आणिबाणीतील संघर्ष : एक स्मरण...
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :15-Feb-2019
आमच्या दिवसाची सुरुवातच चहासोबत तरुण भारतच्या वाचनाने होत असे. त्या दिवशी तरुण भारत हे नावच मुळी काळ्या अक्षरांत छापलेले. सोबत कोर्‍या चौकटी व अनेक राष्ट्रीय नेत्यांच्या अटकेच्या बातम्या ठळक अक्षरांत दिलेल्या. झोपण्यापूर्वी रेडिओच्या बातम्या ऐकलेल्या नसल्यामुळे काय झाले, याची काहीच कल्पना नव्हती. तो दिवस आमच्यासाठीच केवळ नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी, देशासाठी एक विषाक्त दिवस म्हणून उगवला होता. नागरिकांच्या मूलभूत स्वातंत्र्यावर हुकुमशाहीचा वरवंटा फिरवला होता. संघ, संघपरिवार व इतरही राजकीय मतभेद असणार्‍यांच्या अनेक कार्यकर्त्यांना अटक केली गेली. संघाला आपले दैनिक कार्य, कार्यक्रम करण्यापासून रोखण्यात आले. समाजाच्या आचार व अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी करण्यात आली. आता आपले पुढे काय? असा प्रश्न आमच्या परिवारात चर्चिला जाऊ लागला. गेली 14 वर्षे प्रचारकी जीवनानंतर नुकताच संसारिक जीवनाला ‘ह्यांनी’ म्हणजेच सुरेश तापस यांनी प्रारंभ केला होता. संघ, विद्यार्थी परिषद, नंतर भा. म. संघ असा प्रवास करीत धरमपेठ महाविद्यालयातील प्राध्यापकी स्वीकारून यांंनी माझ्यासोबत विवाह करून संसार थाटला होता.
 
अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे हे अस्वस्थ होते. संघ स्वयंसेवक, अधिकारी, कार्यकर्ते यांना बंदिस्त करणे सुरू होते. बरोबरच संघ व संघप्रेरणेने चालणार्‍या अनेक कार्यांमध्ये अडथळे निर्माण झाले होते. देशातील राष्ट्रीय विचारधारेच्या गळ्याला नख लावण्याचा हा प्रयत्न होता. हे संतप्त होते, अस्वस्थ होते. घरी येणार्‍या मित्र कार्यकर्त्यांजवळ ही अस्वस्थता व अगतिकता प्रकट होत होती. ती दूर करण्यासाठी कार्यकर्त्यांच्या भेटी, काही गुप्त बैठका यामध्ये हे सहभागी होत, परंतु निश्चित काय करावे हे कळेना. या वेळपावेतो काही निर्णय झाल्याचे ह्यांनी मला सांगितले. जे बाहेर आहेत त्यांनी विविध संघटना, व्यक्ती समाजगटाशी संपर्क साधून आणिबाणीविरोधी संघर्ष करण्याचा निर्णय संघाने घेतला होता. व्यक्त केले नाही तरी हे या संघर्षात सहभागी होणारच, हे माझ्या लक्षात आले होते. परिस्थितीचे योग्य ते भान, समज व माहिती समाजघटकांपर्यंत पोहचविण्याचा निर्णय संघाने घेतला होता व तसे कामही सुरू झाले होते.
साधारणत: या परिस्थितीला एक महिना लोटला होता. एक दिवस ह्यांनी मला सांगितले, स्व. मा. विनायकराव फाटकांच्या निरोपावरून ते मा. श्रीरामजी जोशींना कोर्टात भेटावयाला गेले. मा. श्रीरामजींची केस त्या वेळी हायकोर्टात सुरू होती. तिथे श्रीरामजी येत. त्या भेटीत ठरल्यावरून, विद्यार्थी परिषदेचे काम ह्यांनी पुन्हा सुरू करावे, असा मा. विनायकराव फाटकांचा निरोप होता.
 
