कौमार्य चाचणी... कशाला?
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :15-Feb-2019
स्त्री हा कायमच समाजाच्या िंचतेचा आणि िंचतनाचा विषय राहिला आहे. कारण समाजाची शुचिता म्हणजे स्त्रीची पवित्रता, असेच निकष आपण लावत आलो आहोत. विवाहसंस्था अस्तित्वात आल्यापासून स्त्रीधनाची व्याख्या बदलली. त्या आधी स्त्री हेच धन मानले जायचे. त्यानंतर पुरुषसत्ताक पद्धती अधिक घट्ट झाली. सिमान्‌ दी बहुवाच्या ‘दी सेकंड सेक्स’ या जागतिक पातळीवर गाजलेल्या पुस्तकात (मराठीतही त्याचे भाषांतर झालेले आहे), जगभरातल्या स्त्रियांच्या माणूस म्हणून आणि स्त्री म्हणून वाटचालीचा आणि पुरुषांच्या तिच्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाचाही विस्ताराने, अभ्यासपूर्ण आढावा घेण्यात आला आहे. त्यात अगदी पुढारलेला समाज म्हणविल्या जाणार्‍या अमेरिकेपासून अगदी प्राचीन सभ्यता मानल्या जाणार्‍या ग्रीक आणि भारतापर्यंत स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन मांडण्यात आला आहे. एकीकडे तिला देवी मानायचे... कारण त्या काळात प्रजननाचा निसर्ग मानवाला कळला नसल्याने स्त्री आपल्यासारख्याच एका जिवाला जन्म देते, हा तिचा खूप मोठा चमत्कार मानला जायचा आणि म्हणून मग तिच्याविषयी गूढ निर्माण झाले. त्यातून तिला दैवी मानले जाऊ लागले आणि मग ती देवी ठरली. एकीकडे ती देवी आहे आणि दुसरीकडे उपभोग्य वस्तूही आहे. उपभोग्य वस्तू अस्सल, शुद्ध आणि कसदारच असली पाहिजे, हा कुठल्याही उपभोक्त्याचा अट्‌टहासच असतो. त्यासाठी तो विशेष िंकमत मोजतो, असा किमान त्याचा समज असतो. त्यामुळे स्त्रीदेखील तशीच असली पाहिजे, हादेखील अट्‌टहास कायम राहिला आहे. तो आदिम असाच आहे. अगदी माणूस टोळी करून राहायचा त्या काळातही तिची शुद्धता तपासली जायची आणि त्याचा एकमेव निकष हा शारीरिक होता. म्हणजे कौमार्य हा तिचा दागिना ठरविण्यात आला. त्यावरच तिची मानसिक आणि शारीरिकही जडणघडण करण्यात आली.
 
विवाहसंस्था अस्तित्वात आल्यानंतर तिची ससेहोलपट थांबली. नाहीतर आधी गोधन पळविले जायचे युद्धांत तसेच स्त्रीधनही पळविले जायचे. जनानखाना ठेवायचा आणि दासींनाही सोडायचे नाही, हे अगदी सोळाव्या-सतराव्या शतकापर्यंत सुरू होते. एकपत्नीत्वाचा कायदा हा अलीकडच्या सभ्यतेत आला. तोवर ही तिची ओढाताण सुरूच होती. तरीही मग आपल्या वाट्याला आलेली स्त्री दुसर्‍या कुणी उपभोगलेली नसावी, यासाठी कौमार्य चाचणी केली जायची. आताही ती केली जाते. अगदी सभ्य समजल्या जाणार्‍या समाजातही विवाहानंतर पहिल्या रात्री ते तपासण्याच्या विविध पद्धती आहेत. काही ठिकाणी ते आधीही तपासले जाते. काही जातपंचायतीत तर उकळत्या तेलात हात घालण्याचीही परीक्षा घेतली जाते. अगदी अलीकडच्या काळातही हे असले प्रकार काही तांड्यांवर, जातपंचायतीत घडतात. तिला मग कुलटा ठरविले जाते. पुरुषाची असली कुठली चाचणी केली जात नाही. कौमार्याबद्दलच्या या कल्पना अत्यंत अप्रागतिक आणि मागास अशाच आहेत. वैद्यकीयदृष्ट्या कौमार्यभंगाची अनेक कारणे असू शकतात. आता महाराष्ट्र सरकारने कौमार्य चाचणी हा गुन्हा ठरविण्याचे विधेयक पास केले. आता त्याचा कायदा होईल. महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय अत्यंत चांगला आहे, पुढारलेला आहे आणि विज्ञानवादीही आहे. अत्यंत धाडसी आणि स्त्रीवादी असाच हा निर्णय आहे. त्याचे स्वागत करताना केवळ सरकारने कायदा करून होत नाही, तर समाजाने तो तितक्याच विवेकी शहाणपणाने अंमलात आणला पाहिजे, हे महत्त्वाचे आहे.
