शतदा प्रेम करावे...
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :14-Feb-2019
स्वातंत्र्याच्या सात दशकांत आम्ही किती पुढारलो, याची गणितं कागदोपत्री मांडता येतीलही कदाचित! भौतिक विकासाच्या पलीकडे मानवी विकासाचा परीघ आम्हाला किती विस्तारता आला, विचारांच्या परिपक्वतेची मर्यादा आम्ही किती प्रमाणात निश्चित करू शकलो, आम्ही सामाजिकदृष्ट्या किती प्रगल्भ, किती सोशीक झालो आणि नेमके त्याच्या उलट स्वत:च्या वैयक्तिक बंदिस्त जीवनासाठीच्या स्वातंत्र्याबाबत किती सजग झालोत, याचाही आलेख मांडता येईल जमलंच तर. जीवनाबाबतच्या संकल्पनांच्या संदर्भात मात्र खरंच आमचं आम्हाला काही ठरवता आलंय्‌, की नुसतीच कुणाच्यातरी मागे धावताना फरफट चाललीय्‌ आमची, याचाही विचार व्हावा कधीतरी. बर्‍याचदा फरफटच असते ती. कुणीतरी, बाहेरच्या माणसानं त्याच्या फायद्यासाठी म्हणून तयार केलेल्या मार्केिंटग स्ट्रॅटेजीचे बळी तर ठरत नाही आहोत ना आपण, असा प्रश्न मनात यायच्या आधीच पुरती गुरफटली गेली आहेत माणसं त्यात. गरज नसलेल्या वस्तू कर्ज काढून विकत घेण्याचे फॅड हा त्याचाच परिणाम अन्‌ स्वत: ग्राहकाच्या भूमिकेत येत, बेसुमार सौंदर्यप्रसाधनांचे मार्केट विदेशी कंपन्यांना मिळवून देण्याचे अपश्रेयही आपलेच. मागील काही वर्षांत मानवी जीवनाची मूल्यंही नको तितकी मातीमोल करून ठेवली आहेत आम्ही. मानवी संबंधांची वीण त्यातनं आपसूकच सैल होत गेल्याचे शल्यही केव्हाच अस्तंगत झाले आहे. आतातर इतरांचे भावविश्व पायदळी तुडवून पुढे जाण्यातच हुशारी असल्याचे, हे व्यवहारी जग सांगू लागले आहे. या स्पर्धेत वाहवत जाताना आम्ही काय काय धरलं अन्‌ काय काय सोडलं, याचाही हिशेब राहिला नाही. तसा शिलकीचे रकान्यात आकडे मांडण्याजोगा तो हिशेबही राहिलेला नाही आताशा. पाश्चिमात्यांनी त्यांच्या सोयीनं मांडलेली काही प्रमेयं आम्ही जशीच्या तशी उचलली, योग्यायोग्यतेची पारख केल्याविनाच. खरंतर भुरळ पडली आम्हाला त्याची. मग त्यातला फोलपणा, त्यामागची मार्केिंटग स्ट्रॅटेजी, त्यात आपला ‘ग्राहक’ म्हणून झालेला पोपट, या सार्‍याच बाबी भावनेच्या ओघात वाहून गेल्या. त्यांच्या मार्केिंटग स्टाईलचा पगडाच इतका जबरदस्त होता, की त्यात आपली फरफट होतेय्‌ याचा विचार न करताच प्रत्येक जण त्यामागे धावू लागला- िंजकण्याच्या ईर्ष्येने- खंत खिशात कोंबत आनंद चेहर्‍यावर लेवून...
 
