असल्याचे सांगण्यात येत आहे. इतरही काही लोक नृत्य कलाकाराला पैसे देताना दिसतात. या नृत्यातील कलाकार व त्याचे हावभाव अश्लिल असल्यामुळे हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. त्याची चर्चाही जोरातच होत आहे.
 
 
 
 
 
मनोरंजन व प्रबोधनासाठी ठेवले दंडार : डॉ. बोंडे
वरुडमध्ये झालेल्या कृषी परिषदेमध्ये शेतक-यांसाठी ग्रामीण लोककलेच्या दंडार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दंडारमध्ये पुरुष स्त्रीची वेशभुषा करून करुन नृत्य सादर करतात. दोन प्रतिस्पर्धी एकमेकांना कोडे टाकून नृत्याच्या माध्यमातून मनोरंजन करतात. लावणी, गवळण या लोकनृत्याचे प्रकारही या दंडारमध्ये असता. समाजप्रबोधनाचे विषयही या दंडारमधून घेतल्या गेले. सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये नृत्यकरणारी स्त्री नसून पुरुषच आहे. तो शेतक-याचा मुलगा आहे. कृषी परीषदेमध्ये दंडारचे आयोजन करुन शेतक-यांचे मनोरंजन व दंडार या ग्रामीण लोककलेला प्रोत्साहन देण्याचा मेळ साधण्यात आला आहे, अशी प्रतिक्रीया आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी तभाशी बोलताना दिली.