प्राप्त सूचनेनुसार ह्यांनी विद्यार्थी परिषदेच्या कार्याला प्रारंभ केला. 2 ऑक्टोबर 1975 ला म. गांधींच्या स्वातंत्र्यासंबंधी विचाराची अनेक पत्रके नागपुरातील सर्व महाविद्यालयांत वितरित करण्यात आली. तरुण भारतात कार्यक्रमाची बातमी देण्यासाठी गेले असता, तरुण भारतच्या संपादक मंडळातील लक्ष्मणराव जोशी ह्यांना म्हणाले, आज महात्माजी असते व त्यांनी जरी हे विचार व्यक्त केले असते, तरी त्यांची रवानगी कारागृहात झाली असती. संध्याकाळी धनवटे रंगमंदिरात प्रा. सु. श्री. पांढरीपांडे यांच्या अध्यक्षतेखाली ‘नागरिकांचे मूलभूत स्वातंत्र्य आणि सद्य:स्थिती’ या विषयावर परिसंवाद होता. कार्यक्रम सुरू असतानाच तिथे पोलिस पोहोचले व सुरेश तापस आणि बापू भागवत कुठे आहेत? कोण आहेत? अशी चौकशी सुरू झाली. दोघेही सभागृहातून पसार झालेत. कुठे गेले, कुणालाच माहिती नाही. मला रात्री उशिरा निरोप आला, ‘‘काळजी करू नको व वाट पाहू नको.’’ ते त्या दिवशी जे गेलेत ती त्यांची व माझी भेट 6-7 महिन्यांनंतरच झाली. त्या कार्यक्रमानंतर हे व बापू भागवत भूमिगत झाले होते.
 
मला काय करावे ते काहीच कळत नव्हते. त्यानंतर चार दिवसांनी पुन्हा एक चिट्ठी मिळाली. त्यात लिहिले होते की, श्री. बापूजी मोतलग व श्री. बाळासाहेब हरदास- दोन्ही प्रांत प्रचारक यांच्या सूचनेवरून मी संघकार्यासाठी भूमिगत होत आहे. भेट केव्हा होईल सांगता येत नाही. परंतु, कुणाच्या तरी माध्यमातून मी मधूनमधून संपर्क साधण्याचा प्रयत्न करीन.
घरी मी, माझे दीर विजय व नणंद असे तिघेच. त्या दोघांचे महाविद्यालयीन शिक्षण सुरू होते. मला, काय करावे तेच कळत नव्हते. त्यातच मला दिवस गेलेले. सुरुवातीचे एकदोन महिने कसेतरी लोटले. नंतर आर्थिक अडचणी जाणवू लागल्या. कधीकधी काही रक्कम पाठविण्याची व्यवस्था हे करीत असत. ती अगदीच तुटपुंजी असे. त्यावर एक मार्ग काढला. विद्यापीठाची अनेक परीक्षा केंद्र असत. धरमपेठ कॉलेज, लॉ कॉलेज, विद्यापीठ लायब्ररी या केंद्रावर कक्ष निरीक्षक म्हणून काम केले. त्यातून काही आर्थिक मदत मिळत असे.
 