 
 
लोकशाही म्हणजे कायद्याचे राज्य, हे जरी खरं असलं तरी शेवटी खर्‍या अर्थाने कुठल्या कायद्याचे राज्य, हा प्रश्न पडतोच. आपण देशात घडणार्‍या घटनांचे निरीक्षण करतो तेव्हा अशा अनेक प्रथा सुरू असल्याचे आपल्याला दिसून येते. काही दिवसांपूर्वी कौमार्य चाचणीविरोधी कायदासंदर्भात ठराव पास करण्यात आला. खरेतर कौमार्य चाचणी या विषयावर बोलले जातेय तसेच त्याचा विरोध म्हणून कायदा करण्याचा विचार केला जातोय, ही बाब खरेच कौतुकास्पद आहे. जेव्हा आपण आधुनिक आणि सुसंस्कृत समाजाचा विचार करतो, तेव्हा त्यातील महत्त्वाचा घटक म्हणजे स्त्री-पुरुष समानता, हाच आपण मानतो. याचाच अर्थ, स्त्री-पुरुष यांच्यात भेदभाव न करता सामाजिक जीवनात सर्वांना समान न्याय, सन्मान, प्रतिष्ठा मिळेल हे अपेक्षित असते. परंतु, या सर्वांना दूर सारून आजही जुन्या प्रथा सुरू असताना दिसतात. कांजभाट समाजातील कौमार्य चाचणी ही प्रथा स्त्रीच्या अस्तिवाला काळिमा फासणारी आहे. गेल्या काही वर्षांपासून कौमार्य चाचणी हा घृणास्पद प्रकार बंद व्हावा म्हणून पुण्यामधील काही युवकांनी ‘स्टॉप द वि रिच्युअल’ नावाची चळवळ चालविली आहे. या चळवळीला कांजभाट समाजातीलच नव्हे, तर अनेक विखुरलेल्या जाती आणि जमातींचा विरोध होतो आहे. चळवळ करणार्‍या मुलांना निर्घृण मारहाण करण्यापर्यंत मजल गेली आहे. एकीकडे आपण सुशिक्षित असल्याचे दाखले देतोय आणि दुसरीकडे अन्यायाविरुद्ध लाढणार्‍यांना मागे खेचतोय, हे कितपत योग्य आहे? आज आपण यावर उपाययोजना म्हणून कायदा बनवतो आहे, परंतु एखाद्या कायद्यामुळे स्त्रियांचे प्रश्न सुटणार नाहीत, याचीही जाणीव आपण सर्वांनी ठेवली पाहिजे. मात्र स्त्रियांच्या हक्काची मागणी करण्याचे एक चांगले व्यासपीठ या कायद्याच्या माध्यमातून उपलब्ध झाले आहे. खरेतर नुसता कायदा काढून उपयोग नाही, तर त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहेच. त्याचबरोबर मानसिकतेत बदल होण्याची गरज आहे.
 
कौमार्य चाचणी म्हणजे काय? तर लग्नानंतर पहिल्या रात्री नवरा मुलगा आपल्या बायकोची कौमार्य चाचणी करून ती शुद्ध आहे की नाही ते जाहीर करतो. सभ्य समाजात आता हा प्रकार जवळपास नाहीसा झाला असला, तरीही हा ‘रक्तलांच्छित’ तपास मात्र चुपचाप घेतलाच जातो. तसे नाही झाले, चादर बेदाग राहिली तर आपण फसविले तर गेलो नाही ना, आपल्या बायकोचे इतरांशी संबंध आलेले तर नाही ना, अशी शंका नवरोबाच्या मनात असतेच. आधुनिक वैद्यकीय विज्ञान काहीही सांगत असले, तरीही परंपरागत मानसिकता काही स्वस्थ बसू देत नाही.
