कामरगावात सेल्फीवरुन दोन गटात दगडफेक
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :14-Feb-2019
- दुकानांचीही तोडफोड
- शाळा महाविद्यालये व दुकाने बंद
 
 
कारंजा लाड, 
कारंजा तालुक्यातील कामरगाव येथे सेल्फीवरून वाद निर्माण झाल्याने दोन गटात दगडफेक झाल्याची घटना १३ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा घडली. यावेळी जमावाकडून जवळपास ११ दुकानांची तोडफोड करण्यात आली. यावेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
 
 
 
दरम्यान आज कामरगावात तणावपूर्ण शांतता असून शाळा महाविद्यालय व दुकाने बंद आहे. तसेच ठिकठिकाणी दंगल नियंत्रण पथक बसविण्यात आले असून, पोलिस गावात गस्त घालीत असल्याचे देखील दिसून आले. सदर घटनेत झालेल्या दुकानांच्या तोडफोडीचा आज कामरगाव येथील तलाठी एच. ए. भगत, वरघट व गुगळे यांनी पंचनामा केला. यावेळी तोडफोड झालेल्या ११ दुकानांचे २ लाख १८ हजार रूपयाचे नुकसान झाल्याचे नोंदविण्यात आले. सदर पंचनामा कारंजा तहसील कार्यालयात पाठविण्यात आल्याची माहिती तलाठी एच.ए. भगत यांनी दिली आहे. १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी जमावाने विज प्रवाह खंडित केल्याने निर्माण झालेल्या अंधारामुळे गोंधळ उडाला होता. तसेच यावेळी जमावाकडून करण्यात आलेल्या दगडफेकीत कामरगाव पोलिस चैकीतील कार्यरत पोलिस उपनिरीक्षक राहुल गुहे जखमी झाले.
 
१२ फेब्रुवारी रोजी कामरगाव येथे संत बबन महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेत दुपारच्या सुमारास काही युवक सेल्फी काढत हेाते. दुसर्‍या गटातील तरूणांनी त्यांना हटकले असता, वाद निर्माण झाला व तो वाद शांतही झाला होता. १३ फेब्रुवारी रोजी कामरगाव येथील आठवडी बाजार असल्याने सायंकाळी या वादाला पुन्हा तोंड फुटले व दगडफेक तसेच दुकानांच्या तोडफोडीची घटना घडली. सुरूवातीला पोलिस मुख्यमंत्र्यांच्या बंदोबस्तासाठी गेले असल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतू त्यानंतर धनज, कारंजा शहर व ग्रामीण, तसेच मंगरूळपीर पोलिस स्टेशनमधील पोलिस व दंगल नियंत्रण पथक कामरगावात दाखल झाल्याने वातावरण शांत झाले. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांनी सुध्दा कामरगावला भेट दिली तसेच पोलिसांनी नागरिकांनी अफवांवर विश्‍वास न ठेवता शांतता राखावी असे आवाहन केले आहे.