मर्ढेकरांच्या कवितेतील स्त्री
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :15-Feb-2019
न्हालेल्या जणू गर्भवतीच्या
सोज्ज्वळ मोहकतेने बंदर
मुंबापुरिचें उजळित येई
माघामधलीं प्रभात सुंदर...
अगदी मुंबई शहराचे वर्णन करायचे झाले तरी तिला गर्भवती स्त्रीची उपमा देण्याचे धाडस आणि कल्पकता बा. सी. मर्ढेकरांच्या काव्यातून सरळ समोर येते. आता गर्भवती म्हणजे नावीन्याला जन्म देणारी... आणि मुंबई म्हणजे नावीन्य आणि मोहकतेचा परिपाक म्हणून तिचे वर्णन न्हालेल्या आणि गर्भवती या दोन शब्दांत करून स्त्रीजाणिवेतून शहराचे वर्णन मर्ढेकर सोडून दुसरे कोणीही त्या ताकदीने करणे शक्य नाही! मानवी जगण्याच्या जीवनातील विरोधाभासाच्या जाणिवेने निर्माण झालेले काव्य आणि मानवी जीवनातील व वर्तमान परिस्थितीतील अस्वस्थता वास्तव भान व्यक्त करणारी कविता खर्‍या अर्थाने आकारास आली ती मर्ढेकरांच्या काळात. मर्ढेकरांची कविता काव्यविश्वात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली आहे. काव्यातील नवीन संकल्पना, आधुनिक प्रतीके आणि प्रतिमांचा साहजिक आणि स्वाभाविक वापर मर्ढेकरांच्या कवितेमध्ये लीलया आढळतो. त्यांच्या कवितेतील नावीन्याच्या अभिव्यक्तीमुळे ते नवकवितेचे प्रवर्तक ठरले. मर्ढेकर म्हणजे नवकाव्याचे जनक, असे आजही समीक्षक मानतात. त्यांच्या काव्यापासून कवितेचे नवे युग सुरू झाले म्हणजे नवकाव्याचे जनक बाळ सीताराम मर्ढेकर! मर्ढेकरांचा जन्म खानदेशात फैजपूर येथे डिसेंबर .............. रोजी झाला.
मर्ढेकरांचे लेखन हे युद्धोत्तर काळातील नव्या जाणिवा व नव्या युगाची जाणीव व्यक्त करणारे होते. पिपात मेले, त्रुटीत जीवन, फलाटदादा, काळ्या बंबाळ अंधारी, गोंधळलेल्या अन्‌ चिचोळ्या, न्हालेल्या जणू गर्भवतीच्या... या मर्ढेकरांच्या गाजलेल्या कविता. पोरसवदा होतीस या कवितेमधून त्यांनी आजची मुलगी उद्याची आई असते, या जाणिवेतून स्त्रीचे महत्त्व अधोरेखित केले आहे
 
पोरसवदा होतीस कालपरवा पावेतो,
थांब उद्याचे माउली, तीर्थ पायांचे घेईतो...
असा शब्दांमधून मातृत्वाचा ................ प्राप्त झालेल्या जननीला देवतेचे स्थान देऊन तिच्या पायात तीर्थ आहे, या जाणिवेतून तिला वाकून प्रणाम करण्याची वृत्ती कवीने अंगी बाळगली आहे. जीवनामधील ओंगळपणा, बीभत्सता प्रयत्न करूनही टाळता येणे अशक्य. मग ते सर्व कवितेमध्ये आले तर हरकत नाही, असा सारासार विचार करून त्यांनी नव्या जाणिवा, जीवनातील उणिवा, सर्वसामान्य जगण्यातील दुःख सामान्यांचे शब्द यांचा वापर करून स्वतःचे काव्यलेखन समृद्ध केले, नव्हे, तर मराठी काव्यसृष्टीला नवकाव्याचे वरदान दिले.
नव्या आशयाच्या प्रतिमा, भाषेचा पारंपरिक वापर टाळून तिला अतिशय अर्थसंपन्न करणे, ही मर्ढेकरांच्या कवितेतील खास वैशिष्ट्य! बडवीत टिर्र्‍या। अर्धपोट किंवा, ओंगळ देखावा। दाखवीत।। भिक्षा मागे रोज। एवढासा पोर, आई ती लाचार। पाठीमागे।। भिक्षा मागणार्‍या मुलाच्या पाठीमागे फिरणार्‍या आईची मनःस्थिती दाखवत मर्ढेकरांनी दिसणारे चित्र अधिक भयावह केले आहे. स्वाभिमान टिकला आहे िंकवा विकला गेला आहे, याचे खरे दर्शन समाजातील स्त्रीच्या स्थानावर अवलंबून आहे. स्त्री समाजव्यवस्थेमध्ये लाचार ठरली की, पुढील पिढी भिक्षा मागण्याचे काम करते किंवा तशी वेळ भविष्यातील पिढीवर येते, असे सूचक ................ मर्ढेकर यांनी केले आहे.
आळसली बघ जिवंतता या वृद्धेच्या वदनावर..., या शब्दांमधून निर्जीवता अधोरेखित करताना जिवंतपणाला आळस आला म्हणजे आता मरणाची वाट सुरू आहे. ती भावना, तो क्षण तो एका वृद्धच्या चेहर्‍यावर दिसला. या ठिकाणीही वृद्ध स्त्रीमुळे ती संकल्पना अधिक परिणामकारक होते.

