मोदींचा दमदार बाणा!
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :15-Feb-2019
सोळाव्या लोकसभेचे अखेरचे सत्र बुधवारी संपले. हे सत्र गाजले ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने. मोदींनी अनेक भाषणे गाजवली, पण कालच्या त्यांच्या भाषणात आगळाच जोश होता. विरोधकांना समजावणीची भाषा होती, दिलासा होता, केलेल्या कामाचा अभिमान होता, काही सूचना होत्या आणि सशक्त स्पर्धात्मक वातावरणात पुढचा लढा लढण्याचे आवाहनही होते. सोळावी लोकसभा अनेक अर्थाने गाजली. देशात तब्बल ३० वर्षांनी बहुमताचे सरकार सत्तेवर आले आणि या सरकारच्या कामकाजाची फळे देशवासीयांना चाखता आली. चांगले निर्णय झाले, ज्यामुळे देशाला अच्छे दिनचा अनुभव घेता आला. १८०० कालबाह्य कायद्यांना या सरकारने रद्द केले. २१९ विधेयके संसदेच्या दोन्ही सभागृहांत मांडली आणि त्यातील २०३ पारित करवून घेतली. गेल्या पाच वर्षांत झालेल्या बदलांची नोंद भारतानेच घेतली असे नव्हे, तर विदेशानेही घेतली. विदेशी राजवटीमध्ये मोदींच्या प्रशासनाचे, कार्यशैलीचे, झपाट्याचे आणि समयबद्ध कार्यक्रमाचे गोडवे गायले जाऊ लागले.
 
अर्थव्यवस्थेतील आपले स्थान पहिल्या पाचात गणले जाऊ लागले. तीन ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने भारताची वाटचाल सुरू झाली. एकीकडे सत्ताधारी पक्षाची कामगिरी उत्तुंगतेची शिखरे पादाक्रांत करीत असताना, विरोधक मात्र सत्ताधारी पक्षावर चिखलफेक करण्यातच गुंतले होते. या साडेचार वर्षांत त्यांच्याकडून दखल घेण्यागत फारशी कामे झाली नाही. आपापल्या पक्षाचा प्रभाव वाढविण्याच्या दृष्टीनेही कॉंग्रेससकट सारे विरोधक सपशेल अपयशी ठरले. फक्त गेल्या तीन राज्यांच्या निवडणुकी वगळता भाजपाची विजयी घोडदौड सुरूच होती. मध्यंतरी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाची खुर्ची मिळवून पक्षातील परिवारवादाचा दांडा अधिक बळकट केला. प्रियांकांच्या राजकारणप्रवेशाने तर त्या दांड्याभोवती परिवारवादाचे आणखी एक कवच घातले गेले.
 

 
 
यापुढील काही वर्षे गांधी घराण्याशिवाय पक्षाचे सुकाणू कोणी हाकू नये, किंवा ते हाकण्याची मनीषाही बाळगू नये, हा या कृतीमागचा उद्देश. विरोधी पक्षाचे नेतृत्व करताना राहुल गांधी यांची वागणूक म्हणाल तर बालिशपणाचा नमुनाच होती. शिरा ताणून बोलणे, ‘चौकीदार चोर है’ असे म्हणत मोदींवर वैयक्तिक टीका-टिप्पणी, भाषणातील संदर्भांच्या चुका, या सार्‍या सातत्याने सुरूच होत्या. त्यांच्या बालिशपणावर मोदींनी, त्यांचे नाव न घेता चांगलीच चुटकी घेतली. लोकसभेच्या गेल्या अधिवेशनात राहुल गांधी यांनी मोदींना मिठी मारून आपल्या मनात कुणाबद्दलच द्वेषभावना नसल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला होता. त्यावर मोदींनी अतिशय चपखल शब्दांत टिप्पणी करून, राहुलला निरुत्तर केले. मोदी म्हणाले, गळाभेट घेणे आणि गळ्यात पडणे यातील फरक मला त्या दिवशी पहिल्यांदा कळला. त्यांच्या या वक्तव्याने सभागृहात हंशा पिकला नसता तरच नवल. यावेळी सत्ताधार्‍यांनीच नव्हे, तर विरोधकांनीही मोदींना दिलेली दाद उत्स्फूर्त होती.
 
