पश्चिम महाराष्ट्र विदर्भाच्या भरोशावर :अ‍ॅड. अणे
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :14-Feb-2019
-विदर्भ निर्माण मंचची जाहीर सभा
अमरावती, 
विदर्भ आर्थिक दृष्ट्या कमकुवत नसून तो पश्चिम महाराष्ट्राला पोसत आहे. त्यामुळे विदर्भाला कमी लेखून चालणार नाही, अशी घणाघाती टिका विदर्भ निर्माण महामंचचे समन्वयक अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी केली. काँग्रेस व भाजपने विदर्भवाद्यांची फसवणूक केली असून या दोन्ही पक्षांना हद्दपार करण्याचे आवाहन त्यांनी केले.
 
 
 
स्थानीक सांस्कृतिक भवन येथे विदर्भ निर्माण महामंचची जाहीर सभा गुरुवारी 14 फेब्रुवारीला आयोजित करण्यात आली होती. व्यासपीठावर समन्वयक शेतकरी संघटनेचे माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, राजकुमार तिरपुडे, खोरिपाचे उपेंद्र शेंडे, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्टचे डॉ. सुरेश माने, आम आदमी पार्टीचे ब्रिगेडीयर सुधीर सावंत, राष्ट्रीय जनसुराज्य पक्षाचे राजेश काकडे, सुनील चोखारे, नाग विदर्भ आंदोलन समितीचे अहमद कादर, स्वप्नजीत सन्यास, डॉ. श्रीनिवास विराजमान होते.
 
पुढे बोलतांना अ‍ॅड. अणे म्हणाले की, स्वतंत्र विदर्भासाठी वेगवेगळी चूकीची कारणे सांगितल्या जात आहे. पश्चिम विदर्भात वेगळ्या विदर्भाचा लढा सर्वप्रथम उभा राहीला आहे. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा लढा दिवंगत जाबुवंतराव धोटे यांनी उभा केला होता. यवतमाळ येथील लोकनायक बापूजी अणे, अकोला येथील ब्रिजलाल बियाणी यांनी चळवळ सुरु केली. संयुक्त महाराष्ट्रासाठी अनेक हुतात्मे झाले आहेत. आपण विदर्भवादी तरूणांसह त्यांना मुंबई येथे श्रद्धांजली वाहण्यास तयार आहोत. परंतु संयुक्त महाराष्ट्रात विदर्भाचे स्थान नाही. शरद पवार मुख्यमंत्री असताना नागपुरात ११४ गोवारींना हुतात्म्य मिळाले होते, त्यांची पश्चिम महाराष्ट्र व मुंबईला जाणीव नाही. विदर्भातील तरूण मुंबईत रोजगारासाठी राहत आहेत. परंतु त्यांची निष्ठा व प्रेम विदर्भाप्रती आहे.
 
नागपुरचे बुटीबोरी, मिहानमध्ये ठणठणाट आहे. दरवर्षी दोन लाख तरूण मुंबईत नोकरीच्या शोधासाठी जात असतात. विदर्भात सिंचन व्यवस्था नाही. कालवे नाहीत. अप्पर वर्धाचे पाणी नांदगांव पेठ येथील औष्णीक विद्युत प्रकल्पास देण्यात आले. यासाठी नियम बदलण्यात आला. महाराष्ट्र मराठी भाषकांचे सांगितल्या जात असले तरी विदर्भात सर्व भाषिक आहेत. येथील हिंदी भाषीक येथीलच असल्याने ते वैदर्भीय आहेत. विदर्भात राहणारा प्रत्येक व्यक्ती वैदर्भीय आहेत. हिंदी भाषकांची तीन राज्ये असू शकत असताना मराठी भाषकांची दोन राज्य का नाही, असा प्रश्न त्यांनी केला. काँग्रेस व भाजपने वैदर्भीयांची घोर निराशा केली आहे. त्यामुळे या निवडणूकीत विदर्भ निर्माण महामंचला मोठे यश मिळण्याची आशा त्यांनी व्यक्त केली.
 
भाजपाला पराभूत करा : चटप
महाराष्ट्रात राहून विदर्भाच्या वाट्याला केवळ यातना आल्या आहेत. १२ वर्षात विदर्भातील ३५ हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. महाराष्ट्र विदर्भावर अन्याय करीत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी २०१४ मध्ये दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला आहे. त्यामुळे काँग्रेस प्रमाणे या निवडणूकीत भाजपला देखील पराभूत करण्याची वेळ आली असल्याचे अ‍ॅड. वामनराव चटप यांनी म्हटले.