गावकुसाबाहेर, भटक्या सामाजात आणि अजूनही जातपंचायतचा कायदाच मानला जातो तिथे मात्र अजूनही लग्नाच्या पहिल्या रात्री ही तपासणी केलीच जाते. त्यासाठी नव्या जोडप्याच्या शयनकक्षाच्या बाहेर नवर्‍याच्या घरची मंडळी बसलेली असतात. ‘निकाल’ काय येतो, ही त्यांची उत्सुकता असते. काही जमातींमध्ये तर एक प्रौढ स्त्री नवर्‍या मुलीची विवस्त्र करून तपासणी करते आणि नंतरच तिला मधुचंद्राच्या खोलीत सोडले जाते. बाहेरून सतत विचारले जाते, ‘‘माल खरा आहे ना?’’ आणि त्याने सांगितले की, ‘‘खरा आहे!’’ मग बाहेर जल्लोष केला जातो. तसे नाही झाले तर मग मात्र त्या मुलीच्या छळाला पारावार नसतो. अत्यंत घृणास्पद आणि क्रूर प्रकार केले जातात. स्त्रीत्वाचा अपमान करणारी ही कुठली प्रथा आहे?
 
आता स्त्रिया सार्वजनिक जीवनात सर्वच आघाड्यांवर वावरतात. खेळाडूंपासून तर वैमानिक होण्यापर्यंत त्यांनी मजल मारली आहे. शारीरिक कवायती आणि कष्ट, कसरती त्या करतात. आधीही त्या जड कामे करतच होत्या. खेड्यातल्या स्त्रिया तर खंत्यावर, घरकामांवर कष्ट करतात. कौमार्य तपासणी म्हणून जे निकष लावले जातात तो यौनपडदा भंग होण्यास ही कारणे पुरेशी असतात. धावणे, सायकल चालविणे, शाळेत अनेक कसरतींमध्ये भाग घेणे हे मुलींना करावेच लागते. हे या लोकांना कधी कळेल? मुलीच्या सन्मानाचा आणि अभिमानाचा बाजार या समाजात मांडला जातो. मग मुलीच्या कौमार्याची चाचणी कशासाठी? एक मुलगी, सुशिक्षित आणि सामाजात आघाडीने वावरणारी चळवळी म्हणून मलाही हा प्रश्न पडतो. मग मुलांच्या कौमार्याच काय? हा प्रश्न यांना कोण विचारणार? म्हणजे अगदी सतीप्रथेपासून तर 2019 मध्ये चालू असलेल्या कौमार्य चाचणीपर्यंत फक्त मुलींवरच अन्याय का? पुरुषी मानसिकता याला जबाबदार तर आहेच. परंतु परंपरेने आणि रूढी-प्रथानुसार वागणार्‍या महिलाही तितक्याच जबाबदार आहेत. स्त्रीचा अपमान करणारी ही प्रथा बंद व्हायलाच पाहिजे. आज मुलं- मुली बरोबरीने शिकत आहोत. सुशिक्षित होत आहोत. जग कुठून कुठे जात आहे आणि आम्ही अटकलोय कौमार्य चाचणीवर...! हे कधी थांबणार? मुळात ही कौमार्य परीक्षा कशासाठी? काय, तर मुलगी वयात अली तर काही चुकीचं करू नये म्हणून. का? प्रत्येक मुलगी वयात आली तर चुकीचेच करेल, असं का वाटते? आणि ती काही चुकीचं वागत असेल, तर त्याच वेळी त्या चुकीत एक पुरुषही सहभागी असतोच की. बर्‍याचदा तर ते तिच्यावर लादलेले असते. जबरदस्तीनेही झालेले असते. सांगता येत नाही अन्‌ सहनही होत नाही, अशीही अवस्था असते... आणि महत्त्वाचे म्हणजे तुमच्या कौमार्याच्या परीक्षेत ते नापास ठरण्याला केवळ शारीरिक संबंध हेच कारणीभूत नसतात.