माझे दीर विजय तापस हे ‘विजय जोशी’ या नावाने श्री. अनिल सांबरे यांच्या नेतृत्वात विद्यापीठात सत्याग्रह करून कारागृहात गेले. घरी पुरुष कुणीही नाही. अशातच ह्यांचे विदर्भातील परिचित, कार्यकर्ते कामासाठी नागपूरात येत. त्यांची राहण्याची, भोजनाची व्यवस्था करावी लागत असे. लग्न होऊन जेमतेम सवा वर्ष झाले होते. दोघांचे एकत्र राहणे फारच कमी झालेले. संघ समितीच्या कामाची माहिती होती, समितीचे कामही केले होते, परंतु उद्भवलेली जी परिस्थिती होती त्याशी संघर्ष करण्यासाठी आवश्यक मन:स्थिती नव्हती. त्यामुळे खूप मानसिक त्रास, िंचता व दडपण येत असे.
दुर्दैवाचा भाग असा की एरव्ही सतत घरी येणारे, वहिनी वहिनी म्हणून जवळीक साधणारे, या काळात आमच्या घरी येण्याचे टाळत असत, मदत करणे तर दूरच राहिले! माझी शारीरिक स्थिती नंतर अडचणीची झाली. प्रसूतीसाठी मी माहेरी काटोलला गेले. तिथेही पोलिसांचा ससेमिरा चुकला नाही. महाकोशल प्रांत संघटनमंत्री श्री. रमेशजी नागर बैठकीसाठी नागपूरला आले होते. परतीच्या प्रवासात त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्या डायरीमध्ये ह्यांचे नाव, पत्ता इ. सर्व होते. चौकशीचे सत्र सुरू झाले. माझ्या माहेरची चौकशी झाली. धरमपेठ महाविद्यालयात पोलिस वारंवार जात असत. त्यांना श्री. तापस सुटीवर गेले आहेत, असे सांगण्यात येई. त्यांची सुटी रद्द करून त्यांना कामावर रुजू व्हायला सांगा, असे पोलिसांनी सांगितले. तत्कालीन प्राचार्य अश्विनीकुमार हरदास यांनी प्राध्यापक पदाचा राजीनामा देण्याचा निरोप दिला. ह्यांनी आपल्या पदाचा राजीनामा महाविद्यालयाकडे पाठविला.
 
माझी प्रसूती झाली. वेळेवर योग्य उपचाराअभावी मूल गेले. ही बातमी ह्यांच्यापर्यंत कशी पोहोचवावी, हा प्रश्न होता. ह्यांचा निश्चित काहीच ठावठिकाणा नव्हता. नागपूर-विदर्भ-महाकोशल-मुंबई-अहमदाबाद हे त्यांचे संपर्कक्षेत्र होते. पत्राची देवाण-घेवाण नव्हतीच. मा. दत्ताजी डिडोळकरांकडे स्व. काकूंजवळ निरोप ठेवला. एक महिन्यानंतर अगदी थोड्या वेळासाठी हे भेटायला आले.
 
आणिबाणी लागून जवळजवळ एक वर्ष लोटत आले होते. मी नागपूरला परतली. एकूणच परिस्थितीची जाणीव होऊ लागली. एकटेपणा जाणवत होताच. एका भेटीत हे मला म्हणाले, आता गरज आहे तेव्हा ही भीती िंकवा एकटेपणा सोड. अनेक तरुण मुली, स्त्रिया या संघर्षात प्रत्यक्ष जरी नाही, तरी अप्रत्यक्षपणे सहभागी होत आहेत. तूही तुला जमेल तसे संपर्काचे काम कर. मला नागपूरमध्ये जे संपर्क करावयाचे असतात, साहित्य पोहोचवायचे असते त्यात तू सहभागी हो, म्हणजे तुझ्या संपर्कात लोक येतील, तुला एकटेपणा जाणवणार नाही.
 
