मोठ्या सर्जिकल स्ट्राईकची गरज
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :14-Feb-2019
 
 

 
 
 
 विशेष संपादकीय...
 
 
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातल्या अवंतीपूर येथे आज गुरुवारी दुपारी अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात केंद्रीय राखीव सुरक्षा दलाचे वीसपेक्षा जास्त जवान शहीद झाले, ही देशवासीयांसाठी अतिशय दु:खद घटना आहे. या घटनेची निंदा करण्यासाठी शब्दही अपुरे पडावेत एवढे अमानवीय कृत्य अतिरेक्यांनी केले आहे. पाकिस्तानच्या मदतीने फोफावलेल्या जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी घेतली असून, या घटनेने पाकिस्तानचा खरा चेहराही जगासमोर आणला आहे. आता केवळ निषेध करून भागणार नाही. पाकिस्तानात दहशतवाद्यांचे अड्डे आहेत, तिथे अतिरेक्यांना लष्कराकडून प्रशिक्षित केले जाते आणि भारतात पाठविले जाते, हे लपून राहिलेले नाही. त्यामुळे घटनेचा नुसता निषेध न करता भारत सरकारने गेल्यावेळी केला होता, त्यापेक्षाही मोठा सर्जिकल स्ट्राईक करून अतिरेक्यांसोबतच पाकिस्तानचेही कंबरडे मोडले पाहिजे.
 
तोंडी निषेधाची भाषा पाकला समजत नाही. गोळीची भाषा तोफेनेच द्यावी लागेल. ज्याप्रमाणे अमेरिकेने पाकिस्तानला कळू न देता त्या देशात घुसून ओसामा बिन लादेन याला ठार मारले होते, त्याप्रमाणे भारतीय लष्करानेही पाकमध्ये घुसून मसूद अझरसार‘या अतिरेक्यांच्या म्होरक्यांना ठार मारून समुद्रात फेकले पाहिजे. दोन-चार अतिरेकी मारून शहीद जवानांच्या मृत्यूचा बदला घेऊन काम भागणार नाही. गुलाम काश्मीरमध्ये सैन्य घुसवून दहशतवाद्यांचे सगळे अड्‌डे उद्‌ध्वस्त करत पाकिस्तानी सैन्यालाही धडा शिकविणे गरजेचे आहे. पुलवामात झालेला दहशतवादी हल्ला ही देशासाठी गंभीर घटना आहे. त्यामुळे या घटनेचे राजकारण न करता प्रत्येक भारतीयाने या कठीण समयी सैन्य दलासोबत आणि भारत सरकारसोबत मजबुतीने उभे राहण्याची आवश्यकता आहे. दुर्दैवाने प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने राजकारण सुरू केले आहे.
 
भ्याड अतिरेकी हल्ल्याचे राजकारण करताना काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करून त्यांच्यावर टीका करण्याचा प्रकारही दहशतवादी हल्ल्याएवढाच निंदनीय मानला पाहिजे. या संकटसमयी सगळ्यांनी एकजुटीने राहात देशाचा विचार केला पाहिजे आणि पाकिस्तानला कठोर संदेश दिला पाहिजे. भ्याड हल्ल्यात जे जवान शहीद झाले आहेत, त्यांच्या कुटुंबीयांना धीर देण्याचे काम आम्ही केले पाहिजे. भारतीय सैन्यात काम करणार्‍या आणि चोवीस तास देशाच्या सीमांचे रक्षण करणार्‍या जवानांचे मनोबल खच्ची होईल, असे कुठलेही विधान कुणीही करता कामा नये. पाकिस्तानी हल्लेखोरांना मदत करणार्‍या स्थानिक लोकांची कसून चौकशी झाली पाहिजे, जे कुणी यामागे आहेत, त्यांना हुडकून काढत कठोर शिक्षा करायला पाहिजे. पाकिस्तान हा डरपोक देश आहे. प्रत्यक्ष युद्धात भारताने चारवेळा चारीमुंड्या चीत केल्याने पाकने भारताविरुद्ध छुपे युद्ध पुकारले आहे. त्यामुळे मागून वार करणार्‍या पाकिस्तानला आता त्यांच्या भूमीत घुसून पराभूत करणे आवश्यक आहे. कुठल्याही आंतरराष्ट्रीय दबावाला बळी न पडता, शेजारच्या चीनची भीती न बाळगता भारत सरकारने पाकिस्तानात सैन्य घुसवून पाकला नेस्तनाबूत करणे, ही काळाची गरज आहे.