नरभक्षक वाघाचा त्वरीत बंदोबस्त करा
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :15-Feb-2019
-कोरा परिसरातील नागरीकांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घातले साकडे 

गिरड,
जिल्हाच्या सीमेला लागून असलेल्या कोरा परिसरात नरभक्षक वाघाने चांगलाच धुमाकूळ घातला असून गेल्या चार दिवसात १० बकऱ्या एक गाय एक वासरू ठार केल्याने चांगलीच भिती निर्माण झाली आहे. या वाघाचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी कोरा परिसरातील ग्रामवासीयांनी समुद्रपूर येथील वनक्षेत्र अधिकारी पी. डी. बाभळे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
 
 
 
९ फेब्रुवारीला वाघाने वसंत आडे यांच्या गावालगत असलेल्या गोठ्यात शिरून १० बकऱ्यांना ठार केले होते. यावरच न थांबता दुसऱ्या दिवशीही हा वाघ गावाकडे आला यावेळी नागरिकाच्या सतर्कतेने त्याला फटाके फोडून जंगलाच्या दिशेने पाठविण्यात आले, मात्र  वाघाने हा परिसर सोडून पुन्हा १२ फेब्रुवारीला कोरा येथिल एक शिवारातील गोठ्यात शिरकाव करून एका गाईला ठार केले. वाघाच्या वाढत्या घटनांमुळे कोरा, मंगरूळ परिसरातील नागरिकांमध्ये चांगलीच भीती निर्माण झाली आहे. या घटनांनी शेतकरी दिवसाही आपल्या शेतात काम करण्याकरता जाण्यास घाबरत आहे.
 
वाघाच्या घटनांवर आळा घालण्यासाठी वनविभागाने त्वरीत वाघाचा बंदोबस्त करावा तसेच जंगलालगत असलेल्या शेतकऱ्यांना व त्यांच्या जनावरांना हिंसक प्राण्याच्या मुक्त-संचारा पासुन बचावाकरीता जाळीचे कुंपण देण्यात यावे अशा मागणीचे पत्र पंचायत समिती सदस्य वसंत घोंगडे यांच्या मार्गदर्शनात शेतकऱ्यांनी समुद्रपूर वनपरिक्षेत्राधिकारी गाठून वनपरिक्षेत्र अधिकारी पी. डी. साबळे यांना दिले.