उन्नत भारत अभियानाचे क्षेत्रीय केंद्र मंजूर
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :14-Feb-2019
 
- पहिला बहुमान अमरावती विद्यापीठाला
- ग्रामविकास व स्वयंरोजगारावर भर
 
अमरावती,
उन्नत भारत अभियानाचे भारतातील पहिले क्षेत्रीय नोडल केंद्र संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला प्राप्त झाले असून त्या संदर्भात नुकतेच पत्र मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून विद्यापीठाला प्राप्त झाले आहे.
 
परम संगणकाचे जनक तथा उन्नत भारत अभियानाचे अध्यक्ष पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली सदर केंद्र विद्यापीठाला प्राप्त झाल्यामुळे विदर्भातील ग्रामीण भागाच्या विकासामध्ये या माध्यमातून मोठा हातभार लागणार आहे. कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी हे महत्वपूर्ण केंद्र विद्यापीठाला दिल्याबद्दल मानव संसाधन विकास मंत्रालय व डॉ. विजय भटकर यांचे आभार मानले आहे.
 
उन्नत भारत अभियान केंद्राच्या विदर्भ क्षेत्रीय नोडल केंद्राचे समन्वयक म्हणून विद्यापीठाच्यावतीने नवसंशोधन, नवोपक्रम व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ.डी.टी. इंगोले यांची निवड करण्यात आली असून या केंद्राच्या प्रवर्तक व सहसमन्वयक म्हणून डॉ. अर्चना बारब्दे काम पाहतील.
 
 
 
भारत हा कृषिप्रधान देश असून ७०% टक्के जनता आज ग्रामीण भागात राहते. शहराच्या विकासाच्या तुलनेत ग्रामविकास अजून झालेला नाही. शिक्षण व समाज या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून समाजाचा विकास करण्यामध्ये शिक्षणाचा फार मोठा वाटा आहे. विद्यापीठ शिक्षण देणारे ज्ञानकेंद्र असून त्या माध्यमातून समाज शिक्षित करण्याचे कार्य गेल्या ३५ वर्षांपासून अविरहितपणे केल्या जात आहे . कर्मयोगी संत गाडगे बाबा हे महान लोकशिक्षक होते. शिक्षणाचा फायदा समाजाला व्हावा असा मानस कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांचा नेहमीच राहिला आहे.
 
उन्नत भारत अभियानांतर्गत विद्यापीठाची विद्यार्थी शक्ती एकत्रित येऊन कार्य करणार आहे. उन्नत भारत अभियान व उन्नत महाराष्ट्र अभियान योजना ग्रामीण विकासातील अनेक अडचणी सोडवू शकतात, यासाठी विद्यापीठ स्तरावर क्षेत्रीय नोडल केंद्र मंजूर झाले, त्यामध्ये विदर्भातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ- रामटेक, गोंडवाना विद्यापीठ - गडचिरोली, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ - नागपूर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, व्ही.एन.आय.टी. -नागपूर यांचे सहकार्य राहणार असून त्याला उन्नत विदर्भ अभियान ( युव्हीए - युवा ) असे नाव दिले जाईल. या माध्यमातून ग्राम विकास व स्वयंरोजगारावर भर दिल्या जाणार असून ग्रामीण भागाचा विकास आणि त्या ठिकाणी स्वयंरोजगाराच्या संधी त्यामुळे उपलब्ध होतील.