 
 
 
 
आजपासून पाच-पंचेवीस वर्षांपूर्वी या देशात कुणी एकमेकांवर प्रेम करीत नव्हते असे कुठे आहे? उलट, समाजाचा विरोध झुगारून, प्रसंंगी विरोध करणार्‍यांशी संघर्ष करून स्वत:च्या प्रेमाला आकार देणार्‍या वीरांच्या कहाण्या अजरामर झाल्यात इथे. आता समाजाचा विरोध तर खिजगणतीतही नसतो कुणाच्याच. आपापल्या मुला-मुलींनी परस्पर केलेली त्यांच्या जोडीदाराची निवड पालकही विनासायास मान्य करू लागलेत एव्हाना. अगदी समलैंगिक संबंध मान्य करण्याइतके विचारांचे पुढारलेपण तर इथल्या जुन्या पिढीनेही स्वीकारले आहे. ज्यांना मागासलेले म्हणून हिणवले जाते, ती पिढी जर इतकी प्रगल्भ असेल, तर मग स्वत:ला प्रगत म्हणवून घेणार्‍यांनी का इतके अविचारी वागावे? ‘व्हॅलेण्टाईन डे’ आज सर्वदूर ‘साजरा’ होईल. त्यानिमित्ताने सर्वत्र प्रेमाचा पाऊस बरसेल. गुलाबाच्या फुलांचे भाव, वाढलेल्या मागणीनुसार आपसूकच वधारतील. त्या महागड्या फुलांनाही वाढीव मागणी असेल. ग्रीिंटग कार्डस्‌, चॉकलेट्‌स... खिशाला परवडेल की नाही, हा प्रश्न चेहर्‍यावर उमटलेलादेखील दिसणार नाही कुणाच्याच. उलट, पैशाची उधळण चाललेली दिसणार आहे सगळीकडेच. मग काय? गेला आठवडाभर याच दिवसाची तर वाट बघतोय्‌ प्रत्येक जण. रोज डे, प्रोपोज डे, चॉकलेट डे, टेडी, प्रॉमिस, हग, किस... असे सहा दिवस मागे पडल्यावर कुठे आजचा दिवस उजाडला आहे. या दिवशी प्रियकरानं प्रेयसीसमोर िंकवा प्रेयसीनं प्रियकरासमोर जाताना चार पैसे जास्तीचे खर्च करण्यासाठी मागेपुढे का म्हणून पाहायचे सांगा? हा, आता उद्या काय करायचं, हे मात्र ठरवलेलं नसणार कुणीच. खरं ना? आयुष्यभर एकमेकांच्या साथीनं, एकमेकांसाठी जगण्या-मरण्याच्या आणाभाका घेण्यासाठीचा मुहूर्तच असा सात दिवसांच्या कालावधीत मर्यादित करून ठेवलाय्‌ म्हटल्यावर दुसरं काय घडणार? आजपासून दहा-वीस वर्षांपूर्वी कुणाला ठाऊकही नसलेला ‘व्हॅलेण्टाईन डे’ असा अचानक प्रसिद्धीस कसा पावला, याहीपेक्षा त्या सात दिवसांत होणारी, गुलाबाच्या फुलांपासून तर चॉकलेटस्‌पर्यंत अन्‌ शुभेच्छापत्रांपासून तर इतर वस्तूंच्या विक्रीची आकडेवारी, त्या माध्यमातून धंदा नेमका कुणाचा झाला अन्‌ आम्ही मांडलेल्या आमच्याच प्रेमाच्या सार्वजनिक प्रदर्शनाचा ‘ते’ कसा व्यापार करताहेत, एवढे जरी लक्षात आले, तरी हा असा कुठलासा मुहूर्त पाहून आपल्या प्रेमाचा सार्वजनिक ठिकाणी बाजार मांडण्याचा प्रकार तरी थांबेल. तसेही, इथे प्रेमाला विरोध नाही कुणाचाही कुणाच्याच. आक्षेप फक्त त्याच्या बाजारीकरणाला आहे. त्याच्या सार्वत्रिकीकरणाला