एकीकडे त्या मिठीचे कॉंग्रेसी कौतुक किती बालिश होते, हेच मोदींनी त्यांच्या संवादातून दाखवून दिले. सभागृहात डोळा मारण्याच्या राहुलच्या कृतीनेही या पक्षाची संस्कृती जगजाहीर केली. डोळे आहेत पण दृष्टी नाही, असेच सांगणारी ती कृती होती. तिसरा अनुभव राफेलवरून झालेल्या चर्चेप्रसंगी आला. कागदी विमान उडवण्याची जी कृती कॉंग्रेसने केली ती संसदीय नीती-नियम गुंडाळून ठेवणारीच होती. मोदींनी, राजपुत्राची या सार्‍या बालिशपणाबद्दल केलेली कानउघाडणी सार्‍या देशाने बघितली. लोक वयानुसार वर्तनात सुधारणा आणतात, पण तसे काही राहुलबाबत अजूनही जाणवलेले नाही. राहुलच्या भाषणातील मुद्दे, मोदींवर आरोप करण्यापलीकडे गेलेले नाही. त्यांच्या वाणीतून भारताबद्दलची दूरदृष्टी कधी दिसून आली नाही. त्यांनी, त्यांच्या पक्षाने मोदीद्वेषापोटी भारताची केलेली बदनामी विदेशी भूमीनेही अनुभवली. भारतात कोणीही यावे आणि काहीही बोलून जावे, अशी परिस्थिती असताना त्यांना भारतात असहिष्णुता दिसली. पुरस्कार वापसी गँगमागे उभी असलेली राहुलची सहिष्णूताही या देशाने अनुभवली. अशा कितीतरी कृती ज्या सामान्य माणसाला आश्चर्यात पाडतील, अशा या नेत्याने केल्या.
  
एकीकडे राहुलसह सारा कॉंग्रेस पक्ष वैचारिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असताना मोदी मात्र यशाचे, प्रगतीचे, विकासाचे एकेक पंख आपल्या शिरपेचात खोवताना आढळले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीने विकासात इतकी गती घेतली की, लोक गमतीने ‘विकास पगला हो गया’ असे म्हणू लागले. पण, ही टिप्पणी म्हणजे मोदींच्या प्रगतीवर उमटवलेली एक बावनकशी मोहर होती. मोदींनी त्यांच्या भाषणात केलेल्या उल्लेखांनी विरोधकांना तर धोबीपछाड दिलीच, पण या मंचाचा वापर त्यांनी आपल्या सरकारने केलेल्या कामाच्या प्रचारासाठीही खुबीने करवून घेतला. एकप्रकारे प्रचाराचा शुभारंभ म्हणावा, या थाटातील मोदींचे मावळत्या लोकसभेतील अखेरचे भाषण होते. मोदींच्याच काळात मानवीय दृष्टिकोनातून विदेशी धर्तीवरील नैसर्गिक आपत्तींसाठीही मदत केली गेली. नेपाळ, बांगलादेश आणि मालदीवला केलेली मदत मोदी सरकारची उंची वाढवून गेली. नोदबंदीबाबत मोदींच्या कार्यकाळात झालेला निर्णय देशाच्या अर्थव्यवस्थेला दिलासा देऊन गेला. जीएसटीमुळे देशात एकच करप्रणाली अस्तित्वात आली. एकीकडे सत्ताधारी पक्ष दलितांसाठी, मागासलेल्यांसाठी आणि या देशातील अल्पसंख्यकांच्या उत्थानासाठी प्रतिबद्ध असताना, या पक्षावर संविधान बदलण्याचे कटकारस्थान रचल्याचा निराधार आरोप करण्यात विरोधकांनी धन्यता मानली.
 
बेरोजगारांना रोजगार मिळावा, नवउद्योजकांना कर्ज मिळावे, यासाठी या सरकारने मुद्रा योजना राबविली. यातून लाखो लोकांनी उद्योग सुरू केले आणि बेरोजगारांना कामाला लावले. देशातील मागासलेल्या सवर्णांसाठी आरक्षणाची तरतूद करून, सामाजिक असमतोल दूर करण्याचे धाडसी पाऊल मोदी सरकारनेच उचलले. मोदींनी केलेल्या कामावर विरोधकही खुश असल्याची पावती मुलामिंसह यादव यांच्या वक्तव्यातून काल मिळाली. सोळाव्या लोकसभेनंतरही मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत, असे वक्तव्य करून त्यांनी मोदींच्याच नव्हे, तर एकंदरीतच राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या कार्यशैलीबद्दल प्रशस्तिपत्र दिले.
 
मोदी केवळ ‘सबका साथ सबका विकास’ असे म्हणतच नाहीत, तर वेळोवेळी ते सर्वांना सोबत घेऊन त्यांची मतेही जाणून घेतात, हेदेखील मुलायमिंसहांनी अधोरेखित केले. जीएसटी लागू करण्याचा निर्णय ज्या वेळी झाला, त्यापूर्वी सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या, मुख्यमंत्र्यांच्या आणि अधिकार्‍यांच्या कितीतरी बैठका झाल्या. सर्वसहमती झाल्यावर ‘एक देश एक कर’ ही व्यवस्था अस्तित्वात आली. या सार्‍याचे श्रेय अर्थात मोदी यांनाच द्यायला हवे. विरोधकांनी देशात राजकीय भूकंप येणार म्हणून अस्थिरता आणण्याचे कितीतरी प्रयत्न केले, पण त्या सार्‍यांना मोदी सरकार पुरून उरले.
मोदींनी केलेल्या सूचनाही काही नेत्यांचे मोठेपण दाखवून गेल्या. एरव्ही संसदेत अनेक नेते अनुपस्थित राहात असताना, कॉंग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांची संसदेतील उपस्थिती आणि चर्चेतील सहभाग याचा उल्लेख करून त्यांनी इतरांना त्यांच्या अनुकरणाचा दिलेला सल्ला मोदींचा उमदा स्वभाव जागवता झाला...