मी गुप्तपणे, प्रकाशित झालेले साहित्य मला मिळालेल्या व्यक्तींच्या पत्त्यावर पोहोचविणे प्रारंभ केले. शिवाय सत्याग्रहामध्ये गेलेले सत्याग्रही त्यांच्या तारखेवर कोर्टात येत असत, त्यांना खाद्यपदार्थ, ओैषधे पोहोचविणे हेही काम मी करायला लागले. एकदा भारताच्या पर्वतीय भागातील (मिझोरम, मेघालय) काही विद्यार्थी मुंबईला निघाले होते. त्यांना नागपूरला गाडीमध्ये डबा पोहोचवायचा होता. जवळजवळ 35-40 कार्यकर्त्यांसाठी भात, भाजी, चपातीचा डबा अवघ्या 3 तासांच्या सूचनेवरून, आणखी दोन कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पोहोचविला.
माझ्या दृष्टीने या कामांच्या निमित्ताने, ह्यांच्या प्रत्यक्ष संपर्कात नसले तरी जे कार्य करण्यासाठी हे भूमिगत झाले आहेत, ते कार्य करून त्यांच्याशी संपर्क साधण्याचे सुख शोधण्याचा हा माझा प्रयत्न होता
.
माझे दीर विजय तापस तीन महिन्यांचा कारावास पूर्ण करून बाहेर आले होते. त्याच दरम्यान नागपूरला स्व. मा. माधवराव मुळे घेणार असलेल्या बैठकीसाठी हे नागपूरला येणार होते. मी ह्यांना घरी येण्याचा आग्रह केला. बैठकीनंतर जेवायला हे घरी आले. मी पाने घेतलीत. तितक्यात ह्यांचे दोन प्राध्यापक मित्र आले. हे बाहेरच्या खोलीत त्यांच्याशी बोलत असताना पोलिस आले. बसलेले प्राध्यापक, पोलिसांना बघून स्कूटरला किक मारून निघून गेले. हे व विजय दोघेही पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाले. मांडलेली पाने तशीच राहिली. मी एकटीच घरी. थोड्या वेळाने पुन्हा पोलिस परत आले. त्यांनी माझी चांगलीच उलटतपासणी घेतली घराची झडती घ्यायचे म्हणाले. घरमालक श्री. पोटे समोर आले. त्यांनी पोलिसांना समजाविले की, या बाई इथे एकट्याच राहतात, तेव्हा ते परत गेले. परंतु श्री. पोटेंनी, तुमच्या सोईसाठी घर बदला, असे सांगितले. संघपरिवाराशी कोणताही संबंध नसताना आमच्याकडील खूप मोठे प्रचार साहित्य काही काळासाठी त्यांनी आपल्याकडे ठेवून घेतले.
 

लवकरच एका रात्रीतून आम्ही दुसरीकडे शिफ्ट झालो. या कामात गांधीनगरमधील अॅड. अण्णाजी देशपांडेंच्या पुत्राची आम्हाला खूप मदत झाली. आम्ही पुन्हा विजय जोशी या नावाने रेशीमबागमध्ये राहावयाला गेलो. दरम्यान माझ्या सासरी तळेगाव दशसहस्र येथे पोलिस चौकशीसाठी गेले. माझे सासू, सासरे धास्तावलेले. त्यांनी मला गावी येण्यास सुचविले. परंतु, ह्यांची तयारी नव्हती. मी नागपूरला राहिले तर ह्यांना काही बाबतीत मदत होईल, असे ह्यांचे मत होते व तसे ते खरेही होते.
निवडणुका घोषित झाल्या. आणिबाणी शिथिल झाली. निकालानंतर तिचा बोजवारा वाजला. परंतु, अजूनही हे घरी परतले नव्हते. कारागृहातील मंडळी घरी पोहोचली. भूमिगतांचे काही दायित्व अजूनही शिल्लक होते. मुंबईला बैठकीत असताना ह्यांना काविळीचा त्रास झाला. आठ दिवस स्व. मा. यशवंतराव केळकर यांच्या निवासस्थानी होते. नागपूरला संघाची अ. भा. प्रतिनिधिसभा होती. मा. यशवंतरावांसोबत ते नागपूरला परतले ते थेट रेशीमबागेत बैठकीसाठी. तिथे त्यांना ताप आला. मा. बाळूजी मोतलगांशी बोलून दुसर्‍या दिवशी पहिल्या सत्रात पोहोचतो, असे सांगून विश्रांतीसाठी घरी आले. त्या दिवशी त्यांनी जे अंथरूण पकडले ते पुढे दीड वर्षपर्यंत! माझ्यासाठी दुसरी आणिबाणी सुरू झाली होती...
- ज्योती सुरेश तापस
नागपूर
...........