आहे. दोन जणांचं एकमेकांवरील प्रेम, त्यांचे आपसातले संबंध, हा त्या दोघांचा खाजगी विषय. जगासमोर त्याचे प्रदर्शन मांडायचे तरी कशाला? शिवाय, वर्षभरातल्या मोजक्या सात दिवसांत आयुष्यभराच्या प्रेमाचं संचित ठरावीक साच्यात मांडण्याची रीत ‘त्यांना’ भावणारी असेलही कदाचित, पण आपली परंपरा, संस्कृती तर नाही तशी. ती उच्छृंखल नाही, तशी संकुचितही नाही. तिला प्रेमाची सुरेल साथसंगत जशी वर्ज्य नाही, तसे त्याचे बाजारीकरणही मान्य नाही. पण दुर्दैवाने, गेल्या काही दिवसांत ‘आपल्या’ लोकांच्या आक्षेपाचाच फक्त बाऊ झाला. ‘त्यांची’ मार्केिंटग ट्रिक सुरुवातीला कुणाच्या ध्यानातच आली नाही. नंतर लक्षात आली तोवर ते आणि आपण बरेच पुढे निघून गेलो होतो आणि आता तर ‘व्हॅलेण्टाईन डे’ हा जणू दिवाळसण होऊन बसलाय्‌ आमच्यासाठी! हळुवार प्रेमाची तरल तर्‍हा बाद ठरून सार्वजनिक ठिकाणी मांडला गेलेला उच्छाद लोकप्रिय ठरू लागलाय्‌ अलीकडे. प्रेमाच्या झाडाला फुटू लागलेल्या वासनांधतेच्या फांद्यांचे जाळे संपूर्ण समाजासाठी िंचतेचा विषय ठरावा, इतके क्लिष्ट ठरू पाहाताहेत. त्याला होणारा विरोध हा समाजस्वास्थ्यासाठीच्या िंचतेचा भाग आहे. तो कुणाला त्यांच्या वैयक्तिक जीवनातला हस्तक्षेप वाटत असेल, तर मग तरुणाईचे अनिर्बंध वागणे, हा इथल्या समाजव्यवस्थेतला अधिक्षेप आहे, हे त्यांनीही ध्यानात घ्यायला हवे. दोन जिवांचे एकमेकांवरील प्रेम हा दोघांच्या खाजगी जीवनातला विषय सार्वजनिक स्तरावर पोलिस बंदोबस्ताचा विषय ठरत असेल, तर एकदा त्याच्या आक्षेपार्ह तर्‍हेबाबत सर्वांनाच विचार करावा लागेल. तो तसा होऊ नये, याची काळजी तरुणाईलाच घ्यावी लागेल. आपले प्रेम ही कुणासाठीची बाजारपेठ ठरू नये, हे तर ओघानेच आले. पाकिस्तान, मलेशिया, सौदी अरेबिया, इराणसारख्या देशात ‘व्हॅलेण्टाईन डे’ला होणार्‍या विरोधाचे समर्थन न करताही भारतातील तरुणाईद्वारे या दिवसाच्या निमित्ताने मांडल्या जाणार्‍या उच्छादाचा पुनर्विचार तर नक्कीच होऊ शकतो...
 
 
 
 
‘या जगण्यावर, या जन्मावर शतदा प्रेम करावे...’ असे मानणारा हा समाज आहे. कृष्णाच्या राधेवरच्या निस्सीम प्रेमाचीही भुरळ या समाजाला आहे. तो प्रेमाचा विरोधक कसा असू शकेल? प्रेमाच्या मार्केिंटगला विरोध, हे त्याचे वैचारिक पुढारलेपण आहे, खरंतर...
 
 
 
उसके खारेपनमेभी कोई कशीश होगी जरूर
वरना क्यु सागर से यु जा जा कर दरीया मिले?
ही उत्कट भावना म्हणजेच प्रेम... दोघांचं. एकमेकांवरचं. अगदी नैसर्गिक. जगन्मान्य व्हावं असं. त्याचे हीणकस जाहीर प्रदर्शन नको, बस्स!