 
त्यावरचाही प्रश्न म्हणजे, जे काही करते ते चूक की बरोबर हे ठरवणारे आम्ही कोण? संविधानाने तिला स्वतंत्र व्यक्ती म्हणून दर्जा दिलेला आहे. स्वतंत्र नागरिक म्हणून अधिकार दिला आहे. तिच्या सर्वच गरजांचे आणि अधिकारांचे संरक्षण संविधान करते. अगदी तिच्या नकाराचाही सन्मान आपण करायला हवा. भारतीय राज्यघटनेत परिच्छेद क्रमांक 21 मध्ये दिलेला खाजगी अधिकाराचा (ठळसहीं ींे िीर्ळींरलू ) ती वपार करूच शकते. तरीही आम्ही बंधने टाकतो आहे. म्हणजेच कुठेतरी आम्ही संविधान नाकारतो आहे. खरेतर आपण मुला-मुलींना लैंगिक शिक्षण देण्यात कमी पडतोय. लैंगिक विचार हा जीवनाचा सर्व बाजूंनी विचार करायला लावणारा महत्त्वाचा भाग आहे. असे असूनही आज त्याकडे समाजव्यवस्थेचं दुर्लक्ष होतंय, ही दुर्दैवी बाब आहे. दुर्दैवाने लैंगिकता म्हणजे न बोलण्याचा विषय आहे, असाच एकुणात समज आहे. तिला सुरक्षित ठेवण्याची भावना नक्कीच चांगली आहे. तिलाही विशुद्ध मनाचं आणि तनाचंही असावं असंच वाटतं, मात्र ते भंगही पुरुषच करतात आणि पावित्र्याची मागणीही तेच करतात, हे ढोंग आहे. आपल्या शिक्षणव्यवस्थेत लौंगिक शिक्षण असावेच, असं माझंतरी वैयक्तिक मत आहेच. अत्यंत निकोप भावानं हे शिकविलं आणि शिकलं जावं. ‘सेक्स’ या शब्दाबद्दल आपल्या समाजात एक नकारात्मक भूमिका आहे. या विषयी कुणी बोलायचे नाही. प्रश्न विचारायचे नाही आणि याचमुळे वाढणार्‍या अंधश्रद्धेचं प्रमाण खूप मोठं होत आहे. याच अंधश्रद्धेतून निर्माण होतात या अशा कौमार्य चाचणीसारख्या कुप्रथा... रूढी, प्रथा, परंपरेतून मोठ्या प्रतिष्ठा जपणार्‍या अशा कौमार्य चाचणीची कुप्रथा चालूच आहे. प्रशिक्षित, सुशिक्षित समाजात कौमार्य चाचणी होताना जरी दिसत नसली, तरी प्रत्येक पुरुषाला आपली होणारी सहचारिणी ही कौमार्य संभाळलेली असावी, असेच वाटते, हेही तितकेच खरे आहे. या सर्व गोष्टींना प्रतिबंध घालण्यासाठी जरी कायदा येत असला, तरी कायदा मानसिकतेत बदल घडवून आणेल का, हा मोठा प्रश्न समोर पडतो आहे. कायदा हा वाईट गोष्टी दूर करण्यासाठी मदत करेल, परंतु त्याची अंमलबजावणी ही स्वतःलाच करावी लागेल. अशा कुप्रथा बंद करण्यासाठी कायद्याची गरज असते; पण अशा प्रकारचा सामाजिक कायदा स्वतःच्या पायावर कधीच उभा राहणार नाही. जोेपर्यंत त्याला लोकमताचा आधार मिळणार नाही. तोपर्यंत त्याची हवी तशी अंमलबजावणी होणार नाही. म्हणून खरा प्रश्न अंमलबजावणीचा आहे. हाही कायदा इतर कायद्यांप्रमाणे कागदावरच राहील का, असा संशय येतो. तर दुसरीकडे अशीही भीती वाटते की, खरंच रूढी-परंपरेतून समाज बाहेर पडणार का? िंपजरा उघडला आहे, पण पक्षीच िंपजर्‍याबाहेर पडायला तयार नाही. याची काळजी ही समाजालाच घ्यावी लागणार आहे.
अॅड. प्रीती मख