 
दवात आलीस भल्या पहाटे शुक्राच्या तोर्‍यात एकदा;
जवळून गेलीस पेरीत आपल्या तरल पावलामधली शोभा...
अतिशय तरल आणि भावनाशील कवितेमध्ये सखीचे शोभिवंत वर्णन करताना वरील ओळी मर्ढेकरांनी लिहिल्या आहेत. त्यातही ‘तळहाताच्या नाजूक रेषा कुणी वाचाव्या कुणी पुसाव्या...’ या ओळींमधून स्त्रीचे भविष्य शेवटपर्यंत अनाकलनीय असते, असेच जणू कवीला सुचवायचे आहे की काय, असे वाटते. सौंदर्य आणि निर्मळता त्याच्या अनुषंगाने त्यांच्या कवितेमधील स्त्री वेगवेगळ्या पातळीवर वाचकांना आकर्षित करत राहते. अशातच एखाद्वेळी घरकाम करणार्‍या महिलांचे दुःख मांडण्यासाठी त्यांची कविता पुढाकार घेते. चार महिन्यांचा गर्भ गळाल्यावर आठ दिवस तरी आराम करावा लागेल. तोवर मालकिणीने दुसर्‍या कुणाला कामावर ठेवू नये व आपले काम- आपला रोजगार जाऊ नये म्हणून तिला विनंती करायला येणारी मोलकरीण त्यांच्या कवितेतून भेटते. स्त्रीसुलभ खरे म्हणजे एक स्त्रीच समजू शकते, या जाणिवेतून या कवितेचा शेवट फार सकारात्मक आहे.
घास भरविला बाईने तीज, रजा पगारी दिधली वरती;
नभातुनी पण सकाळसंध्या मुखास काळी फासूनी फिरती...
 
मर्ढेकरांची कविता जो वाचतो त्याला स्वतःच्या अनुभवविश्वातून वेगळीच अनुभूती देत राहते, असेच काहीसे त्यांच्या महिलाविषयक कविता वाचताना जाणवते. जिथे मारते कांदेवाडी टांग जराशी ठाकुरद्वारा, या कवितेमधून वृद्ध वेश्येची दिनचर्या वाचकांसमोर मांडताना एक वेगळेच दुःख त्यांनी समोर आणले आहे. सकाळ, दुपार आणि संध्याकाळ वाट बघण्यात गेली, तरी उद्याच्या आशेने नव्हे, तर जगण्याच्या आशेने अजूनही कुणाची तरी वाट पाहत बसणे एवढेच तिच्या हाती आहे, असे विषण्णपणे ही कविता सांगते. ‘भंगू दे काठिन्य माझे’ ही मराठीमधील एक महत्त्वाची कविता आहे, असे मला नेहमीच वाटते. या कवितेतही- ‘द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभू दे भाषा-शरीरा’ या ओळीमधून पाच पांडवांची पत्नी असलेली द्रौपदी आणि त्यातही तिने जपलेले सत्त्व, याचा उल्लेख स्त्री जातीची उंची व कवितेचा आलेख दोन्हीही एका असीम उंचीवर कवीने नेऊन ठेवले आहेत.
 
येईल का कधी सीतापति गं, चुकून तरीपण ह्या वाटेला?
घेईल का अन रुजू करून या बोराच्या नैवेद्याला?
रामायणातील शबरी ही संकल्पना वापरून कुठली सीता, कुठला राघव, असा भयावह प्रश्न विचारून कवी वाचकाला अंतर्मुख करतात. एकंदरच, मर्ढेकरांची कविता मराठी साहित्याला पडलेले भरजरी स्वप्न आहे. त्यातही त्यांच्या कवितेमध्ये स्त्री प्रतिमा गर्भकळेतील सृजनाच्या आविष्करापासून जगण्याच्या आदिम दुःखापर्यंत वाचकाला मोहवीत जाते. कधी भयाण वास्तव पाहून अंतर्मुख करते, कधी शब्दांत गुरफटून ठेवते, तर कधी अतिशय सोप्या आणि साध्या शब्दांत व्यक्त होऊन जीवनाची वेगळी परिभाषा करते. मर्ढेकरांच्या कवितेमध्ये स्त्री ही आपल्या आसपास वावरणारी, जाणवणारी आणि जगणारी स्त्री आहे, त्यामुळेच ती सहज वाचकाच्या जवळ जाणारी असते.
बाळगुनि हा पोटी इवला गोळा, हसशी प्रसन्नतेने;
साकारून दे निराकृतीला विरूपता तव तन्मयतेने...
 
अशा साध्या शब्दांतून विश्वाच्या नवनिर्मितीची बीजे स्त्रीच्या अंतरंगी असून तीच जगाची उद्धारती आहे, सृजनशीलतेची नवी संकल्पना स्त्रीच्या अंगी आहे, असे सातत्याने मर्ढेकर आपल्या कवितेमधून सांगताना दिसतात. वेगवेगळ्या टीका, प्रसंगी प्रचंड अहंमन्यता आणि अभिमानी म्हणून ओळखले जाणारे मर्ढेकर, मराठी काव्यरसिकांसाठी अनेकदा दुर्बोध होत गेले. असे असले तरी त्यांच्या कवितेमध्ये स्त्री, तिचे जीवन, स्त्री पात्रे, प्रतीके, प्रतिमा आणि रूपके वाचकांना सहज समजतील, जाणवतील आणि मोहवतील असेच होते, हे त्यांच्या कविता वाचताना जाणवते.
- किरण शिवहर डोंगरदिवे
...